Saturday, December 14, 2013

निर्मितीचा आनंद घेण्यासाठी Do-It-Yourself (D-I-Y) Lab


 एखादी वस्तू तयार केल्याचा, निर्माण केल्याचा आनंद हा खूप मोठा असतो. त्यामुळे मिळणारे समाधान हे स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे असते. आजच्या विकत घ्या, वापरा आणि फेकाया संस्कृतीत, स्वतःने एखादी गोष्ट तयार करण्याचा आनंद आपण गमावत आहोत. माझ्या लहानपणी म्हणजे २०- २५ वर्षांपूर्वी संक्रांतीला उडवण्यासाठी पतंग बनवणे हा मुलांना मोठा उद्योग असे. त्यासाठी योग्य कागद निवडणे, बांबूची कामटी सोलून योग्य जाडीची कडी बनवणे. काच रांगोळी एकत्र करून पतंगीचा मांजा तयार करणे. या सर्व गोष्टी केल्यावर पतंग उडवणे हा परिपूर्ण अनुभव असे. यात पतंग उडवण्याबरोबरच अनेक कौशल्य व ज्ञान मिळत असे.हाताने काम करत शिकणेही शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे व बुध्दिमत्ता विकासासाठी पण आवश्यक आहे, हे आता आधुनिक शिक्षण संशोधनाने पण मान्य केले आहे.  
            
        रंगपंचमी साठी फुलं उकळवून त्यापासून रंग तयार करणे. दिवाळीला आकाशकंदील, उन्हाळ्यात पॉट भाड्याने आणून आईसक्रिम तयार करणे. त्यात मीठ, बर्फ घालणे, ते फिरवत राहणे हा संपूर्ण कुटुंबासाठी सोहळा असे. त्यातील निर्मितीतील आनंद अवर्णनीय असे.  भंगारातील वस्तूंपासून भिंगरी, चक्र्या, भिरभिरे, गाड्या अशी वेगवेगळी खेळणी बनवणे यात सगळी कल्पनाशक्ती पणाला लागते. जुन्या बाजारात जाऊन तुटक्या वस्तू शोधणे, दुरुस्त करणे, बाजारातून योग्य स्पेअर पार्ट्स मिळवणे अशा गोष्टींमधून बुद्धिमत्तेचा कस लागत असतो. विविध संकल्पना, विचार प्रकारे विचार करण्याची सवय ही अशा उपद्द्व्याप केल्याने लागत असते.   
        हाताने काम करणे व स्वतः हाताने वस्तू बनवणे यात केवळ पैसे वाचवणे हा हेतू नसतो. नातवासाठी लोकरीचा स्वेटर विणणाऱ्या आजीला तो स्वेटर बनवताना आणि नंतर नातवाने प्रत्येक वेळी स्वेटर घातल्यावर मिळणारा आनंद हवा असतो. खर्चातील बचत दुय्यम असते.
स्वतः गोष्टी बनवणाऱ्या आणि त्यात आनंद घेणाऱ्या लोकांची मेकर्सकिंवा “Do it yourself” चळवळ ही जगभर सुरु आहे. रोजच्या जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी पण लोक वस्तू निर्मितीचा आनंद घेतात. बऱ्याच वेळी कार्यालयीन कामातून, आपण नक्की काय केले याचा अर्थच लागत नाही. मात्र स्वतः हाताने एखादी वस्तू बनवली तर ती छोटी जरी असली तरी त्याचा पूर्ण अर्थ उलगडण्याने आनंद मिळतो. मोटार सायकल दुरुस्त करता येणे, सायकलचे पंक्चर काढता येणे, अगदी ओरीगामीतून विविध वस्तू बनवणे यातून मोठा आत्मविश्वास येतो.
          अमेरिकेतील MIT ने “You can make almost anything” (तुम्ही जवळ जवळ काहीही बनवू शकाल) ही घोषणा घेऊन फॅब लॅब ची कल्पना विकसित केली. फॅब लॅब मध्ये लेझर कटर, मिलिंग मशीन, पीसीबी बनवण्याचे मशीन, -D प्रिंटर अशी अनेक संगणक संचलित स्वयंचलित मशीन आहेत. ज्याचा वापर करून आपण मनातील कल्पनेचे संगणकावर चित्र काढून मशीन वर ते तयार करून घेऊ शकतो. स्वत:च्या कल्पना विकसित करुन त्यांना मुर्त रुप देण्यासाठीचे माध्यम हे फ़ॅब लॅब चे स्वरुप आहे. पाबळ च्या विज्ञान आश्रमात २००३ मध्ये MITच्या सहकार्याने पहिली फॅब लॅब सुरु झाली. आता जगभरात २०० पेक्षा जास्त फॅब लॅब आहेत. या सर्व लॅब एकमेकाला जोडलेल्या असून त्यांच्यात विविध डिझाईन ची देवाणघेवाण, एकमेकाला तांत्रिक मदत चालू असते. फॅब लॅब मधील मशीन ही बरीच महाग आहेत व त्यातून मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स चे प्रकल्प जास्त होऊ शकतात. फॅब लॅबच्या संकल्पनेवर मात्र भारतातील गरजेनुसार वेगवेगळी मशीन व साधने एकत्र करण्याची गरज लक्षात घेऊन विज्ञान आश्रम Do-It-Yourself (D-I-Y) lab विकसित करत आहे.
कार्यानंद , श्रमानंद घेऊ इच्छिणा-या तसेच काही नाविण्यपूर्ण करु इच्छिणा-यांसाठी ही  सामुदायिक कार्यशाळा, एकत्र भेटण्याची जागा असेल. पुण्यातील लॅब ही जे.पी. नाईक सेंटर फॉर एज्युकेशन अॅन्ड डेव्हलपमेन्ट, कोथरूड डेपो येथे सुरु होत आहे. तिचे औपचारिक उद्घाटन १० डिसेंबर रोजी अनिल काकोडकर करणार आहेत. या लॅबसाठी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशनने आर्थिक सहाय्य केले आहे.
          ज्याप्रमाणे ग्रंथालयात जाऊन आपण हवे ते पुस्तक वाचू शकतो त्याप्रमाणे DIY लॅब मधील साधने वापरून आपण वस्तू निर्माण करू शकतो. या लॅब मध्ये अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि शेतीचे प्रकल्प करण्यासाठी सर्व साधने आहेत. शेतीचे प्रयोग करायचे तर ते पण करून बघायची सोय आहे. हाताने वापरण्याची पारंपारिक साधने आहेतच. त्याच बरोबर संगणक वापरून, त्यातील ग्राफिक सॉफ्टवेअर वापरून तयार करता येतील अशी मशीन पण आहेतच.
          D-I-Y प्रयोगशाळेची अट म्हणजे तुम्हाला स्वतःला येऊन काम करायला लागेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट / मशीन / साधन/ वापरता येत नसेल तर तुम्हाला मदत मिळेल. तुमची कल्पना कशी साकारता येईल ती अजून चांगली कशी करता येईल यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन पण तुम्हाला मिळू शकेल. कुठल्याही वयाचे बंधन या लॅबच्या वापरासाठी नाही. त्यामुळे शाळेतील प्रकल्पांपासून ते केवळ छंदापुरते पण या लॅबचा वापर करता येईल. शाळेय वयापासून सशी धडपड करण्याची , उद्द्योग करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली तर ती उपक्रमशील बनतील. व त्यातूनच नविन संशोधक व उद्योजक घडतील अशी विज्ञान आश्रमाची भूमिका आहे. स्वतः काम करण्याचा व निर्माण करण्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांना लॅबचा वापर करण्यासाठीचे निमंत्रण !

1 comment:

  1. Wa Sunder Kalpana! Me 1 la Student and Participant. Shubhesha!

    ReplyDelete