विज्ञान आश्रमाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या आणि अगदी
सुरुवातीपासून राबविलेला कार्यक्रम म्हणजे ग्रामीण तंत्रज्ञानाचा. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे
हे तंत्रज्ञान चार भागात शिकवले जाते - पर्यावरण - शेती - पशुपालन आणि यांत्रिकी आणि
गृह आरोग्य.
ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे. त्यांना थोडे गणित, लिहिणे वाचणे
व्यवस्थित येते ना, आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, त्यांचे वय चौदा
वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना, याची खात्री
केली जाते. बाकी हिंदी - मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्कांची काही अट नसते.
सर्व प्रकारची मुले, कमकुवत गटातली, अतिरिक्त ऊर्जा दाखवणारी, कमी - जास्त
हुशार, काही वेगळे करण्याची इच्छा असलेली - जशी येतील त्या क्रमाने
प्रवेश घेऊ शकतात. एच.आय.व्ही. असेलेली देखील असतात, सगळे अभ्यासक्रम
ती शिकतात. आमच्या अपेक्षा स्पष्ट असतात. स्वतः हाताने काम करायची तयारी वही. पुढे
व्यवसाय करायची इच्छा हवी आणि पाबळसारख्या ठिकाणी एकटे राहण्याची तयारी हवी. आश्रमात
कमीतकमी सोयीमध्ये सगळ्यांना रहावे लागते.
हा वर्षभराचा कार्यक्रम पूर्ण भरगच्च असतो. पूर्ण वयात सगळ्या
सुट्ट्या मिळून फक्त दहा दिवसच असतात. त्यातही १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला
आश्रमातच कार्यक्रम असतात. बाकी सुट्ट्यांना घरी जाता येते. या सुट्ट्यांच्या काळातही
आश्रम चालूच राहतो. इथे गायी - गुरे, शेळ्या, पोल्ट्री यासाठी आश्रमाच्या व्यवस्थेसाठी कोणी ना कोणी राहावेच
लागते. इतर दिवशी सुट्ट्या झाल्यास मुलांना सुट्टीच्या दिवशी इथे राहावे लागते.
उद्योजक म्हणून मुलांची मनोवृत्ती घडायला यामुळे सुरुवात होते.
उद्योजकाला शनिवार - रविवार सुट्टी किंवा पाच दिवसाचा आठवडा नसतो. त्याला पूर्ण वेळ
उद्योगाचा विचार करावा लागतो. पूर्ण क्षमतेने काम करावे लागते. शारीरिक क्षमताही लागते.
या सगळ्याचा विचार करून आम्हाला वर्षभरात ही तयारी करून घ्यायची असते. इथे वर्षभर मुले
सकाळी ६ वाजता उठतात. ३ कि.मी. पळून आल्यावर आश्रमाची स्वच्छता, दिवसभर काम झाल्यावर
संध्याकाळी ५ वाजता मैदानावर खेळतात. साडेसातला ध्यानधारणा, मग चर्चा - गप्पा
- एखादी माहितीपट, नऊ वाजता जेवणानंतर थोडा वेळ अभ्यासाला मिळतो.
शनिवारच्या सुटीच्या दिवशीही प्रकल्पाचे किंवा सामाजिक कामाचा
काही भाग असू शकतो. पाठोपाठ काम लागून असतात. मुले सतत कामात असावीत अशीच अपेक्षा असते.
१० जुलैला प्रवेश घेतल्यानंतर २० दिवसात आश्रमात आश्रमात खुले प्रदर्शन असते. त्या
दिवशी डॉ. कलबागांचा स्मृतिदिन असतो. या वेळात विज्ञान आश्रमातबद्दल समजून घेऊन. ३०
जुलैला आश्रम पहायला येणार्यांना दाखवायचा असतो. तेथील एखाद्या विभागाची पूर्ण माहिती
करून घेऊन तो दाखवायची जबाबदारी घ्यायची असते. १५ ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचे
असतात, खेळाच्या स्पर्धा असतात. गणपतीच्या वेळी बरची नृत्य बसवायचे.
कोजागिरीला रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. दूध असा कार्यक्रम असतो. मग नोव्हेंबरमध्ये
एक सायकल ट्रीप काढतो. २०० - ३०० कि.मी. जाऊन यायचे. मग किसान प्रदर्शनाला भेट, एखादी औद्योगिक
भेट असे पूर्ण वर्ष काही ना काही उपक्रम चालतात. २५ जूनला वर्ष संपते. तोपर्यत सगळी
मुले याला सरावलेली असतात. त्यांनाही स्वतःचे आश्चर्य वाटते. ‘अरे किती काम करू शकतो आपण, आधी वाटले नव्हते
!’
या वर्षभरात ३/३ महिन्याचे ४ अभ्यासक्रम पूर्ण होतात. काही मुले
यातल्या एखाद्या अभ्यासक्रमात नंतरही सहभागी हातो. प्रत्येक विभागात काम करतच मुले
शिकतात. प्रत्येक विभाग गावातील लोकांना काही ना काही सेवा देत असतो. त्यात मुले सहभागी
होतात किंवा आश्रमाच्या गरजा लक्षात घेऊन काही कामे आयोजिली जातात. उदाहरणार्थ, एखाद्या पोल्ट्रीच्या
शेडचे फॅब्रिकेशन करण्याची ऑर्डर आहे. तर ३ महिन्यात ती पूर्ण करण्याचे काम त्या वेळच्या
बॅचला दिले जाते. कधी कुणाचे छत शाकारून द्यायचे असते. कुणाचा संडास बांधून द्यायचा
असतो. मागच्या ऑक्टोबरमध्ये, पाबळ गावामध्ये एक उद्यान तयार करून दिले. गावात एखादी सार्वजनिक
जागा हवी होती. निवांत बसायला - फिरायला - वाचायला. या कामाची सुरुवात जागा शोधण्या
- निवडण्यापासून केली. उद्यान म्हणजे काय काय हवे ते शोधले. फोटो पाहिले, नेटवर माहिती
काढली. विचार करून यादी केली. झोका, घसरगुंडी, बाके, शिल्पे, इ. नकाशे काढले, चित्रं काढली, त्यातले एक निवडले. मग बजेट पाहून त्यातले काय जमेल ते ठरवले.
आश्रमात उपलब्ध साहित्यापैकी काही वापरता येईल का त्याचा अंदाज घेतला. बांबू आहेत का, भंगारात काही
उपयुक्त आहे का. आता यामध्ये मुलांचे अनेक धडे शिकून झाले. आरेखन, साहित्य निवड, साहित्याचे गुणधर्म, उद्यानातील साहित्याचे
आरेखन, त्यानुसार तीन - तीनच्या गटाने एकेक काम करायला घेणे. एका गटाला
सिमेंट - विटांचे काम, दुसर्याला वेल्डिंगचे, तिसर्याला स्पिरिट
लेव्हल वापरून आखणीचे काम इत्यादी. या प्रत्येक गोष्टींच्या पॉवर पॉईट नोंदी तयार केल्यात.
आरेखन कसे करायचे. साहित्य कसे निवडायचे वगैरे या कामात मुलांचे प्रत्येक कामाचे प्रात्यक्षिक
होऊन जाते. खर्चाचा अंदाज करणे, जमाखर्च मांडणे, संगणकावर प्रकल्प मांडणे, लोकांपुढे ती
मांडणी करणे, व्हिडिओ तयार करणे. समजा एखादे राहिले, प्लंबिंग, सर्व्हे करणे
तर ते ते उरलेल्या वेळात करून घेतले जाते. पहिल्या दोन महिन्यात कामाचा बराचसा भाग
होतो. नंतर उरलेला पूर्ण करून घेतला जातो. एकेक उत्पादक काम पूर्ण करून नंतर नोंदी
केल्या जातात.
उद्यानाचे काम मुलांनी दीड महिन्यात केले. मग त्याच्या जमा खर्चाची
मांडणी केली. किती मनुष्य - तास लागले. साहित्य... इत्यादी, नंतर फाेटो
काढले, अहवाल लिहिले.
मुलांना विचारल्यास ती सांगतात की आम्ही खिडकी बनवली, संडास बांधला, पोल्ट्रीची शेड
बांधली. यात इतर तपशिलांसह त्यांना सांघिक काम कसे करावे, तेही समजलेले
असते.
शिक्षकांचे काम इथे नुसते काम करवून घेणे असे नसते. तर दर्जाकडे
लक्ष देणे, परिस्थिती मुलांना समजावून सांगणे, प्रश्न मांडणे.
वेळ पाळणं, सुरक्षिततेकडे लक्ष ठेवणे. नव्या गोष्टी शिकवणे. मुले पुढचे
पुढचे शिकतील. नवीन कल्पना मांडतील - राबवतील याकडे लक्ष देणे असे सगळेच असते.
गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे जनावरांना चारा - पाणी विकत
आणून घालावे लागत होते. दूध कमी मिळत होते. सरकारी छावणीत पाठवायची सोय नव्हती. त्यामुळे
गायी पाळणे आतबट्ट्याचे झाले. आता काय करावे याचा विचार करताना मागच्या नोंदींचा अभ्यास
करायला मुलांना सांगितले. आपल्याला गाईंना किती चारा द्यावा लागतो, दूध किती येते, आधीच्या सर्व
नोंदींचे विश्लेषण करून त्यातून असा मार्ग निघाला, की गावातल्या
लोकांकडे गाई सांभाळायला द्याव्यात. त्या गाभण गाईंना होणारी वासरेही त्यांना देऊन
टाकावीत आणि पुढच्या वर्षी गाई परत आणाव्यात.
आता पशुपालनामध्ये गुरांची निगा राखणे, शेण काढणे, चारा घालणे हे
तर मुले शिकतातच. पण हा व्यवहार फायद्याचा व्हायला हवा. ते ठरवायचे तर सर्व चारा -
पाणी - दुधाच्या नोंदी हव्यात हेही मुले शिकतात. आश्रमाच्या व्यवस्थेत नोंदी ठेवण्याला
फार महत्त्व आहे. हवामान, बी - बियाणे, उत्पन्न, पाणी किती वापरले. साधने कोणती वापरली, पंप किती वेळ
लावला, वीज किती लागली याही सर्व नोंदी सतत केल्या जातात. नोंद ठेवणे
ही स्वतंत्र जबाबदारी आळीपाळीने मुलांना दिली जाते. त्यावरून उत्पादकता - फायदा - तोटा
ठरवले जाते. तोटा भरून काढायचा विचार करणे हे देखील शिक्षण यात होते. सर्व मुले हे
पाहत - शिकत असतात. त्या विचारात सहभागी असतात.
स्वयंपाकघरातही अशाचा काटेकोर नोंदी ठेवल्या जातात. प्रत्येकाने
स्वतःला आहार ठरवून त्यानुसारच घ्यायचा असतो. समतोल आहार घेणे व शिस्त दोन्हीकडे लक्ष
ठेवणे अपेक्षित असते. प्रत्येक गोष्ट मोजून करता आली पाहिजे असे नुसते सांगून ते येत
नाही. पण ती जगण्यात आली की त्याचे महत्त्व कळते, ती आत्मसात होते.
आहार कमी घेतला तर काही बिघडले आहे, का बाहेर खाल्ल्याचा परिणाम आहे इकडे लक्ष जाते. आहार वाढला
असेल तर तो पुढच्या महिन्यात वाढवून घेता येतोच.
आश्रमातली व्यवस्था गावातल्या सामान्य लोकांच्या परिस्थितीला
अनुरूप ठेवलेली असते. गावाला जेवढे पाणी मिळते तेवढेच आश्रमात पुरवले जाते. धान्य रेशनचेच
घेतले जाते. टँकरचे पाणी आणणे, गाईंच्या चार्यासाठी फंडिंग मागणे असे उपाय केले जात नाहीत.
कारण उत्तर शोधायला शिकायचे ती सर्वसामान्य परिस्थितीत लागू पडणारी असायला हवीत. ही
पद्धत नवीन येणार्या शिक्षकाला वेगळी वाटू शकते. त्यामुळे सुुरुवातीला काही काळ ते
ज्येष्ठ शिक्षकांबरोबर काम करतात आणि हळूहळू या प्रक्रियेत सामावून घेतले जातात. इथली
व्यवस्था, इथले तत्त्वज्ञान नवीन शिक्षकांना कळावे, यासाठी काही
सी.डी. तयार केलेल्या आहेत. हे सगळे कळून घेतल्यावर, प्रत्येक ठिकाण
नोंदी ठेवत राहण्याचे महत्त्व त्यांना समजते.
एकदा आमच्या एका मोटरसायकलचं ऍव्हरेज एकदम वाढलं. जुन्या होंडाचे
ऍव्हरेज ७० कि.मी. आले, म्हटल्यावर, मी सर्वांना ई - मेल केली. हे डिझाईन फार उत्तम असावे, ते आपण होंडाला
कळवले पाहिजे; कारण जुन्या होंडाचे ऍव्हरेज एकदम ७० येऊ लागले आहे.
मग लोकांच्या लक्षात आले की पेट्रोल भरले पण नोंद करायची राहिलेली
आहे. एकदाही नोंद करायची राहिली की त्याचे अर्थ कसे गोंधळाचे होऊ शकतात, हे त्यातून दिसले.
अशाच प्रकारे बायो - गॅसचे उत्पादन किती होते, वीज किती वापरली
जाते, कमी जास्त कधी - कशामुळे होते याच्याही नोंदी ‘संस्था’ म्हणून ठेवल्या
गेल्या पाहिजेत. हा अनुभव मुलांना इतरत्र सहसा मिळत नाही. ती सवय रक्तात जावी म्हणून
आश्रमात जेवण्याखाण्याच्याही काटेकोर नोंदी केल्या जातात. आपण ठरवले तेवढेच खाणे, लहरीनुसार त्यात
फरक न करणे, जनावरांनाही मोजून खायला घालणे अपेक्षित असते. ‘काय होते कमी जास्त झाले
तर? ते काही
वाया जात नाही?’ असे एखाद्याला वाटते. पण योग्य तितके मोजून घालायच्या ऐवजी इकडे
तिकडे करावे लागणे म्हणजे व्यवस्थापन चुकले. ते अचूक हवे असेल तर प्रत्येक गोष्ट मोजून
करायला हवी. प्रत्येक गोष्टीचे निरीणि करत राहिलो की विज्ञान हा आयुष्याचा भाग होऊ
शकते. वेगवेगळ्या प्रकल्पातून हे सांगितले जाते. त्यातले काही आपण पाहूया.
एक वर्षी भाजी भरपूर पिकल्यामुळे, ती बाजारात विकायची
असे ठरवून मुले भाजी घेऊन गेली. तिथले अनुभव त्यांनी नोंदवले होते - जागा चांगली
नव्हती, ऊन लागले, वगैरे. पुढच्या बॅचच्या मुलांना या नोंदी वाचून समस्या लक्षात
आली. मग त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी मुलांना सर्व्हे करायला सांगितला. त्यात दिसले
की तीन प्रकारचे विक्रेते आहेत. ठोकमाल विकणारे, हे फक्त दर आठवड्याच्या
बाजारालाच येतात. दुसरे किरकोळ विक्रेते. हे बाहेरून आणलेला माल आठवडाभर विकतात. तिसरे
फक्त आपल्याच शेतातला माल पथारी पसरून विकतात. तिघांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यांचा
अभ्यास करून वर्कशॉपच्या मुलांनी तीन स्टॉल तयार केले. गावात जाऊन त्याचे प्रदर्शन
केले तेव्हा त्यातले दोन विकलेही गेले. आपण तयार केलेला स्टॉल विकला जाईपर्यंत मुलांचे
चांगले शिक्षण झाले. ऍक्टिव्हिटी तर झालीच, अभ्यासक्रम पूर्ण
झालाच, शिवाय एक दृष्टीही मिळाली. समाजात उपयुक्त असणारे काम करण्याची
दृष्टी मिळाली. ‘कृती’ आणि ‘उत्पादक काम’ यातला हा फरक आहे. धातूच्या दोन सळ्या जोडल्या, तरी वेल्डिंग
शिकता येते पण ‘खुर्ची तयार करणे’ हे त्याहून चांगले शिक्षण ठरते. त्याचा इतरांना उपयोग असतो.
भाजी लावणे, तिची निगा राखणे, तयार झाल्यावर काढणे, विकणे, हिशेब ठेवणे
हे पूर्ण केले तर उत्पादक काम ठरते. यात होणारी मनाची मशागत एखाद्या कृतीमध्ये होत
नाही. विज्ञान आश्रमात नुसत्या कृती करून घेतल्या जात नाहीत. व्यायाम - शाळेत व्यायाम
करणं आणि शेती करणं यातही हाच फरक आहे. श्रमातून उत्पन्न मिळवावे, समाजाला सेवा
दिल्या जाव्यात असा आग्रह आश्रमात धरला जातो.
शेती विभागात एखादे पीक घेतले जाते, तेव्हाही मुलांनी
सुरुवातीलपासून शेवटपर्यंत नोंदी ठेवाव्यात, त्यांचे विश्लेषण
करावे अशी पद्धत असते. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याने नोंदींचा अभ्यास करताना असे
लक्षात आणून दिले, की १ किलो कोथिंबीर मिळवायला १२०० लिटर पाणी द्यावे लागले होते.
त्याचे डोळे मोठे झाले. पाणी वाचवा वगैरे त्याला सांगावे लागलेच नाही. तो त्याचाच निष्कर्ष
होता. त्याचीच अनुभूती होती.
शेतीत वेगवेगळे प्रयोग मुले करून पाहतात. सेंद्रिय खते घालून, मल्चिंग करून, पाटाचे पाणी
देऊन वगैरे. इथे सगळे पर्याय अभ्यास करायला दिले जातात. त्यांच्या चांगल्या वाईट बाजू
समोर मांडल्या जातात. आम्ही आमचे मत ‘मत’ म्हणून सांगतो. त्याचा ‘प्रसार’ करत नाही. सर्व
तंत्रज्ञाने त्याला अभ्यास करायला समोर ठेवतो.
तसेच बायोगॅस, वीज, शेती विभाग असे प्रत्येक विभाग स्वतंत्र ठेवतो. शेती विभाग बायोगॅस
विभागाला शेण विकत देतो. प्रत्येक विभाग त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल देतो. पशुपालन
विभाग हा शेती विभागाकडून चारा विकत घेतो आणि स्वयंपाक घराला दूध विकतो. प्रत्येक विभागात
पैशाच्या देवाण-घेवाणीच्या नोंदी असतात.
मधे दुधाचे भाव वाढले तेव्हा दोन्ही विभागात भांडण झाले, एकाचे म्हणणे
- बाजारात अमुक भावाने दूध मिळते, तर दुसर्याचे म्हणणे - आमच्या चांगल्या दुधाला जास्त भाव मिळेल.
मग मी दोघांना बाजारात विकायचा / घ्यायचा सल्ला दिला. इथे दोन्ही ‘आपले’ विभाग म्हणून
सोपे उत्तर काढता आले असते. पण बाजारात जाण्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण परिपूर्ण होईल, नवा धडा मिळेल
म्हणून वेगळा मार्ग काढला.
अशी उदाहरणे वारंवार घडतात. विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही नवीन
धडे शिकायला मिळतात. यातूनही शिक्षकांचे प्रशिक्षण होते.
मला जेव्हा लोक विचारतात की तुम्ही कुठे शिकला, तेव्हा मी सांगतो
- मी इंजिनिअर बाहेरून झालो आणि आश्रमात आल्यावर शिकायला सुरुवात केली. इथे प्रश्न
सोडवताना चर्चा करत करत, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्तरावर शिकतो.
इथे वेगवेगळ्या कॉलेजांमधून विद्यार्थी प्रकल्प करायला येतात.
अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिझाईन स्कूल वगैरे. त्यांची वेगळी कौशल्ये आणि डीबीआरटीच्या
मुलांची काही कौशल्ये मिळून एकत्रित काम करतात. एकमेकांकडून काहीतरी शिकतात. भाषा, सहजीवन इत्यादी
आम्ही इथे फक्त टीम बनवण्याचे काम करतो. त्यात काही कमतरता नाही ना, वातावरण शिक्षणासाठी
पूरक राहते ना, योग्य कामासाठी आवश्यक कौशल्ये तेथे आहेत ना, याकडे लक्ष देतो.
डीबीआरटीची मुले वर्षभरात चार विभागात चार प्रकल्प करतात. त्यातून
त्यांना किमान रु. १५००/- कमवायचे असतात. इथे मुलांना काही बाजारभावाने कामाचे पैसे
मिळत नाहीत. रोज रु. ४०/- मिळतात. एक तर ती शिकत असतात, त्यात काही तूटफूट
होते. वेळ जास्त लागतो. ही काही त्यांची मजुरी नसते. आश्रमातली कोणतीही एक जबाबदारी
घेऊन मुले पैसे मिळवू शकतात. उदाहरणार्थ, रोज सकाळी उजाडले की सर्व दिवे बंद करायचे आणि अंधार झाला की
चालू करायचे. दिव्यांची दुरुस्ती आवश्यक तिथे करवून घ्यायची. या ठेक्याचे त्यांना १००-१५०
रु. मिळू शकतात. मात्र सुट्टी घेतली, तर ही जबाबदारी दुसर्यावर देऊन त्यांना जावे लागते. बदली माणूस
नसेल तेव्हा सुट्टी घेता येत नाही. काम झाल्यावर बिल तयार करायचे, ते काम पूर्ण
केल्याचे प्रमाणपत्र घ्यायचे मगच पैसे मिळतात.
कोणतीही गोष्ट शिकून सेवा दिली की पैसे मिळणार - हा संदेश त्यात
असतो. असेच दुपारी चहा पुरवण्याचा ठेका, सकाळी अंघोळीला गरम पाणी पुरवण्याचा ठेका मुलांना घेता येतो.
त्यासाठी लाकूड जाळून पाणी गरम करणारा बंब पेटवता यावा लागतो.
कधी कधी याच्या दरावरून विद्यार्थी भांडतात. लोकांना चमत्कारिक
वाटते, मला वाटत नाही. इथे मुलांना त्यांच्या कामाची किंमत कळू लागली
आहे, ती तयार
होत आहेत, पायावर उभी राहताहेत.
मुलांना पैसे मिळवायला जसे शिकवतो, तसे खर्च करायलाही
शिकवतो. त्यांनी मिळवलेले पैसे त्याच्या पासबुकात जमा होतात. ते काढण्यासाठी आमची सही
घ्यावी लागते. खर्च चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काही युक्त्या आहेत. अभ्यास सहलीचा
खर्च त्यांनी स्वतः करायचा असतो. किसान प्रदर्शानात इतर प्रदर्शनाचे तिकीट काढायचे
असते. तिथे एखादे पुस्तक घ्यायचे असते.
याशिवाय मुलांना काही किरकोळ गोष्टी - तेल, साबण यासाठी
पैसे लागतात. कधी घरी जाताना आईला, बहिणीला काही न्यायचे असते, हे सगळे ठीक
असते. पण एखाद्या बिडीकाडीसाठी पैसे वापरतो आहे का, टीव्हीमध्ये
पाहून काहीतरी... गोरेपणासाठी लोशन... असले खर्च करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे लागते.
गरज पडल्यास त्याबद्दल बोलावे लागते.
सर्व कर्मचारी आश्रमातच राहत असल्याने संध्याकाळीही सगळे सोबत
असतात. दिवसभराचे सगळे काम संपल्यावर संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन पंधरा मिनिटे ध्यान
करतो. (इथे सर्वांना विपश्यना शिकवली जाते.) नंतर कोणताही चालू विषय चर्चेला घेतला
जातो. त्याला काही बंधन नसते. राजकारण, समाजकारण, प्रेमप्रकरणे. कधी दोन गट पाडून, दोन्ही बाजूंनी
हिरिरीने मांडणी केली जाते. शिक्षक समारोप करतात. शिक्षक मुलांच्या जगाशी संपर्क ठेवून
असतातच, त्यांना आवडणारे चित्रपट, गाणी सगळ्याशीच.
कधी सगळे मिळून गाणी होतात, कधी वाचन होते. एखादा माहितीपट, नेटवरून एखादी
चित्रफीत पाहणं, त्यावर बोलणं असं जेवणाच्या वेळेपर्यंत चालतं. नंतर मुलं त्यांचा
त्यांचा अभ्यास करतात.
वर्षाच्या शेवटी मुलांना त्यांचा एक पोर्टफोलिओ तयार करून दिला
जातो. त्यांनी काय काय केलं. त्याचे फोटो त्यात लावले जातात. एप्रिलमध्ये त्यांना पुढच्या
उमेदवारीसाठी एखादे काम शोधून देण्याचा प्रयत्न केला जातो. आश्रमाच्या माजी विद्यार्थ्यांकडे
बरेचदा त्यांना काम मिळते.
दरवर्षी ४५ मुले जुलैपासून आणि मध्येमध्ये येणारी १५ अशी ६०
मुले डीबीआरटी पूर्ण करतात. शिवाय ३-३ महिन्याचे अभ्यासक्रम निवडून तेवढाच पूर्ण करणारी
काही असतात. (फक्त पोल्ट्री किंवा फक्त डेअरी असे.) एकूण दरवर्षी २०० मुले शिकून जातात.
सुरुवातीला हा अभ्यासक्रम ‘ग्रामीण तंत्रज्ञान’ म्हणून शिकवला
जाई. आता हा प्रयोग पूर्ण होऊन स्थिर झालाय. जे सांगायचे आहे, ते तपासून, पडताळणी करून
पक्के झाले आहे. त्यामुळे आता ते इतरांना सांगण्यासाठी तयार आहे. त्यामुळे १९९९
सालापासून हा अभ्यासक्रम NIOS (नॅशनल इन्स्टिट्यूट
ऑफ ओपन स्कूलिंग) यांच्याकडून मान्यता प्राप्त झाला आहे आणि त्याचे नाव डीबीआरटी झाले
आहे. महाराष्ट्रात चिखलगाव, साकुंब्रे आणि केम अशा तीन ठिकाणी हा अभ्यासक्रम चालवला जातो.
त्यांच्यासाठी साधन केंद्र म्हणून तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून
विज्ञान आश्रम काम करतो. या अभ्यासक्रमासाठी NIOS ने इंग्रजी पुस्तके तयार केली, हिंदी तयार होत
आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेश व कर्नाटकात एकेका ठिकाणी डीबीआरटी शिकवला जातो.
आणखी चाळीस ग्रामीण तंत्रज्ञाने आश्रमात शिकविली जातात. चारा
तयार करणे, सौर ऊर्जा वापरणे, स्वस्त घरबांधणी, वायुवीजन (vetilation), शेतीतील नवी
तंत्रे ठिबक सिंचन वाळवण तंत्रज्ञान इत्यादी या सगळ्यामागची जी दृष्टी दिली जाते ती
सर्व ठिकाणी असतेच, तो गाभ्याचा भाग आहे. निरीक्षण करणे, नोंदी ठेवणे, विश्लेषण करणे
ही कोणत्याही कामाआधी आत्मसात करायची तयारी आहे. प्रत्यक्ष वापरायची तंत्रे नवनवीन
येतील. समाजाच्या गरजा बदलत जातील. पण गाभा कायम राहील. दरवर्षी २० टक्के तंत्रज्ञान
बदलत राहते. उदाहरणार्थ, पूर्वी आम्ही ट्यूबलाइट दुरुस्त करून द्यायचो. आता सीएफएल आणि
एलइडी तयार करून देतो. पूर्वी फेरोसिमेंटचे संडास तयार करून द्यायचो आता सेरामिक आलेत, ते कार्यक्षम
आणि स्वस्तही आहेत. पण फेरोसिमेंट आज पाण्याच्या टाक्यांसाठी लागतेच. पूर्वी शेंगदाणा
चिक्की तयार करायचो आता फॅट फ्री चिक्की तयार केली जाते. शिवाय स्पिऊलिना चिक्कीही
बनवली जाते. भाज्या वाळवून टिकवणे, लोणची घालणे याबरोबर आता पुरण तयार करून कोरडे करून पाकिटात
विकता येते. पेरूबरोबर कवळाचीही जेली केली जाते. अशा पद्धतीने नवनवीन तंत्रे येत राहतीलच.
आश्रमाने आणखी एक गोष्ट केलेली होती, या शिक्षणात
मुलींसाठी राखीव जागा ठेवून सोय केलेली होती. पण ज्या ग्रामीण वर्गाला डोळ्यापुढे ठेवले
आहे, त्या
वर्गातून उद्योजक होण्यासाठी म्हणून मुलींना पाठवले जात नाही.
अजूनही मुली उद्योजक व्हाव्यात, स्वतंत्र व्हाव्यात
पायावर उभ्या रहाव्यात अशी समाजाची दृष्टी दिसत नाही. (आजचा सुधारक, ऑक्टो २०१३, शब्दांकन : निलिमा सहस्त्रबुध्दे)
No comments:
Post a Comment