Tuesday, August 14, 2012

विज्ञान आश्रमाचे हितचिंतक : डॉ.चि.मो.पंडीत



डॉ.चि.मो.पंडीत यांचे निधन झाले. ब-याच दिवसापासून ते आजारी असल्याचे माहीत होते. गेल्या २८ जुलैला त्यांना फ़ोन केला तेंव्हा बोलतांना त्रास होत आहे हे लक्षात आले होते.
पंडीत सर हे डॉ.कलबागांचे मित्र होते. पाबळ मध्ये वैचारिक गप्पा मारण्यासाठी , सहविचारासाठी म्ह्णून डॉ.कलबाग , पंडीत सरांना बोलावत. ते विज्ञान आश्रमाच्या व्यवस्थापन समितीवर १९९७ ते २००३ या काळात होते. मात्र २००३ मध्ये डॉ.कलबागांचे निधन झाल्यावर जेंव्हा व्यवस्थापन समिती पुर्नगठित झाली तेंव्हा आता तुम्ही तरुण मंडळीच व्यवस्थापन समिती वर घ्या असे सांगून ते बाजूला झाले. मात्र वि.आश्रमच्या कामाबाबत , अडचणींबाबत ते सतत जाणून घेत. मराठी विज्ञान परिषदे तर्फ़े डॉ.कलबागांच्या स्मृती प्रित्यर्थ एक चर्चासत्र आयोजित केले गेले. त्याच्या संयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती.

स्वयंसेवी संस्थेत काम करतांना येणा-या व्यवहारिक अडचणींबाबत मी नेहमी त्यांचा सल्ला घेत असे. कुठल्याही प्रकारे भावनाविवश न होता व तटस्थ पणे ते त्यांचे मत सांगत. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता त्यामुळे विविध उदाहरणे ते सांगत.
माझ्या PhD चा प्रबंध  मागून नेऊन त्यांनी संपुर्ण वाचला वर त्यातील मुद्द्यांची यादी करुन माझ्याशी सविस्तर बोलायला आले. चर्चे नंतर त्यांनी प्रबंधाबद्दल कौतुक तर केलेच, पण तो प्रबंध अजून काही लोकांना वाचण्यास देण्यासाठी म्ह्णून परत घेऊन गेले. सेंद्रीय शेती चे प्रयोग, महविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना काम करायची संधी मिळावी म्ह्णून स्काऊट च्या धर्तीवर एक नविन कोर्स असे अनेक विषयावर ते टिपण पाठवत व चर्चा करत. त्यांच्या बरोबरीच्या गप्पा म्ह्णजे एक बौध्दीक मेजवाणीच असे.
डॉ.कलबागांनी लिहलेल्या लेखांचे पुस्तक प्रकाशित करायचे ठरले होते. मात्र प्रकाशक मिळत नव्हता. ते काम रेंगाळले होते. डॉ.पंडीत त्या साठी माझ्या मागे लागले. पुस्तक कोणी प्रकाशक छापत नसेल तर विज्ञान आश्रमाने स्वत: छापले पाहीजे असा आग्रह त्यांनी धरला.पुस्तकासाठी मदत म्हणून मी तुला पाच मित्रांकडून, प्रत्येकी दहा हजार असे ५० हजार मिळवून देतो हे आश्वासन दिले. व त्यापुढे दरमहा दहा हजार चा धनादेश पुण्याला आणून देत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुस्तक छापून झाले. मात्र त्यांच्या इच्छे प्रमाणे पुस्तकाचे परिक्षण छापून आणणे व त्याचे वितरण करणे मला अजून शक्य झाल नाही.
विज्ञान आश्रमात मोठे व अद्यावत कार्यशाळा असावी का ? याबाबत ब-याच जणांना शंका होती. तशी शंका त्यांनी पण व्यक्त केली. मात्र विज्ञान आश्रमाला त्याची गरज आहे असे मला वाटते आणि तो माझा हट्ट आहे असे समजा , हे मी आग्रहपुर्वक सांगितले. त्यावर पंडीत सर म्हणाले की तुझा हट्ट आहे तर हरकत नाही. कारण हट्टाशिवाय मोठी कामे होत नाहीत.    
मागील वर्षी ३० जुलै च्या डॉ.कलबाग स्मृती दिनाला ते पाबळ ला आले होते. सुबोध कुलकर्णी व माझ्या सोबत दोन दिवस डोम मध्ये राहीले. शेती मधील अडचणी , भविष्यातील संधी, स्वयंसेवी संस्था त्यांचे स्वरुप, कार्यकर्ते कसे तयार करावेत, त्यांची काळजी यावर खुप मोकळेपणाने गप्पा झाल्यात. शेती च्या प्रत्येक प्लॉट वर जाउन , प्रत्येक पीकाचे निरीक्षण कसे करायचे, पीकाची तब्येत कशी ओळ्खायची यावर त्यांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले. दोन दिवस आमच्या सोबत राहील्या नंतर , आश्रमातील कार्यकर्त्यांसाठी निवासाची चांगली व्यवस्था असायला हवी इ. सुचना पण त्यांनी केल्या.
त्यांना घेऊन सकाळी फ़ेरफ़टका मारायला , पाबळ गावात गेलो. गावातील एका वयस्कर गृहस्थ , पंडीस सरांकडे बघून म्हणाले की आपण कलबागांचे भाऊ वाटतं ? सरांनी हसून ’हो’ असे उत्तर दिले. डॉ.पंडीतांची नाकाची ठेवण ही डॉ.कलबागांसारखी होती. त्यामुळे ब-याच जणांना तसे वाटे.
वैचारिकदृष्ट्या पण दोघांमध्ये खुप साम्य होते. त्यामुळेच डॉ.चि.मो.पंडीत सर गेल्यामुळे डॉ.कलबागांची पण तिव्रपणे आठवण झाली.
डॉ.चि.मो.पंडीत सरांना विज्ञान आश्रमाकडून भावपुर्ण आदरांजली ! 

                                                डॉ.योगेश कुलकर्णी
                                                विज्ञान आश्रम, पाबळ

No comments:

Post a Comment