Tuesday, February 21, 2012

IBT ची सुरुवात – यवतमाळ मधील


 
मागील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातीत बोटोनी गावातील शाळेत IBT उपक्रमात बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावले होते. त्यासाठी यवतमाळला गेलो. जातांना रुकसारचा नंबर आठवणीने घेऊन गेलो होतो. दीड-दोन वर्षापूर्वी मुकुटबंध गावातील IBT शाळेतील विद्यार्थ्यांशी बोलतांना, विद्यार्थ्यांनी ’का, कसे, केव्हा, कुठे’ असे प्रश्न विचारायची सवय लावली पाहीजे, योग्य प्रश्न विचारता आले की योग्य उत्‍तरे मिळतील इ. मार्गदर्शन पर बोललो होतो. जाताना तुम्हाला ज्या प्रश्‍नाची उत्तरे मिळणार नाहीत, ती माझ्याकडे पाठवा असे पण सुचवले होते. त्यानंतर काही महिन्यांनी मला शाळेतील मुलींचा फ़ोन आला. दुसर्‍या बाजुला ३-४ मुली असाव्यात असे त्यांच्या कुजबुजी वरुन वाटत होते. शेवटी धीर करुन त्यातली एक माझ्याशी बोलली, "सर, आम्ही मुकुटबंध मधून बोलतोय, तुम्ही मागे सांगितल्या प्रमाणे आम्ही प्रश्‍न काढलेत. त्याची उत्तरे सापडली नाहीत. आता काय करु ?" मी त्यांना ते प्रश्न आमचे यवतमाळचे कार्यकर्ते श्री. गाऊत्रे यांना द्यायला सांगितली. गाऊत्रे पण मुकुटबंधला जाऊन मुलींशी बोलले. या मुलींनी गिफ्‍ट पॅक केलेला ४० पानांची प्रश्नांची वहीच गाऊत्रेंना भेट दिली. मला त्या मुलींचे कौतुक वाट्ले व पुढे केंव्हा तरी या मुलींना भेटायचे ठरवले. या भेटीत आठवणीने शाळेतील शिक्षकांना फोन केला व रुकसारची चौकशी केली. तीला १० वीत ८४% गुण मिळाले व ती आता ११ वी शास्त्र मध्ये शिकत आहे असे कळले. मुकुटबंध सारख्या दुर्गम गावातील मुलगी व तीचे यश याचे मला विलक्षण कौतुक वाटले. त्याच बरोबर IBT' कार्यक्रमाचा गेल्या चार वर्षाचा प्रवास पण डोळ्या समोरुन गेला.

शासकीय अधिकार्‍याचा पुढाकार :-
२००७ च्या सुमारास एकदा पुण्यात ’व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण’ खात्याच्या, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकार्‍यांच्या बैठकीला मला बोलावले होते. त्यात मी ’मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’, Introduction to Basic Technology (IBT) अभ्यासक्रमाची माहीती सविस्तर दिली होती. त्यावरील माहीतीपट पण दाखवला होता. त्यात यवतमाळचे जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी श्री. भोयर पण होते. भोयर साहेबांना IBT ची कल्पना खुप आवडली व त्यांनी फोन व मेल द्वारे माझ्याशी जोरदार संपर्क सुरु केला. शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण देऊन फ़ायदा नाही तर शाळेतच ’जीवनपयोगी’ शिक्षण दिले पाहीजे आणि त्यामुळे IBT उपक्रमाचा यवतमाळ मधील शाळांना खुप फ़ायदा होईल हा त्यांचा ठाम विश्वास झाला. त्यांनी यवतमाळ मधील सर्व शाळांना ’पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम’ समजाउन सांगण्यासाठी बैठक आयोजित केली व त्याचे निमंत्रण मला धाडले.

IBT उपक्रमाचा विचार हा पुणे व पश्चिम महाराष्ट्रापुरता न राहता, जिथे मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत अशा भागात व्हावा. त्या वेळी यवतमाळ हा शेतकर्‍यांच्या दुर्देवी परिस्थिती बाबत चर्चेत होता. त्यामुळे यवतमाळ मध्ये IBT सुरू झाले पाहिजे असे मला ही वाटू लागले. यवतमाळ मधील मुख्याध्यापकांच्या बैठकीला मी गेलो व विज्ञान आश्रम माहितीपट दाखवून चर्चा झाली उपस्थित संस्था चालक व मुख्याध्यापकांपैकी २६ जणांना IBT चालवण्यासाठी शासनाला प्रस्ताव दाखल करून मान्याता मिळवली सुध्दा !
जळका येथील शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोरराव मोघे बचत गटांच्या बैठकीसाठी राजगुरुनगरला आले होते. चैतन्य संस्थेच्या सुधाताईनी त्यांना आठवणीने पाबळ्ला पाठवले. कार्यक्रम समजाऊन घेऊन त्यांनी त्वरीने काम सुरू केले.
तेव्हा शिक्षणमंत्री यवतमाळचे होते त्यामुळे पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम ’कोअर’ मध्ये घेण्यासाठी माझा पाठपुरावा चालू होता त्या निमित्ताने यवतमाळच्या फेर्‍या वाढल्या.

वासुदेव गाऊत्रे :
यवतमाळचे श्री. वासुदेव गाऊत्रे हे मुळचे पोटगव्हाण या छोट्याश्या आदीवासी गावातील ! चिन्मय मिशनचे एक मंदीर त्या गावात आहे. तेथील चिन्मय ट्रस्ट या संस्थेने गाऊत्रेंना १० वी नंतर १९९४ साली पाबळला ’ग्रामीण तंत्रज्ञान’ पूर्ण करण्यास पाठविले एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर गाऊत्रे आश्रमातच विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल शिकवू लागले. बरोबरीने त्यांनी संगणक वापरणे व संगणकाची दुरुस्ती शिकूण घेतली. २००१ मध्ये धुळे जिल्हातील IBT  शाळात निदेशक म्हणून काम करू लागले. जोडीला स्वतःचे संगणक केंद्र उद्योग म्हणून चालवत होते. २००२ च्या दरम्यान ते यवतमाळ येथे परत गेले व एका Computer Institute मध्ये काम करू लागले.
IBT चे समन्वयक म्हणून काम करण्यास ते योग्य व्यक्ती आहे असे वाटून त्यांचा शोध घेतला. विदर्भात IBT चे काम वाढवायचे असे म्हटल्यावर गाऊत्रे लगेच काम करण्यास तयार झाले.  तेव्हा यवतमाळ मध्ये फ़क्त जळका हीच शाळा सुरू झाली होती. जळका च्या शाळेला निदेशकांचे मानधन, प्रशिक्षण, समन्वयकांच्या शाळा भेटीसाठी Lend-a-hand-India (LAHI) यांनी आर्थिक मदत केली. बरोबरीला अमरावतीमधील सर्व शिक्षा अभियानातीलकाम, अंबेजोगाई व अमरावती मधील शाळांचे समन्वय अशी जबाबदारी घेऊन गाऊत्रे विज्ञान आश्रमात रुजू झाले व IBT चे काम करू लागले.

IBT ची उभारणी :-
Lend-a-hand-India या संस्थेने IBT  राबवणा-या शाळांना तीन वर्षासाठी आवर्ती खर्चा (निदेशक मानधन, मटेरियल, प्रशिक्षण) साठी मदत देण्याची योजना, विज्ञान आश्रमाच्या सोबत Plan100 प्रकल्पा अंतर्गत जाहीर केली होती. ते अनुदान मिळवण्यासाठी शाळांना साहीत्य, ह्त्यारे, जागा, पाणी व वीज या भौतिक सुविधा सुरुवातीलाच उपलब्ध करणे आवश्यक होते. IBT हा विना अनुदानित विषय असल्याने आवर्ती खर्चासाठी मुलांकडून फ़ी घ्यावी असे अपेक्षित होते. मात्र एकंदर पालकांची आर्थिक व सामाजिक स्थिती पहाता हे फ़ार अवघड होते. साहित्याची जमावाजमव शाळांनी टप्या टप्यांनी पूर्ण केली. बर्‍याच शाळा एक गठ्ठी सर्व साहीत्य (अंदाजे.१लक्ष रुपये) विकत आणू शकत नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी प्राधान्य क्रम ठरवत, शाळांच्या मागे लागत साहीत्य खरेदी केले गेले. साहीत्य खराब आल्यास व तुटल्यास, नवीन टूल्स आणायला परत मागे लावावे लागत होते.
शाळेत IBT साठी स्वतंत्र खोल्या नव्हत्या. मग त्या उभारण्यासाठी पण प्रयत्‍न सुरू झाले. मुख्याध्यापक, पालक, संस्थाचालक यांनी पण प्रयत्न सुरु ठेवले. महीन्यातून एकदा समन्वयकाची भेट, त्याचा लेखी अहवाल, तोंडी आठवण - पाठपुरावा इ. गोष्टी गाऊत्रे व ओंकार सतत करत होते. हळूहळू जळका, कळंब, बोटोनी, मुकूटबंध अशा शाळांमधील IBT विभाग बाळसे धरू लागले.

आवर्ती खर्चासाठी आर्थिक सहाय्य :-
IBT उपक्रम वाढवण्यासाठी टाटा ट्रस्ट नंतर मोठे सहाय्य केले ते Lend-a-hand-India (LAHI) यांनी ! जळका शाळे पाठोपाठ इतर शाळांना पण आवर्ती खर्चासाठी आर्थिक मदत मागितली होती. इच्छुक शाळा जास्त , मात्र उपलब्ध संसाधने कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे पहील्या वर्षी फ़क्त जळका शाळेला Lend-a-hand-India कडून आर्थिक मदत मिळू लागली.
यवतमाळ मधील शाळांना आर्थिक मदतीसाठी मी कंपन्याच्या CSR विभागाशी बोलू लागलो. पुण्यातील कंपन्यांना, पुण्याजवळील गावात मदत करणे हे Monitoring च्या दृष्‍टीने सोपे असते. त्यामुळे फार प्रतिसाद मिळाला नाही. मात्र Cognizant मधील अमरावती चे श्री रविंद्र गोडबोले यांच्या प्रयत्नाने Cognizant तर्फे एका वर्षासाठी कळंब शाळेला आर्थिक मदत मिळाली. नंतर कार्यक्रम नीट चालतोय म्हटल्यावर LAHI ने पण मदत केली.
अमेरीकेतील शिकागो येथे Fab Conference साठी मी गेलो असतांना तेथील AID च्या स्वयंसेवकांना भेटलो. IBT ची माहीती दिली व गरज पण सांगितली. प्रस्ताव सादर केल्यावर त्यांनी मुकुटबंध व मांगली शाळांना मदत द्‍यायचे कबूल केले. Plan100 अंतर्गत या शाळात पण IBT सुरू झाल्या.

IBT रुजवतांना कदम कदम बढाये जा ! :-
IBT चे वैशिष्‍टय म्हणजे हा कार्यक्रम शाळेने राबवायचा असतो. स्वयंसेवी संस्था मार्फत राबवल्या जाणार्‍या बहुतेक शैक्षणिक प्रकल्पाचे सर्व व्यवस्थापन, गुणवत्‍ता नियंत्रण ही ती स्वयंसेवी संस्था बघत असते. IBT  कार्यक्रमात विज्ञान आश्रमाची भूमिका मार्गदर्शकाची व सहाय्यकाची असते. त्यामुळे प्रत्येक गोष्‍ट ही शाळेने करायची असते. सध्याची शाळांची,शिक्षकांची व पालकांची एकूण स्थिती बघता हे काम झपाट्याने होण्यास मर्यादा येत होत्या. पुण्या मुंबईकडून क्वचित शाळेला भेट देणार्‍या पाहुण्यांना तर शाळेतील वर्कशॉपच्या प्लॅस्टर न दिलेल्या खोल्या व फरशी नसलेल्या व वाळू पसरलेल्या कार्यशाळा बघितल्या की अस्वस्थ होत असे. मात्र आमचा शाळांच्या व निदेशकांच्या IBT तत्वावरील निष्ठेवर पुर्ण विश्‍वास होता.
विद्यार्थ्यांनी हाताने काम करणे, सर्व प्रात्यक्षिके होणे, शाळेमार्फत लोकोपयोगी सेवा समाजाला दिली जाणे हे तर IBT चे मुख्य Indicators ! IBT समजलेल्या शाळेला नेहमी भेट देणार्‍याला हे सुक्षम बदल चटकण टिपता येत होते.

पहीली परिक्षा १० वी ची !
IBT  मार्फ़त अनेक लोकोपयोगी सेवा गावाला दिल्या गेल्या. उदा. मांगली शाळेने गावातील अर्थिंग चे सर्व्हक्षण करुन ७० घरांना अर्थिंग करुन दिली. मुकुटबंध शाळेने वाया जाणा-या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रकल्प केला. म्हैसदोडका शाळेने ६० किलो गहू बियाणे पेरले. तर शेती च्या कंपाऊंड साठी ४५० सिमेंट पोल तयार केले. बोटोनी शाळॆतील विद्यार्थ्यांनी निदेशका बरोबरीने टपरी च्या फ़ॅब्रिकेशन मध्ये भाग घेतला व रु.२४०० नफ़ा मिळवला. विज्ञान आश्रमात बनवलेल्या सोया दुध बनवणा-या कुकर ची परिक्षा १० वी च्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प म्हणून केली. सोया दुधा पासून पनीर , चहा, दही, चहा तयार करुन लोकांची प्रतिक्रिया घेतली.
रक्त गट तपासणी, माती परिक्षण, वेल्डींग ची शाळॆतील कामे , इलेक्ट्रीक वायरिंग, LED दिवे तयार करणे, सोलर ड्रायर, गांडूळ खत प्रकल्प, फ़िनाईल बनवणे, भाज्या पिकवणे, खाद्य पदार्थ निर्मिती इ. कामे तर सर्वच शाळांत नियमित चालू आहेत.
वरील ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. मार्च २०१० मध्ये जळ्का शाळेची पहीली बॅच परिक्षेला बसली. यवतमाळ जिल्ह्यातील शाळॆतील शिक्षक , परिक्षक, बोर्डाचे अधिकारी या सर्वांना IBT नविन असल्याने विज्ञान आश्रम टीम ला धावपळ करावी लागली. मार्च २०११ मध्ये ५०५ विद्यार्थी IBT व्ही-१ परिक्षेला बसले व रिझल्ट १००% लागला. कित्येक विद्यार्थ्यांना ITI, polytechnic ला IBT मुळे प्रवेश मिळाला. प्रत्येक शाळॆत IBT Graduation ceremony घेतला गेला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले गेले. कार्यक्रमात विद्यार्थी व पालक त्यांच्या IBT तील अनुभवा विषयी भरभरुन बोलले. पालक व विद्यार्थ्यांचा Feedback मुळे IBT साठी घेतलेल्या श्रमाचे सार्थक झाले असे वाटले.

IBT चा मेळावा !
गेली ५ वर्ष यवतमाळ मधील शाळांविषयी एक नाते तयार झाले आहे. दरवर्षी निदेशक प्रशिक्षणा दरम्यान किमान एकदा सर्व निदेशक पाबळला भेटतात. माझी पण वर्षातून किमान एक भेट शाळेला नक्की होते. आमच्या क्षेत्र अधिका-यांची दरमहा शाळेला भेट होते. त्यावेळी बर्‍याचदा शाळेत मुक्काम ही होतो. त्यामुळे जळका, बोटोनी, मुकुटबंध, सांगली, कळंब, मांडवा, म्हैसदोडका इ. शाळांशी चांगला भावानुबंध जोडला आहे.
ज्या शाळांमध्ये IBT ३ वर्ष चालू आहे त्यांचे Plan100 प्रकल्पा अंतर्गतचे अनुदान टप्या टप्याने लवकरच बंद होईल. शाळांना स्वबळावर व विद्यार्थांच्या फी मधून कार्यक्रम चालवावा लागेल. या शाळा त्यांच्या सर्व शक्‍तीनिशी IBT  चालू ठेवतील यात शंकाच नाही. खरेतर या शाळांना नाविण्यपुर्ण प्रयोग करण्यासाठी व IBT पुढच्या टप्प्यावर नेण्याण्यासाठी अजून मदत मिळायला हवी असे नेहमी वाटते.
आर्थिक शाश्‍वते पेक्षा ही विकासातील तूटीची दरी खुप मोठी आहे. बघु या चांगल्या काम पैशासाठी अडत नाही म्हणतात.
एकत्र आले की संघभावना वाढते, काम करण्याचा हुरूप येतो, संघटन वाढते. एकमेकाला सहाय्य करण्याची, सामाईक प्रश्‍नांवर मात करण्याची ईर्षा पेटते, म्हणून IBT तील वस्तूंचे प्रदर्शन बोटोनी शाळेने आयोजित केले होते. सामाजातील मान्यवर,पालक यांना आमंत्रित केले होते. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. Lend-a-hand-India च्या प्रशिक्षण अधिकारी श्रीमती यशोधरा भालेराव पण आल्या होत्या. या कार्यक्रमात आमचा शाल देऊन सत्कार केला गेला. शाळेतील मुलींनी त्यांनी स्वतः विणलेले मोबाईलचे पाऊच मला भेट दिले. कार्यक्रम संपल्यावर मी गाऊत्रेंना शाल दिली, म्हटले समन्वयक म्हणून या शाली वर खरा मान तुमचा आहे. तुमची धडपड.....सततचा प्रवास .. शाळांशी संवाद यामुळेच IBT यवतमाळातच नव्हे तर विदर्भातील इतर ठिकाणी पण रूजू होऊ लागले आहे.

गाऊत्रे सहज म्हणाले,"नाही सर, हे काम तर सर्वांमुळेच होते".

खरंच, IBT च्या २५ वर्षाच्या वाटचालीत योगदान करणार्‍या सर्वांचा या श्रेयात वाटा आहेच. AID, Cognizant, LAHI, Asha for Education असे किती तरी जण ! शाळेचे मुख्याध्यापक, गाऊत्रें ना पाबळला पाठवणारे चिन्मय मिशन, व्यवसाय शिक्षणाचे अधिकारी .भोयर, भारती विद्यापीठाचे आनंदराव पाटील .... मोठी यादी ! हा तर शैक्षणिक सुधारणेसाठीचा जगन्नाथाचा रथ ! म. गांधी, जे.पी. नाईक यांच्या पासून डॉ. कलबाग पर्यंत अनेकांनी ओढलेला !
अजून काम खुपच बाकी आहे. यवतमाळातील ज्या २६ शाळांनी IBT  सुरु करण्याची तयारी दाखवली त्यापैकी फ़क्त ६ च शाळांना आर्थिक मदत मिळू शकली. केवळ त्या सहा शाळांत आपण IBT ब-या पैकी राबवू शकलो.
अजून खुप काम बाकी आहे. अजून मराठ्वाडा, विदर्भा मधील किती तरी जिल्हयात पोहचायचे. इतक्या लवकर समाधान मानून कसे चालेल ?
जगन्नाथाच्या रथाला ओढायला अजून खुप ताकद हवी आहे.  


-          योगेश , २१ / २ / २०१२

No comments:

Post a Comment