Tuesday, August 14, 2012

’आपण केलेली घाण आपणच साफ़ करावी’


३ ऑगस्ट च्या पुणे जिल्हा लोकमत मध्ये, शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करुन घेतल्या बद्दल मुख्याध्यापकांना निलंबित केल्याची बातमी वाचली. इतर वर्तमान पत्रात पण त्या प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. त्यासंदर्भात ची दुसरी बाजू समोर मांडत आहे.
श्रम प्रतिष्ठा , स्वच्छतेचे महत्व सांगणारे सुविचार शाळेच्या फ़ळ्यावर नेहमीच दिसतात. निर्मलग्राम , स्वच्छता रॅली मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच सहभागी करुन घेतले जाते. त्यांच्या कडून घोषणा देऊन घेतल्या जातात. मात्र त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी मात्र आपण विद्यार्थ्यांना देत नाही.
स्वच्छ्ते च्या गोष्टी पण इतर सर्व गोष्टीं सारख्या केवळ भाषण , निबंध लेखना पुरत्या आहेत. प्रत्यक्षात स्वच्छतेचा सुविचार आचरणात आणण्याची जबाबदारी आपली नाही असेच आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय का ? असे नुकत्याच वर्तमान पत्रातील बातम्यां वरुन वाटू लागले आहे. शाळेतील स्वच्छतागृहे ही विद्यार्थ्यांनी स्वच्छ केली तर कौतुकाची नव्हे तर निषेधाची बाब होऊ लागली आहे.
म.गांधी चे सुविचार , त्यांचा फ़ोटो व त्यांच्या वरील निबंध व भाषणे हे शाळेच्या शैक्षणिक कामाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मात्र म.गांधीचे विचार आपण राबवायचा प्रयत्न करतो का ? म.गांधीं नी ’बुनियादी शिक्षणाची’ कल्पना मांडली होती. त्यात विद्यार्थ्यांनी ’उत्पादक कामातून शिक्षण’ घ्यावे असे योजले होते. आज शिक्षण विषयक पुढे येत असलेल्या नविन संशोधनातून, गांधीजींच्या शिक्षण विचाराला पुष्टी मिळत आहे. म.गांधींनी तर ’नयी तालीम – बुनियादी शिक्षण’ विचाराला त्यांची देशाला सर्वात मोठी देणगी म्हटले होते. म.गांधी च्या मुलोद्योगामध्ये ’सफ़ाई’ ला अनन्य साधारण महत्व होते. गावातील (शहरातील सुध्दा ) घाण साफ़ करणे इ. सार्वजनिक कार्य, शिक्षकाने आणि मुलांनी एकत्र येऊन यथाप्रसंगी करायची आहेतच. पण शाळा झाडणे, सारवणे, स्वच्छतागृहाची स्वच्छता इ. कार्ये ही मुलांबरोबर शिक्षकांनी करावीत अशी रीत असावी असे विनोबांनी सांगितले होते. हलके मानलेले कोणतेही काम केवळ मुलांवर सोपवायचे नाही. शिक्षकांनी स्वत: करुन मुलांकडून ते करवायचे, असे केल्याशिवाय परिश्रम – निष्ठा निर्माण होणार नाही. सोनखताचा उत्तम उपयोग कसा करावा आणि पायखान्याची (संडासची) आदर्श व्यवस्था कशी असावी याचे शिक्षणहि शाळेतच विद्यार्थ्यांना समजले पाहीजे असा म.गांधींचा आग्रह होता.
पाबळ मधील विज्ञान आश्रमात आम्ही कुठलाही स्वच्छता कर्मचारी न ठेवता , आळीपाळीने सर्वजण स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवतात. फ़िनाईल ने स्वच्छ केलेले , कसलाही वास येत नसलेले स्वच्छतागृह आरोग्यासाठी चांगले असते हे वेगळे सांगायला नको.
आपल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था बघितल्यावर व तेथे अस्वच्छता करणा-यांना ’स्वच्छता गृह’ वापरण्याचे शिक्षण मिळालेले नाही असेच म्ह्णावे लागेल.
अमरावतीमधील एका शाळेत कार्यानुभव’ तासाला आम्ही स्वच्छतागृह स्वच्छ करुन घेतले. त्याला चुना मारुन घेतला. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील पूर्वीची किळस व स्वच्छतेच्या कामा बाबतची घृणा बोलून दाखवली व नियमित स्वच्छता ठेवली असती तर ’काम’ किती सोपे झाले असते ही भावना बोलून दाखवली. त्याच कार्यक्रमात यापुढे गटा गटाने सफ़ाईची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थी यात वाटून दिली गेली.
विद्यार्थ्यांमधे योग्य श्रम संस्कार करायचे असतील, स्वच्छतेचे शिक्षण व महत्व रुजवायचे असेल तर शिक्षक व विद्यार्थी या दोघांनी मिळूनच शाळेची स्वच्छता बघायला हवी. अशा प्रकारे स्वच्छता ठेवणा-या शिक्षकांचा गौरव व्हायला हवा.
विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे म्ह्णून , स्वावलंबन , जीवन मुल्ये रुजवावीत म्ह्णून शाळॆत विद्यार्थ्यांनी ’कामे’ करणे आवश्यक आहे. ही काही ’बाल मजुरी’ नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे.
’आपण केलेली घाण आपणच साफ़ करावी’ एवढे माफ़क शिक्षण तरी शाळेतून विद्यार्थ्यांना मिळावे , ही अपेक्षा चूक आहे का ?

डॉ.योगेश कुलकर्णी
विज्ञान आश्रम, पाबळ जि.पुणे

No comments:

Post a Comment