Monday, September 14, 2020

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व विज्ञान आश्रमातील शैक्षणिक प्रयोग-अनुभव

 

    विज्ञान आश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. डॉ.कलबाग व डॉ.जे.पी नाईक यांच्या कल्पनेतून     विज्ञान आश्रमाची स्थापना झाली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांबरोबर ( विशेषत: ग्रामीण भागातील) नविन       शैक्षणिक संकल्पना राबवून, शिक्षण देण्याची नविन प्रारुपे (मॉडेल) तयार करणे हा विज्ञान आश्रमाचा एक उद्देश आहे. नुकतेच भारताचे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झाले. विज्ञान आश्रमात चालू असलेल्या अनेक शैक्षणिक अनुभवांचा या धोरणाच्या अंमलबजावणी करतांना फायदा होऊ शकेल. या धोरणातील शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक तरतुदीचे विज्ञान आश्रम स्वागत करत आहे.

‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005’, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या सर्व धोरणांच्या समिती पुढे वेळोवेळी विज्ञान आश्रमाने आपली भूमिका मांडली होती.

‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005’ मधील कार्य आणि शिक्षण या फोकस ग्रुपने विज्ञान आश्रमाच्या शाळांमधील ‘मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ या अभ्यासक्रमावर एक स्वतंत्र केस स्डडी च त्यांच्या अहवालात जोडले होते. NCERT ने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा अहवाल पुस्तकेवर छापलेली फोटो ही विज्ञान आश्रमाच्या शाळांमधील उपक्रमांचे होते.

त्यानंतर ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010’ च्या ‘कार्यशिक्षण’ समितीवर पण आम्ही विज्ञान आश्रमाची भूमिका मांडली होती. काही मुद्द्यांचा समावेश राज्य अभ्यासक्रम आराखडा मध्ये पण झाला होता.

2016 पासून नवीन शैक्षणिक धोरण बनवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली. त्यात वेळोवेळी विज्ञान आश्रमाने आपली भूमिका व पस्तावित मसुद्याची चिकित्सा करणारे मुद्दे कळवले होते. ‘हाताने काम करत शिकणे’ व व्यवसाय शिक्षण यातील फरक, कार्य केंद्र शिक्षण, बालमजुरी व उत्पादक कामातून शिक्षण यातील फरक एखाद्या विशिष्ट कौशल्याचे शिक्षण आणि बहुविध कौशल्याचे शिक्षण यासारख्या अनेक मुद्द्यांवर वारंवार बोलणे व लिहिणे होत होते.

तरीसुद्धा जेव्हा दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रके वर ‘कौशल्य शिक्षणास पात्र’ असा शेरा आला तेव्हा ‘कौशल्य शिक्षण’ हे फक्त पुस्तकी शिक्षणात गती नसलेल्या साठीच असा संदेश दृढ होतोय. या विचाराने मी अस्वस्थ होऊन गेलो होतो.

‘हाताने काम करणे’ हे बुद्धिमत्ता वाढीसाठी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्पादक कामातील विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. हे विविध अनुभवातून आणि विविध व्यासपीठावरून आम्ही मांडत होतो.

कौशल्य शिक्षण देणा-या व्यक्तींकडे ‘प्रात्यक्षिक कौशल्य’ असणे हे शैक्षणिक पात्रते पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावातील उद्योजकांना, कारागिरांना शाळेत ‘मानद शिक्षक’ म्हणून बोलवायला हवे. विज्ञान आश्रम आय बी टी कार्यक्रमातून ती कल्पना राबवत आहे.

सुदैवाने यातील अनेक कल्पनांचे सुचेताव या नवीन शैक्षणिक धोरणात आहे. या सूचनांचा अंतर्भाग केवळ विज्ञान आश्रमाच्या प्रयत्नाने झाला असे म्हणणे बरोबर होणार नाही. विज्ञान आश्रमाप्रमाणेच महात्मा गांधींच्या विचारावर काम करणा-या अनेक संस्थांनी केलेल्या कामाची व सूचनांची काही प्रमाणात दखल नक्की घेतले आहे असे म्हणता येईल.

‘नवीन शैक्षणिक धोरणातील’ संकल्पना राबवण्यासाठी विज्ञान आश्रमातील ज्या शैक्षणिक प्रयोगाचा संदर्भ घेता येईल त्याची राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मुद्यानुसार ओळख करून देत आहे.

 

विज्ञान आश्रमातील कार्यक्रम :

विज्ञान आश्रम हा पाबळ या पुण्यापासून 70 किमी असलेल्या खेडेगावात आहे. 1983 पासून शिक्षणाच्या माध्यमातून ग्राम विकासया संकल्पनेवर विज्ञान आश्रम काम करत आहे. शिक्षणाचे विविध प्रयोग करुन त्यांतील संकल्पनांचे सार्वत्रिकीकरणासाठी विज्ञान आश्रम कार्यरत असतो. सध्या विज्ञान आश्रमाकडून खालील शैक्षणिक कार्यक्रम हे राबवले जातात.

1)      इ.5 ते 7 साठी : जिवनपयोगी शिक्षण अभ्यासक्रम

2)      इ.8 वी ते 10 वी साठी : मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (MSFC -V1) हा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम

3)      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (सर्व विद्याशाखा व अभियांत्रिकी ) : डिझाईन इनोव्हेशन सेंटर

4)      इनक्युबेशन सेंटर : स्टार्ट अप करण्यासाठी :  फॅब लॅब

5)      सर्वांसाठी : Do-It-Yourself (DIY) लॅब

6)      उद्योजकता विकास केंद्र

हे सर्व अभ्यासक्रम रुढ पुस्तक केंद्री पध्दतीने न शिकवता, ‘हाताने काम करत शिकणेव प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या पध्दतीने शिकवले जातात. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विद्यार्थी शिकत असतांना समाजाला सेवा देत शिकतात. विद्यार्थ्यांनी लोकोपयोगी सेवा देणे हा या शिक्षणपध्दतीचा महत्वाचा भाग आहे.  

      नविन शिक्षण धोरण राबवतांना यातील अनेक अनुभवांचा फायदा संबंधित संस्थांना होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणातील ज्या तरतुदींवर विज्ञान आश्रमाने केलेले प्रयोग यांचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मुद्यांचा थोडक्यात सारांश पण दिला आहे.    

 

 

 

1] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  4.9

माध्यमिक शिक्षणात शारीरिक शिक्षण, कला व हस्तकला व्यवसाय शिक्षण हे विषय विज्ञान, गणित, समाजशास्त्र या विषयांच्या बरोबरीने संपूर्ण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असतील.

विज्ञान आश्रमाचा अनुभव : विज्ञान आश्रमाने विकसित केलेला व बोर्डाची मान्यता असलेला ‘मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ या अभ्यासक्रमास NSQF मध्ये मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स अशी मान्यता मिळाली आहे. इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत अनेक शाळांत तो राबवला जातो. अनेक संस्थांनी तो अंगीकारला आहे. अभियांत्रिकी, उर्जा पर्यावरण, शेती पशुपालन, गृह आरोग्य अशा बहुविध कौशल्यांचे शिक्षण विद्यार्थी घेतात. हाताने काम करत शिकणेया शैक्षणिक तत्वानुसार हे विद्यार्थी शिकतात. गणित, विज्ञान, भुगोल अशा विषयांचे ज्ञान काम करत असतांना समावाय पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळते. सध्या 140 पेक्षा जास्त माध्यमिक शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जात आहे.  

त्याचप्रमाणे विज्ञान आश्रमाने पाचवी ते सातवी साठी ‘जीवनोपयोगी कौशल्य शिक्षणाचा’ अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अभ्यासक्रम ब-याच शाळेमध्ये राबवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने त्यावर संशोधन करून पीएचडी मिळवली आहे व त्याची उपयुक्तता दाखवली आहे.

 

2] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  4.6

सहावी ते आठवी तील प्रत्येक विद्यार्थी सुतारकाम, इलेक्ट्रिकल, धातुकाम, बागकाम, मातीकाम इत्यादी स्थानिक गरजांनुसार महत्वाची कौशल्य शिकेल. त्याच प्रमाणे प्रत्येक विद्यार्थी सहावी ते आठवी कालावधीत स्थानिक कारागिरांकडे उदा. सुतार, माळी, कुंभार इत्यादींकडे किमान दहा दिवस उमेदवारी (इंटर्नशिप) करेल.

विज्ञान आश्रमाचा अनुभव :

स्थानिक कारागिरांना शाळेत ‘मानद शिक्षक’ म्हणून बोलावण्याचा जीवनोपयोगी अभ्यासक्रम हा अमरावती सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान आश्रमाने राबवला होता. त्यामध्ये कारागिरांना ‘मानद शिक्षक’ म्हणून सहभागी केले होते.

इ.8 वी ते 10 वी च्या आयबीटी कार्यक्रमात निदेशक म्हणून स्थानिक उद्योजकानां नेमले जाते. त्यांच्या प्रशिक्षणाची पध्दत व प्रशिक्षण सामुग्री विज्ञान आश्रमाने तयार केली आहे. IBT- MSFC च्या अभ्यासक्रमात कामाच्या ठिकाणी शिक्षण ‘On the job training चा समावेश आहे. गावातील कारागिरांच्या मदतीने व विद्यार्थी सहभागातून लोकोपयोगी सेवा समाजाला देणे ही कल्पना IBT शाळांमध्ये विज्ञान आश्रम राबवत आहे.

स्थानिक कारागिरांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे व त्याला सन्मान देणे. त्यांच्या कौशल्या विषयी आदर निर्माण होणे. तसेच श्रम प्रतिष्ठा सारखी मूल्ये विद्यार्थ्यात रुजवणे हे यातून शक्य होते असा विज्ञान आश्रमाचा अनुभव आहे.

 

 

 

3] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  16.3, 16.4 : व्यवसाय शिक्षणाचा नव्याने विचार

व्यवसाय शिक्षण हे प्रचलित मुख्य धारेतील शिक्षणापेक्षा दुय्यम मानले गेले. त्यामुळे व्यवसाय शिक्षणाचा नव्याने पुनर्विचार या धोरणात केला आहे. या धोरणात मुख्य शिक्षण पद्धतीतील प्रत्येक टप्प्यावर व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव करण्याचे उद्दिष्ट आहे. व्यवसाय शिक्षणाचा परिचय व अनुभव हे प्राथमिक व माध्यमिक स्तरावर दिल्यावर, उच्च शिक्षणासाठी व्यवसायाची निवड विद्यार्थ्याला सहजपणे करता येईल.

प्रत्येक विद्यार्थी हा किमान एक कौशल्य शिकेल व इतर अनेक कौशल्यांची त्याला ओळख झालेली असेल. त्यातून श्रमप्रतिष्ठा व विविध व्यवसाय व कलांविषयी चे महत्व त्यातील तज्ञता यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजेल.

विज्ञान आश्रमाचा अनुभव : ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ या अभ्यासक्रमाच्या प्रस्तावने मध्ये वरील तत्वे अगदी शब्दशः मांडली आहेत. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर व्यवसायांची ओळख करून देणे, माध्यमिक स्तरावर त्यांना विविध व्यवसायांचा अनुभव करुन देणे आणि उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना लोकोपयोगी सेवांच्या माध्यमातून उत्पादक कामात सहभागी करून घेणे या तत्वावर आय बी टी कार्यक्रम तयार केला आहे.

विद्यार्थ्यांना बहुविध कौशल्यांचे शिक्षण मिळावे अशी आय.बी.टी ची रचना केली आहे. ही तत्त्वे नवीन शैक्षणिक धोरणात असल्याचा आम्हाला आनंद आहे.

 

4] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  16.5, 16.6

व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव हा पुढील दशकभरात सर्व माध्यमिक शिक्षणात केला जाईल. हब आणि स्पोक मॉडेल वर स्किल लॅब या मोठ्या शाळात सुरू होतील व त्याच्या जवळच्या इतर शाळा त्याचा फायदा घेऊ शकतील.

विज्ञान आश्रमाची फॅब लॅब : अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये फॅब लॅब उभारली आहे. तेथील संसदे मध्ये प्रत्येक शाळेत फॅब लॅब असावी असे विधेयक पण एका खासदाराने मांडले होते. फॅब लॅब मध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित मशिनरी उदा. लेझर कटिंग, थ्रीडी प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी सुविधा आहेत. विद्यार्थी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतील अशी लॅबची रचना असते. विज्ञान आश्रमात पाबळ येथे अशी फॅब लॅब 2002 पासून कार्यरत आहे. तसेच विज्ञान आश्रमाच्या पुणे येथील DIY लॅब मध्ये पण फॅब लॅब ची सुविधा आहे. अशी फॅब लॅब प्रत्येक शाळेत तयार करणे व त्याची देखभाल करणे अवघड आहे. आश्रमाशी संलग्न शाळांमध्ये किमान पारंपारिक यंत्रे व अवजारे असतात. मात्र पुण्यातील Do-IT-Yourself (DIY)  डी आय वाय लॅब व पाबळमधील फॅब लॅब मधील आधुनिक सुविधा वापरण्यास या शाळांतील विद्यार्थी येतात. हाच प्रयोग आम्ही गावडेवाडी शाळेच्या मदतीने पण केला आहे. गावडेवाडी मध्ये गेल्या चार वर्षापासून थ्रीडी प्रिंटींग चे प्रशिक्षण दिले जाते. जवळपासच्या गावातील शाळेतील विद्यार्थी येथे येऊन प्रिंटर चे प्रशिक्षण घेतात. या अनुभवाचा वापर करून ‘अटल टिंकरिंग लॅब’ च्या शिक्षकांचे प्रशिक्षण पण विज्ञान आश्रम घेत आहे. किमान काही मुलभूत हत्यारे व साहित्य हे प्रत्येक शाळेत असणे आवश्यक आहे. अधिकच्या आधुनिक मशिन सुविधा या मुख्य (हब) शाळेत तयार केल्या तर विद्यार्थ्यांना परिणामकपणे प्रकल्प करता येतात हा आमचा अनुभव आहे.

 

5] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  11.12

उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर, तंत्रज्ञान विकास केंद्रे सुरू केले जातील.  उच्च शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना नवीन आविष्कार करण्यासाठी सहाय्यकारी व्यवस्था तयार करतील.

विज्ञान आश्रमातील  डी आय सी केंद्र :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने विज्ञान आश्रमात सुरू झालेल्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरमध्ये कुठल्याही विद्याशाखेचे विद्यार्थी प्रकल्प करू शकतात. यात इंटरडिसिप्लिनरी प्रकल्प करता येतात. त्यासाठी लागणारी  सर्व प्रोटोटाईप करण्याची सुविधा आश्रमात विद्यापीठाच्या मदतीने उभी राहिली आहे.

 

6] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो) मुद्दा  : नॅशनल रिसर्च फाउंडेशन

मुद्दा : 17.4

आपल्या देशासमोरील स्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाणी, व्यवस्थापन, शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, दळणवळण, सुविधा, वायू प्रदूषण, मूलभूत सुविधा, इत्यादी सामाजिक आव्हानावर उत्तर शोधण्यासाठी आपल्या देशात चांगले संशोधन व्हावे यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन प्रस्तावित आहे. ज्याच्या माध्यमातून समाजात संशोधन पूरक वातावरण व संस्कृती तयार व्हावी असा उद्देश आहे.

मुद्दा : 20.3

शेती शिक्षण देणा-या संस्थांचा स्थानिक समाजाला थेट फायदा झाला पाहिजे. त्यांचे शिक्षणाचे स्वरुप हे स्थानिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून जमिनीची खालवत असलेली उत्पादकता, पर्यावरणातील बदल, अन्न उत्पादनातील स्वयंपूर्णता यावर उत्तरे शोधणारे असली पाहिजे.

मुद्दा: 20.5

भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता, थ्रीडी मशिनिंग, बिग डेटा, मशीन लर्निंग या सारख्या नवीन येऊ घातलेल्या व वेगाने प्रसार होणा-या तंत्रज्ञानावर तज्ञता मिळवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.  

विज्ञान आश्रमाचे DIC केंद्र :  

अभियांत्रिकी, शेती, विज्ञान शाखेतील पदवीधर, डिझाईनर यांना विज्ञान आश्रम विविध ग्रामीण तंत्रज्ञान प्रकल्पावर काम करण्याची संधी देते. एखाद्या समस्येची निवड करून त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ते तंत्रज्ञान वापरून किमान एका तरी ग्राहकाला सेवा देणे अपेक्षित असते. अशा नविन तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरु करण्यास आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो.  

ग्रामीण भागातील समस्येचे स्पष्ट असे समस्या विधान लिहिणे व डिझाईन थिंकिंग संशोधन पद्धतीचा वापर करून उत्तरे शोधणे हा DIC चा अभ्यासक्रम आहे. याच्या जोडीला फॅब लॅब मधील थ्रीडी प्रिंटींग, लेझर, यासारख्या सुविधा वापरून वेगाने प्रोटोटाईप बनवणे हे पण विद्यार्थी शिकतात. ‘How to make anything’  नावाचा फॅब अ‍ॅकेडमी कोर्स हा विज्ञान आश्रमात घेतला जातो.  स्टार्टअप, इनक्युबेशन सेंटर मॅनेजरसाठी हा कोर्स उपयोगी आहे. सध्या भारतातील 19 पेक्षा जास्त इनक्युबेशन सेंटर मध्ये आश्रमाचे विद्यार्थी मॅनेजर म्हणून काम करत आहेत. शेती, सांडपाणी प्रक्रिया, ओला कचरा प्रक्रिया, विविध इलेक्ट्रॉनिक्स व सौर उपकरणे, कृत्रिम हात असे अनेक प्रकल्प या कोर्स मधील विद्यार्थ्यांनी विकसित केली आहेत.

शाळा हे समाजाला तंत्रज्ञान हस्तांतर’ (Technology Transfer ) चे केंद्र झाले पाहीजे. समाजाला उपयोगी असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर व त्याची किफायतपणा (cost effectiveness )  परिणामकता (effectiveness) हे आपल्याला शाळेत / महाविद्यालयात सिध्द करता आली तर समाजाला ते तंत्रज्ञान स्विकारणे व त्या संबंधी च्या अडचणी शाळेतील / महाविद्यालयातील शिक्षकांना विचारता येतात. तसे झाले तर शाळा हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर समाजासाठी ज्ञान प्राप्ती चे केंद्र बनते असा विज्ञान आश्रमाचा अनुभव आहे.   

 

7] राष्ट्रीय शिक्षण धोरण (रा.शि.धो)  मुद्दा  : 22. 19

भारतातील सर्व भाषा, त्यांची कला व संस्कृती यांचे वेबसाईट/विकी माध्यमांत जतन केले जावे. यामध्ये शब्दकोश, कथा, कविता, पारंपारिक नृत्ये, गाणे यांचे व्हिडीओ स्वरुपात जतन केले जावे. यासाठी विद्यापीठातील संशोधन विभागाने पुढाकार घ्यावे. अशा प्रकारच्या भाषा जतन करण्याच्या प्रयत्नांना NRF अनुदान देईल.

विज्ञान आश्रम विकि प्रकल्प :

CIS-A2K च्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विज्ञान आश्रमाने गेल्या तीन वर्षापासून मराठी भाषेत विकीपिडीयावर 600 पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. जुनी पुस्तके स्कॅन करून जतन करणे हे काम सुरू केले आहे. आतापर्यंत 153 पुस्तके (32734 पाने) आम्ही स्कॅन करून विकी प्रकल्पात जतन केली आहेत. तसेच रानडे शब्दकोश पण स्कॅन करून ऑनलाईन उपलब्ध केला आहे. हे सर्व काम पाबळ मधील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींने केले आहे.  

 

सारांश

विज्ञान आश्रमाने केलेल्या वरील शैक्षणिक प्रयोगांचा व उपक्रमांचा अनुभवाचा फायदा राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील काही धोरण राबवताना होऊ शकेल. विज्ञान आश्रमात केलेल्या प्रत्येक कामाची व उपक्रमाची नोंद ठेवली जाते. संबंधित माहिती ही विज्ञान आश्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  इच्छुकांनी खालील संकेतस्थळे अभ्यासावीत

http://vigyanashram.online/

http://myibtschool.com/

http://vadic.vigyanashram.blog/

 

तरी या संबधितीत प्रशिक्षण व अनुभवाचे आदान प्रदान, करण्यास इच्छुक व्यक्ती / संस्थेचे स्वागत आहे.

कुठल्याही ध्येय, धोरणांचे यश हे त्याच्या अंमलबजावणी वर ठरते. आता पर्यंतची अनेक ध्येय धोरणे राबवतांना आपण फारसे यशस्वी होऊ शकलो नाहीत. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आपण मागच्या अनुभवावरून शिकूयात व शिक्षणातील अपेक्षित बदल आणण्यासाठी सगळे प्रयन्त करूयात.

-          योगेश कुलकर्णी , 11 सप्टेंबर 2020