विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे.
प्रयोगशाळेतील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षणानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या
एका वर्षाच्या DBRT (Diploma
in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. जी
मुले शाळेत मागे पडली किंवा बाहेर फेकली गेली अशी मुलेसुद्धा इथे छान शिकतात हे दिसत
होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये, तिथे अयशस्वी होऊच नये यासाठी आश्रमात
शिकण्याची जी पद्धत आहे, ती शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना
तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी व दहावीच्या मुलांबरोबर
विज्ञान आश्रमाने काम करायला सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षात आणखी दोन गावात
- मुखई आणि धामारी इथेही आश्रमाचे शैक्षणिक प्रयोग सुरु झाले. व त्यातून
’ग्रामीण तंत्रज्ञान’ अभ्यासक्रम तयार झाला. या अभ्यासक्रमाची प्रायोगिक परवानगी SSC बोर्डाकडून
घेतली गेली. तेव्हा डॉ. कलबाग
स्वत: शाळेत शिकवत असत. त्यांनी गणित, शास्त्र या विषयात मुलांची समज कशी वाढते
याचा रीतसर नोंदी ठेवून ३ वर्ष अभ्यास केला.
१९९० साली SSC बोर्डाच्या समितीने या प्रयोगाचे
परीक्षण केले. तेव्हा लक्षात आले, की हा अभ्यासक्रम खरे तर सर्वांसाठीच उपयुक्त
आहे. याला ‘ग्रामीण’ भागापुरते
मर्यादित कशासाठी ठेवायचे? त्यामुळे ’ग्रामीण तंत्रज्ञानाचे’ नाव हे ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (Introduction to Basic
Technology (IBT)) असे बदलले गेले.
आश्रमातील मूलभूत तत्वे १)
हाताने काम करत शिकणे २) बहुविध कौशल्यांचे शिक्षण – ३) निदेशक हा उद्योजक असणे ४) शाळेतून गावाला लोकोपयोगी
सेवा देणे , ही IBT
अभ्यासक्रमात पण कायम होती. DBRT अभ्यासक्रम हा शाळेच्या अभ्यासक्रमाच्या बरोबरीने IBT मध्ये
आठवी, नववी, दहावी अशा तीन वर्षात विभागून दिला गेला. अभियांत्रिकी, उर्जा –
पर्यावरण, शेती – पशुपालन , गृह –आरोग्य या चार विभागांमधील मूलभूत
कौशल्यांचे व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण IBT मध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते.
१९९० मध्ये पायलट (पथदर्शी
प्रकल्प) प्रोजेक्ट म्हणून १५ शाळांमध्ये IBT राबवून बघायचे ठरले. तेव्हा Dept of cience
and echnology (DST) ने
त्याला आर्थिक मदत केली. 'निदेशक कोण असतील? ते गावात मिळतील का? यंत्रे व हत्यारे
कुठली लागतील ? त्यांच्या हातात देता येईल असे शिक्षण साहित्य कोणते? वेळापत्रकात
IBT कसे बसवायचे? इतर विषयांशी सांगड कशी घालायची...' या सगळ्याचा
विचार या कालावधीत झाला.
IBT निदेशक :
विषय शिकवायला गावाबाहेरचे लोक आणणे योग्य नाही, ते गावातूनच
तयार व्हायला हवेत हे कळले. दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळे कसब असलेले
कारागीर शेतकरी, पशुपालक, लोहार.. असे उपलब्ध होते. ते औपचारिक शिक्षक नव्हते पण त्यांच्याकडे
अनुभवातून आलेले ज्ञान होते. शाळेतील विषय शिक्षकांकडे पुस्तकी ज्ञान होते पण
कौशल्ये नव्हती. या सर्वांची सांगड घालून शाळेत IBT अभ्यासक्रम शिकवण्याची
रचना तयार केली गेली.
गावात काही तरुण होते, त्यांना
व्यवसाय करायची इच्छा होती, पण पैसा- जागा- साधने- हत्यारे यांचे
पाठबळ नव्हते. या तरुणांना शाळेने जागा- पैसा- हत्यारे देऊन व्यवसाय करण्याची परवानगी
द्यावी, आणि या तरुणांनी शाळेतल्या मुलांना शिकवावे, उत्पादक कामात सहभागी करून घ्यावे, त्यांनी मिळून गावाच्या गरजा ओळखाव्यात,
पूर्ण कराव्यात अशी रचना केली.
त्यांना आम्ही शिकाऊ उद्योजक म्हटले. त्यांनीच निदेशक
म्हणून मुलांना शिकवण्यासाठी तयार व्हावे म्हणून आवश्यक ती कौशल्ये आम्ही त्यांना शिकवली, प्रशिक्षण मॅन्युअल्स तयार
झाली. मुलांशी कसे बोलावे, संवाद कसा साधावा, सुरक्षितता
, स्वच्छता, व्यवसायाची मानके यांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार झाला. उदा. शाळेतले बाक
कसे बनवायचे, वॉश बेसिन, संडास कसा बनवायचा, हातगाडी (व्हीलबॅरो)
कसे तयार करायचे यांची ड्रॉईंग तयार केली गेली, पुस्तिका
बनवल्या. नंतर काही अवघड प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ बनवले गेले.
पंधरा शाळांत IBT कार्यक्रम राबवताना ज्या वेगवेगळ्या
अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढत ही शैक्षणिक साधने तयार झाली. निदेशकांचे
प्रशिक्षण सुरू झाले. निदेशकांचे प्रशिक्षण विज्ञान आश्रमात होत असते. विज्ञानाश्रमाच्या वातावरणातून आणि
सहनिवासातून अनेक मूल्ये अनौपचारिकपणे निदेशकांना दिली जातात. उदा. व्यसन करायचे नाही , तंबाखू खायची नाही, शिव्या
द्यायच्या नाहीत, मारायचे नाही इ. ‘शिक्षक’
म्हणून जबाबदारीने वागणे, स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य सांभाळणे
याची तयारी प्रशिक्षणात आपोआप होते . अगदी सुरुवातीला आश्रमात डी.बी.आर.टी. केलेली मुलेच निदेशक म्हणून
काम करत. पण वाढत्या शाळांच्या संख्येपुढे त्यांची संख्या पुरेशी
नव्हती. मग गावात उपलब्ध असलेल्या कारागिरांनाच आश्रमात प्रशिक्षित केले जाते. बरेच निदेशक
हे स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी शाळा सोडतात. मग नवीन निदेशकांचे
पहिल्यापासून प्रशिक्षण घ्यावे लागते. ठरावीक कालावधीने निदेशक बदलत राहिल्यामुळे
अप्रत्यक्षपणे मोठा फ़ायदा झाला. पहिला फ़ायदा म्हणजे गावाला उद्योजक मिळाले व दुसरा फ़ायदा
म्हणजे नवीन निदेशकांमुळे नवीन कल्पना , लोकोपयोगी सेवांचा कार्यक्रमात समावेश होत
राहील. अशा प्रकारे कार्यक्रम सतत बदलत राहिला. IBT निदेशकांकडूनच
प्रात्यक्षिकांसाठी पुस्तके लिहून घेतली. ती त्यांच्या बोलीभाषेमध्येच होती. प्रमाण
मराठीत नव्हती. ती तपासण्यासाठी जी समिती होती, त्यात पु. ग.
वैद्य होते. त्यांनी आग्रहच धरला की भाषा बदलू
नये, ती तशीच रहायला हवी. ती त्या
लहेजासकट तशीच ठेवलेली आहे.
IBT आणि मूल्यशिक्षण :
हाताने काम करताना अनेक मूल्ये विकसित
होतात ही आमची भूमिका आहे. सर्व संतांचे साहित्य आपल्याला मूल्यविचार देते. चोखामेळा, कबीर,
जनाबाई, गोरा कुंभार, सावता माळी पासून अगदी बहिणाबाईपर्यंत .. या
सर्वांनी जे विचार मांडले त्यांची अनुभूती ही त्यांना त्यांच्या कामातूनच झाली
होती. IBT त शिक्षक / निदेशक यांनी गटाने काम
करायचे आहे. गावाला सेवा देऊन मोबदला मिळवायचा आहे. त्यामुळे संघभावना तयार
होते. एकमेकाला मदत करणे, एखाद्याची ताकद कमी असेल, तर त्याचे दुसरे एखादे कौशल्य शोधून काढणे, संघात प्रत्येक
जण महत्त्वाचा आहे हे जाणणे, एकमेकाची गरज प्रत्येकाला असते हे
समजणे वगैरे. यातून ‘मूल्ये’ तयार होतात. जळगावजवळच्या खिरोदा गावात IBT शाळा आहे. एकदा आम्ही शाळेत गेलो
होतो, तर भिंतीला प्लास्टर करायचे काम चालले होते. एकजण प्लास्टर करत होते. पँट गुडघ्यापर्यंत
गुंडाळून - बाह्या वर सारून आणि मुले त्यांच्याकडून शिकत होती. नंतर कळले की तेच शाळेचे
मुख्याध्यापक होते. प्लास्टर चांगले कसे करायचे ते शिकवत होते. श्रमप्रतिष्ठा
ही अशा वर्तणुकीतून रुजते.
शाळा आणि समाज :
’गावाला सेवा देणे’ हे IBT चे मुख्य तत्त्व आहे. सेवा
देताना गावातील परिस्थितीचे / गरजांचे भान विद्यार्थ्यांना येते. उदा. IBT त गावातल्या लहान
मुलांचा आरोग्याचा सर्व्हे केला जातो. त्यांची वजन-उंची-हिमोग्लोबिन
मोजून नोंदवून ठेवायचे, त्याचा आलेख काढणे इ. शाळेतली मुले जेव्हा
हा सर्व्हे करायला वस्त्यांमधे जातात, वेगवेगळ्या परिस्थितीतील मुले पहातात, त्यांची
वजने घेतात, तेव्हा त्यांना वास्तव दिसते, त्यांच्या मनात
प्रश्न उभे रहातात. आणि आपोआपच एक जाणीव निर्माण होते. अशा प्रकारे
शोषखड्डॆ करणे, अर्थिंग तपासणे, विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे का ते तपासणे अशा विविध सेवा IBT तून
दिल्या जातात.
९५ पर्यंत अशा प्रकारे IBT अभ्यासक्रम व
अंमलबजावणीची योजना पूर्णपणे तयार झाली. ९५ ला DST चे अनुदान संपले. नवव्या पंचवार्षिक
योजनेत ’Centrally sponsored scheme’ मधे IBT च्या
२५ शाळांचा अनुदानासाठी समावेश झाला. मात्र अनुदान मिळणे लांबत गेले. तयार केलेला कार्यक्रम pilot project म्हणून
प्रत्यक्ष राबवून बघणे गरजेचे होते. अनुदानाअभावी IBT बंद
पडेल का, अशी स्थिती आली. म्हणजे ९० ते ९५ दरम्यान
जी संकल्पना तयार झाली, ती प्रत्यक्ष वापरून बघायच्या आधीच मरून जाणार
की काय असे वाटायला लागले. काय शिकवायचे, कसे शिकवायचे, मुलांना शिकवणार्या निदेशकांचे प्रशिक्षण कसे घ्यायचे सगळे तयार होते. पण
प्रत्यक्ष वापरून पहायला पैसाच नव्हता. त्यावेळी सर दोराबजी टाटा ट्रस्टने IBT कार्यक्रम इतरत्र राबवता येण्याजोगा आहे का नाही, हे तपासण्यासाठी तीन वर्षे IBT राबवून पहायला
आर्थिक मदत केली. ८३ पासून ९५ पर्यंत मेहनत करून जे गवसले होते, ते उपयुक्त
आहे ना हे ठरवायची संधी आम्हाला मिळाली. श्रीमती नीलिमा मिश्रा त्यावेळी प्रकल्प प्रमुख होत्या. २००१
पर्यंत तेवीस शाळात IBT कार्यक्रम
राबवला गेला.
IBT ची गुणवत्ता :
९० ते ९५ दरम्यान आम्हाला काही प्रश्न सतत जाणवत होते- निदेशकांच्या
गुणवत्तेचा प्रश्न कसा सोडवायचा ? शिकवण्याचा दर्जा कसा राखायचा आणि शाळांमधल्या कार्यक्रमाचा
पाठपुरावा कसा करावा, त्यांच्या अडचणींवर त्यांना उपाय त्यांच्यापर्यंत
कसे द्यावेत ? जेव्हा कॉम्प्युटर हातात आला, तेव्हा या प्रश्नांना उत्तर
मिळेल असे जाणवले. यामधून मल्टिमीडिया सीडी तयार करण्याचा नवा प्रयोग सुरू झाला. मी या कामासाठी आश्रमात काम करायला
आलो. मराठी, हिंदी भाषेत अशा सीडी तयार करू लागलो. शिक्षकांना स्वत:चा पाठ
तयार करता यावा यासाठी ‘Reality Learning Engine (RLE)’ हे सॉफ़्टवेअर
बनवले. संगणकाच्या पडद्यावर काम करून बघता येईल अशी रचना केली. मॅन्युअल्स, व्हिडिओ
तयार होतेच. त्याच्या पुढचे काम करायचे होते. त्यासाठी 'पॉवर पॉइंट लेसन' बनवले. हिमोग्लोबिन
कसे तपासावे, रक्तगट कसा तपासावा, 'स्टोव्ह'चे कार्य कसे
चालते, असे धडे तयार होऊ लागले. संगणकाची देखभाल , दुरुस्ती, वापर, बेसिक
इंग्लिश अशा विविध सीडी आश्रमाने बनवल्या.
शिकताना विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याची सोयसुद्धा या सॉफ़्टवेअरमध्ये
होती.
एका बाजूला हे पाठ बनवणे चालू केले आणि दुसरीकडे निदेशकांच्या
अडचणी कशा सोडवता येतील, यासाठी प्रयत्न चालू
केले. दहा शाळांमागे एक फील्ड ऑफिसर, शाळांना भेट देऊन अडचणी सोडवण्यासाठी नियुक्त
केला. शाळांसाठी एक ’आय.बी.टी वार्तापत्र’ चालू केले, त्यातून संवाद होऊ लागला. इंटरनेटच्या
माध्यमातून शाळांसाठी संपर्क व तांत्रिक सल्ला देणारी यंत्रणा राबवण्याचा प्रयोग
सुरू झाले. पुढे www.aaqua.org नावाची
वेबसाईट या प्रयत्नातून २००६ मध्ये सुरू झाली.
प्रयोगाकडून सार्वत्रिकीकरणाकडे
२००१ मध्ये टाटा ट्रस्टचे अनुदान संपले. तेव्हा डॉ. कलबागांनी
शाळांना सांगितले की यापुढे IBT अभ्यासक्रम शाळांनी स्वबळावर चालवावा. शाळांना IBT चे
महत्व पटले आहे का, समाजाला / पालकांना IBT चे महत्व समजले आहे का हे कळण्यासाठी ही कठीण
परीक्षा आवश्यक होती.
२००२ पासून शाळांनी
स्वत:च हा अभ्यासक्रम चालू ठेवला. IBT उपयोगी असेल तर तो टिकेल अशी आमची भूमिका होती.
आम्ही शाळांच्या भेटी , संपर्क पूर्णपणे थांबवला. २००३ मध्ये वर्ल्ड बँकेच्या Development marketplace स्पर्धेत, IBT
या कार्यक्रमासाठी भाग घ्यायचा असे आम्ही ठरवले. १००० शाळांमधे हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रकल्प
कलबाग सरांनी माझ्याकडून तयार करून घेतला. IBT कार्यक्रम विविध टप्प्यावर - आधी आश्रमात , मग ३ शाळात मग
२३ शाळात राबवला गेला होता. पण महाराष्ट्रात
१८,००० शाळा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तो कसा राबवता येईल, त्याचा
पायलट (पथदर्शी प्रकल्प) म्हणून १००० शाळांची ही पायरी होती.
पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेमार्फ़त IBT प्रकल्प
स्पर्धेसाठी पाठवला गेला. विज्ञान आश्रम सल्लागार म्हणून त्यांना मदत करणार होता. हा प्रकल्प स्वीकारला गेला नाही
असे जुलै २००३ मध्ये समजले. पण डॉ. कलबागांचा याबद्दलचा उत्साह कायम होता. २४ जुलै २००३ ला कलबाग सरांची मला मेल आली, "Though we could not make it to the final, I have not lost
zeal for the program. Its my life’s mission”.
त्यानंतर ६ दिवसात ३० जुलैला मुंबईत डॉ.कलबागांचे निधन झाले.
डॉ.कलबागांच्या नंतर त्यांनी सुचवल्याप्रमाणे माझी संचालक
म्हणून नेमणूक झाली.
शाळा स्वबळावर IBT कार्यक्रम कसा चालवत आहेत हे बघण्यासाठी २००४ मध्ये आम्ही सर्व २३ मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली.
ती १४ एप्रिल २००४ ला पाबळ येथे झाली. २३ पैकी १६ शाळांनी अभ्यासक्रम
चालू ठेवला होता. ७ शाळांना काही व्यवस्थापनाच्या, पैशाच्या अडचणी होत्या म्हणून
त्यांनी तो थांबवला होता. २३ पैकी १६ शाळा,
अनुदनाशिवाय, स्वबळावर , ३ वर्षे IBT राबवत होत्या. ७०%
पेक्षा जास्त यश हे Sustainability वर आम्हाला मिळाले होते. शाळांना विज्ञान-आश्रमाची मदत
नवीन तंत्रज्ञान , प्रकल्प , प्रशिक्षण यासाठी हवी होती.
IBT पुढे नेणे हे आता भक्कम आधारावर नक्की झाले होते. डॉ. कलबागांनी जरी हजार शाळांचा प्रकल्प केला होता. तरी त्यांच्या अनुपस्थितीत शंभर शाळांचा प्रकल्प करायचे मी ठरवले. BSNL च्या
एका जाहिरातीवरून IBT प्रकल्पाला 'Plan100' हे नाव दिले.
त्याचे प्रस्ताव अनेक फ़ंडींग एजन्सींना पाठवले. IBT शाळा या महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रात , तसेच शहरी, ग्रामीण,
आदिवासी, दुर्गम भागातल्या शाळांमधेही करायचे ठरले.
Lend a Hand India या अमेरिकेतल्या संस्थेने या प्रकल्पात रस
दाखवला. सुरुवातीला दोन शाळांसाठी मदत देऊ केली. त्याचा परिणाम
बघून २००७ साली 'प्लॅन १००' प्रकल्पाला
त्यांनी मान्यता दिली. मग आम्ही आधी तयार झालेली सर्व शैक्षणिक साधने सुधारून
वापरायला तयार केली, मॅन्युअल्स, आराखडे, अंमलबजावणी पुस्तिका तयार झाल्या. तासिका
कशा असतील, निदेशक कसे निवडायचे, अर्ज कसा
करायचा या सर्वांचा समावेश त्यात होता.
२००६ मधे समीर शिपूरकर आणि शिल्पा बल्लाळ यांनी विज्ञानाश्रमावर
माहितीपट तयार केला . माहितीपटाचे प्रदर्शन आम्ही महाराष्ट्रात अनेक
ठिकाणी केले. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांना IBT माहीत झाले. बर्याच शाळांनी संपर्क साधला. या शाळा मग आश्रमाला
भेट द्यायला येऊ लागल्या. नेहमीच्या शाळेतसुद्धा ‘काम
करत शिकवता’ येते हा विश्वास हळूहळू तयार होऊ लागला. २००७ ते ११ पर्यंत अशा
४५ शाळांना लेन्ड अ हॅण्ड संस्थेने मदत दिली. नंतर इतर संस्थांनीही मदत दिली. नंदुरबार-धुळे
भागातल्या २५ शाळांना ‘सुझलॉन’ ने मदत दिली. त्या
भागात त्यांच्या पवनचक्क्या होत्या. ‘बायर क्रॉप सायन्सेस’ने कर्नाटकातल्या ७ शाळांना मदत दिली.
तिथे बालमजूर मुलांचा प्रश्न होता. आता छत्तीसगढ, गोवा इथेही IBT
राबवणाऱ्या शाळा आहेत. आता तर काही संस्था
स्वतंत्रपणे IBT राबवत आहेत. कुठल्याही संस्थेला सहजपणे अनुकरण करता येईल या
टप्प्यावर IBT आला आहे.
नित्य नयी IBT
२००५ चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जेव्हा तयार होत होता,
तेव्हा ’कार्य आणि शिक्षण’ या कार्यगटासमोर आम्ही IBT चे सादरीकरण
केले. डॉ.अनिल सदगोपाल यांनी सांगितले की तुमचा हा कार्यक्रम
‘नई तालिम’च्या दिशेने चालला आहे, पण अजून ’नई तालीम’ कडे
जाण्यासाठी बरेच काम करायला लागेल. तो पर्यंत
मी ‘नई तालिम’चा अभ्यास पण केला नव्हता. डॉ.
कलबागांच्या काही लेखांमध्ये गांधीजींच्या शिक्षणविचारांचा संदर्भ होताच . मग भाषा, इतिहास,
मूल्यशिक्षण या अभ्यासक्रमातील गोष्टींचा , नवीन तंत्रज्ञान
आधारित ’उत्पादक कामांशी’ समवाय करायचा प्रयत्न करू लागलो. पाबळमध्ये प्रयोग करू लागलो. त्यातून सध्या ’ओपन एज्युकेशनल
रिसोर्सेस’ (मुक्त अध्ययन स्रोत) OER तयार होऊ लागले आहेत. कोणताही पाठ्यांश हा समाजाशी आणि कामाशी
कसा जोडायचा याचे काम आता चालू झाले आहे. उत्पादक कामातून शिकवणे हे ब-याचदा शिक्षकाच्या सर्जनशीलतेवर, कल्पकतेवर अवलंबून असते. मात्र OER मुळे
शिक्षकाला मदत मिळू शकते. त्यातून त्याचे काम सोपे व्हावे यासाठी काही किमान गोष्टी त्याला
नक्की मिळू शकतात. यासाठीची वेबसाइट www.learningwhiledoing.in आता तयार होत आहे.
तर एकूणात IBT चा प्रवास आता ‘नई तालिम’ च्या दिशेकडे जाण्यापर्यंत आलेला आहे.
’काम आणि शिक्षण’ या विषयात इतक्या सातत्याने, इतका काळ काम करणारी ’विज्ञान
आश्रम’ ही एकमेव संस्था असावी. मी ’उत्पादक कामातून’ शिक्षण याविषयात जेवढे काम
करत आहे, तेवढा माझा या संकल्पनेवरील विश्वास दृढ होत आहे. कामाची व्यापकता लक्षात येत आहे. आता IBT राबवणाऱ्या
१२२ शाळा झाल्या आहेत, पण महाराष्ट्रात १८००० आणि भारतात २ लाख शाळा आहेत- हे लक्षात
घेऊन आत्मसंतुष्ट राहणे शक्यच नाही. अजूनही खूप शक्यता दिसत
आहेत. परवाच IIT ने २०० आकाश टॅब्लेट हे IBT साठी
चाचणी घेण्यासाठी आश्रमात दिले आहेत. अमेरिकेतील शाळांमधे STEM (science, technology, engineering, mathematics) कार्यक्रम राबवला
जातो. आता STEM नंतर STEAM (science, technology, engineering, arts and mathematics) पण आले आहेत. नई तालीम मधे गांधीजींनी हेच सांगितले होते.
नयी तालीम, IBT किंवा STEAM.. नाव
कुठले का असेना, शेवटी ’हाताने काम करत शिकणे’ या शिकण्याच्या नैसर्गिक पध्दतीला
पर्याय नाही हेच खरे !
IBT चा समावेश मुख्य विषयात
IBT चा समावेश होण्यासाठी खुप वर्षापासून पाठपुरावा चालू होता. २७
जाने २००९ ला तर शिक्षण मंत्री व तंत्र शिक्षण मंत्री यांची एकत्र बैठक पण या
विषयावर झाली. शेवटी ’राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानात’
व्यवसाय शिक्षणाचा समावेश झाल्यावर ’व्यवसाय शिक्षण संचालनालय’ व ’राष्ट्रीय
माध्यमिक शिक्षण अभियानातील’ अधिका-यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात ’व्यवसाय
शिक्षणाचा’ मुख्य विषयात समावेश झाला. त्या संदर्भातील GR पण
२३.८.२०१४ रोजी प्रस्तुत झाला. अजून ही IBT चा समावेशाचे
स्वरुप ’मुख्य विषयातील’ पर्याय असे आहे. सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य असे
त्याचे स्वरुप नाही. तसेच व्यवसाय शिक्षण व पुस्तकी शिक्षण यातील भेद मिटवण्यासाठी
बरेच प्रयत्न करणे बाकी आहे. असे असले तरी IBT च्या
वाटचालीतील हा GR महत्वाचा टप्पा आहे.
एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुरु झालेला
प्रयत्न हा ३० वर्षाच्या प्रयोगांनंतर व
परिश्रमानंतर मुख्य विषय होतो ही विज्ञान आश्रमाच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट
आहे. या वाटचालीतील आमचे सर्व मुख्याध्यापक , निदेशक , संस्थाचालक, या कामात
सहभागी असलेल्या व आर्थिक मदत करणा-या संस्था, निदेशक संघटना इ. या सर्वांना या
कामाचे श्रेय आहे.
प्रत्येक कल्पना ’साकारण्या’ची एक वेळ असते, तशी IBT या कल्पनेची वेळ आलेली आहे असे मला वाटते. कार्य केंद्रि
शिक्षणाचे - गांधीजीं ’लक्ष्य’ किती जवळ आहे आणि किती लांब आहे, ते मात्र
सांगता येत नाही. तोपर्यंत IBT चा प्रसार करत राहणे, अनेकांना
या विषयाशी जोडणे हे करायला लागेल.
No comments:
Post a Comment