Tuesday, March 29, 2016

IBT – MSFC (Multi Skills Foundation Course) नावात काय आहे ?


IBT – MSFC नावात काय आहे ?

विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अर्थात्‌ एस.एस.सी. बोर्डाला 'ग्रामीण तंत्रज्ञान' या विषयासंदर्भात प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला फक्त तीन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 'ग्रामीण तंत्रज्ञान' हा विषय राबविण्यासाठीची परवानगी कलबाग सरांनी मागितली होती. त्यानुसार १९८७ साली एस.एस.सी. बोर्डाने पुणे जिल्ह्यातील पाबळ, धामारी आणि लोणी या गावातील तीन शाळांमध्ये 'ग्रामीण तंत्रज्ञान' कार्यक्रम राबविण्यासाठी मंजूरी दिली. त्याप्रमाणे हा कार्यक्रम सन १९८७ ते सन १९९० असा एकूण तीन वर्षे राबविला गेला. सन १९९० मध्ये 'ग्रामीण तंत्रज्ञान' या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यावेळी SSC अभ्यासमंडळातील तज्ज्ञ सदस्यांनी या विषयाचे मूल्यमापन केले आणि एक महत्त्वाची सूचना वजा बदल सुचविला, की विज्ञान आश्रमाने सुचविलेला विषय फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक असावा. ग्रामीण तंत्रज्ञान या विषयामध्ये शिकवल्या जाणा-या संकल्पना व कौशल्ये यांची गरज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आहे. हा विषय सर्व शाळांमध्ये राबविला गेला पाहिजे. या विषयाची व्याप्ती व विस्तारक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाहता या विषयाचे 'ग्रामीण तंत्रज्ञान'  हे नाव बदलून अधिक व्यापक संबोधन असणारे नाव ठेवावे. या विषयाला अधिक व्यापक नाव सुचविणे हिताचे ठरेल, अशी चर्चा झाली. आणि त्यावेळच्या चर्चेनुसार या विषयाचे नाव 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' अर्थात्‌ Introduction to Basic Technology (I.B.T.) असे अतिशय व्यापक नाव द्यावे, असा निर्णय सन १९९० मध्ये सर्वानुमते घेण्यात आला.


सन १९९०पासून ते २०१३पर्यंत मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या नावाखालीच आय.बी.टी. कार्यक्रम विस्तारला, कौशल्यांनी समृद्ध झाला आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचला. आज भारतातील महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यांमधील किमान दीडशे ते पावणेदोनशे शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. आय.बी.टी. कार्यक्रमाचे अनेक वेळा मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करणार्‍या तज्ज्ञ परीक्षकांना, अधिकार्‍यांना प्रत्येकवेळी मूल्यमापनातून याची उपयुक्तता अधिकाधिक पटत गेली आणि या कार्यक्रमाचा पाया अधिकाधिक व्यापक समाजाभिमुख होत गेला. प्रत्येक टप्प्यावर या कार्यक्रमाला काळानुसार अद्यावत करण्यात आले. त्यामध्ये नवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. जुने तंत्रज्ञान अभ्यासक्रमातून काढून टाकून त्यामध्ये नवीन अंतर्भूत करणे ही प्रक्रिया सातत्याने चालू राहिली. आय.बी.टी.च्या अभ्यासक्रमात दर पाच-सात वर्षांनी आधुनिकतेच्या दृष्टीने सकारात्मक बदल होत राहीला. विज्ञान आश्रम सुरुवातीपासून आय.बी.टी. कार्यक्रमाच्या निर्मिती व अंमलबजावणीमध्ये सहभागी असल्यामुळे अभ्यासक्रम बदलताना प्रत्येक वेळी विज्ञान आश्रमाचा 'सक्रिय सहभाग' होता. सक्रिय सहभाग म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान वेगवेगळ्या ठिकाणांहून गरज पडल्यास देशाबाहेरूनही आणणे, त्या तंत्रज्ञानाची पडताळणी करणे, त्याचे शाळांमध्ये निदेशकांना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षित निदेशकांचे पाठ तपासणे, अशा प्रकारे काम विज्ञान आश्रम करीत आले आहे. या विषयामध्ये मूलभूत कौशल्ये तर शिकविली जातात तसेच तंत्रज्ञानही शिकविले जाते. यातील 'तंत्रज्ञान' हे नाव डॉ. कलबाग सरांनी खूप विचारपूर्वक योजले होते.   
Technology या शब्दाचे आकर्षण माणसाला फार पूर्वीपासून आहे. Technology म्हटले की आपण काहीतरी विशेष करतो आहोत, असा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन होतो. Technology म्हटल्यावर एकप्रकारच्या आशादायी दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना बघता येते. पालकांनाही भूमिका स्पष्टपणे सांगता येते. आय.बी.टी. कार्यक्रमाचे नाव ऐकताच पालकांशी सहज संवाद साधता येतो तसेच त्यांच्याकडून उत्तम प्रतिसादही मिळतो. हा केवळ कौशल्य शिक्षणाचा अभ्यासक्रम नाही तर यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान शिकवायचे आहे. तसेच विविध प्रकारची मूल्ये विद्यार्थ्यांना द्यायची आहेत, त्यांच्यावर श्रमसंस्कार करायचे आहेत, त्यांच्यामध्ये संघभावना निर्माण करायची आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूल्यसंस्कृती रुजवायची आहे. मुलामुली मधील भेद-असमानता दूर करायची आहे, यासारखे सर्वांगीण विकास करणारे व व्यक्तिमत्व मुळापासून दुर करायची आहे असा व्यापक दृष्टिकोन डॉ. कलबाग सरांकडे होता. त्यामुळे पालकांना समजेल असा, भविष्याचा वेध घेईल असा 'तंत्रज्ञान' हा सार्थ शब्द या नावामध्ये अंतर्भूत करण्यात आला.
सन २०१३-१४ मध्ये 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' या विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संचालनालयाने एक समिती नेमली. त्या समितीमध्ये विज्ञान आश्रमासंबंधित अनेक व्यक्तींचा सहभाग होता. काही बाहेरील तज्ज्ञ व्यक्तींनादेखील त्यामध्ये निमंत्रित केले होते. नवीन राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण आराखड्यानुसार या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी या समितीने काम केले. त्या समितीच्या बैठकांमध्ये 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख'(आय.बी.टी.) या नावावर पुनर्विचार करण्यासंबंधी सखोल चर्चा केली. नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित असल्यामुळे या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायासाठी वेगवेगळी विभागीय कौशल्य मंडळे (सेक्टर स्किल काऊंसिल्स) आहेत. आय.बी.टी. हा बहुविध कौशल्याचा अभ्यासक्रम असल्याने याचा कोणत्या सेक्टर स्किल काऊंसिलमध्ये समावेश करावा, हा प्रश्न शासकीय अधिकार्‍यांसमोर होता. त्यावर असा विचार झाला की, विद्यार्थ्यांसाठी ही मूलभूत कौशल्ये अत्यंत आवश्यक आहेत, त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी आग्रह पूर्वक मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाने मांडावा. १९८७ पासून महाराष्ट्र राज्यात या विषयावर मुलभूत काम झाल्यामुळे शासकीय अधिका-यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. समितीतील तज्ज्ञांना चर्चे मध्ये 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' या अभ्यासक्रमातील 'ओळख' हा एक शब्द वगळावा असे सुचवले. IBT मध्ये जरी एखाद्या कौशल्याचा परिपूर्ण समावेश नसला तरी अनेक मूलभूत कौशल्यांचा समावेश आहे, त्यामुळे यातील 'ओळख' हा शब्द केवळ मर्यादा दर्शवितो, तर तो वगळून त्यातील निव्वळ 'मूलभूत तंत्रज्ञान'(Basic Technology - बी.टी.) एवढेच नामकरण देऊन हाच अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा प्रस्ताव तज्ञ समितीतर्फे मांडला गेला.
त्या सदर प्रस्तावास पुढे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संचालनालयाने मान्यतेसाठी भोपाळ, मध्यप्रदेश येथील पंडीत सुंदरलाल शर्मा व्यवसाय प्रशिक्षण संस्थेकडे मान्यतेसाठी पाठविले.
त्यानंतरच्या काळामध्ये अभ्यासक्रमाबाबत काय घडामोडी घडल्या याची कल्पना नव्हती. परंतु पंडीत सुंदरलाल शर्मा व्यवसाय प्रशिक्षण संस्था, भोपाळ, मध्यप्रदेश व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यातील काही अधिकार्‍यांनी आणि एका NGO च्या सुचनेने IBT या विषयाचे नाव बदलून कोणतीही बैठक न घेता, कुठल्याही विहित नियम न पाळता अगदी आतताईपणे बेसिक टेक्नोलॉजी अभ्यासक्रम 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स' या नावाने राबविण्याचा निर्णय घेतला व तशी मान्यता व्यवसाय शिक्षण विभागाला पाठवली.
ज्या महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संचालनालयाने नेमलेल्या तज्ञ समितीने 'मूलभूत तंत्रज्ञान हा अभ्यासक्रम अधिकृतरित्या बनविला होता, व सदर अभ्यासक्रम पंडीत सुंदरलाल शर्मा व्यवसायप्रशिक्षण संस्था, भोपाळ येथे मान्यतेसाठी पाठविला होता, त्यांनाही नाव परिवर्तना बाबत कोणतीही कल्पना दिली नाही.
बरेचदा असे घडते की एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आपला विशेष सहभाग नाही, ही जाणीव काहींना असते परंतु आपण काहीतरी करावे असा उत्साह अश्या मंडळींना असतो आणि अशाप्रकारे नामकरणाच्या फुटकळ गोष्टी करून आपले योगदान सिद्ध करू पाहणारी मंडळी आपला कार्यभाग साधतात, तसेच येथेही घडले असावे. केवळ काही लोकांची इच्छा म्हणून IBT नाव बळी पडले. आणि IBT चे नाव  बदलून 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स' असे केले.
खरं नावामध्ये काय आहे असे म्हणतात, परंतु आय.बी.टी. हे नाव त्या विषयाची ओळख म्हणून ख्याती पावलेले नाव होते. अनेक वर्ष हे जनसामान्यांना पटलेले आणि उमगलेले नाव होते. विशेषतः महाराष्ट्रात आय.बी.टी. या नावाला एक वेगळी तंत्रज्ञानयुक्त अशी ओळखही प्राप्त झाली होती. आय.बी.टी. नावामधून विद्यार्थ्याला एकप्रकारचा आशादायी दृष्टिकोन मिळतो, पालकांनाही भूमिका स्पष्टपणे सांगता येते, आय.बी.टी. कार्यक्रमाचे नाव ऐकताच पालकांशी सहज संवाद साधता येतो तसेच त्यांच्याकडून उत्तम प्रतिसादही मिळतो, असा बहुआयामी विचार केला गेला होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यक्तिमत्व घडण करणारे अनेक पूरक विषय त्यांच्यात रुजवायचे, असा परिपूर्ण विचार न करता केवळ बहुविध कौशल्य देणे हा मर्यादित हेतू ठेवून या विषयाचे नाव हेकेखोरवृत्तीने बदलले गेले.
IBT चे नाव बदलले या घटनेविषयी विज्ञान आश्रमास जेव्हा समजले, तेव्हा विज्ञान आश्रमाद्वारे ताबडतोबपणे याविषयीची तक्रार PSSCIVE व DVET , RMSA यांना पत्राद्वारे कळविली गेली. परंतु तोपर्यंत PSSCIVE भोपाळच्या संस्थेने त्या विषयाच्या प्रस्तावाची मान्यता MHRD ला पाठविलेली होती.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई येथील अधिकार्‍यांनी ३५० शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण राबवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. आता नाव बदलण्यासाठी जर वरिष्ठ पातळी वर तक्रारी केल्या गेल्या तर कदाचित ३५० शाळांमध्ये सदर व्यवसाय शिक्षण राबविण्याची जी योजना सादर केली आहे ती राबविण्यास अनेक अडथळे उभे राहतील, त्यावर अनेक प्रश्न निर्माण होतील, आणि शिवाय नावामध्ये काय आहे ? तुमच्या कार्यक्रमाच सगळाच तपशील आम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे नावाबद्दल , तुम्ही फारशी चर्चा करू नका, फारसा आग्रह धरू नका अशी अनेक कारणे सांगून शासकीय अधि कार्‍यांनी माझी समजूत घातली. मला असे आश्वासन दिले गेले कि 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स' हे सेक्टर चे नाव आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 'बेसिक टेक्नॉलॉजी' या नावानेच कार्यक्रम राबवूयात, असे तोंडी आश्वासन अधिकार्‍यांनी मला दिले. दुर्दैवाने केवळ सुरुवातीचा आमचा विरोध डावलण्यासाठी आमची ती समजूत काढली गेली हे कालांतराने माझ्या लक्षात आले. २०१५ च्या व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या पुस्तिकेत ‘बेसिक टेक्नोलॉजी (मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स)’ असे नाव होते ते २०१६ मध्ये  अभ्यासक्रम पुस्तिकेत फक्त 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स' नाव छापलेले आहे.
विज्ञान आश्रमामधील सहकार्‍यांनी एकत्र येऊन आपआपसात नाव बदलावर चर्चा केली. एखाद्या कल्पनेचे व्यापक स्वरूपात स्वीकार होतांना त्या गोष्टीच्या मूळ स्वरूपामध्ये अनेक पैलू पडतात, त्यातील काही गोष्टी अपरिहार्यपणे बदलतात व त्याच्या मूळ कर्त्याच्या नियंत्रणा बाहेर ब-याच  गोष्टी जाताअशा दृष्टीने आपण या घटनेकडे पहावे. त्यामुळे आय.बी.टी. नाव बदलाचा किती पाठपुरावा करावा याचा आम्ही पुनर्विचार केला. आणि सरतेशेवटी आम्ही ही नाव बदलायची मागणी ही फारशी लावून न धरण्याचे ठरवले.

आमचा असा दृढ विश्वास आहे की, बर्‍याच वेळा शासकीय धोरणांमुळे वा आग्रहांमुळे काही नावे बदलली गेली तरी जनमानसांमध्ये त्या गोष्टीचे मूळचे नाव हे कायम राहते. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुण्यामधील अनेक ठिकाणं अशी आहेत की ज्यांची नावे शासकीय बडग्याने बदलली परंतु ती अजूनही त्या ठिकाणाच्या मूळ नावानेच किंवा त्याच्या प्रसिद्ध नावानेच ओळखली जातात म्हणजे उदाहरणार्थ नळस्टॉप, डेक्कन, नाशिकमधील शालीमार, या नावांना जरी पर्यायी नावे शासनाच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेली असली तरी त्यांना लोकमान्यता नसल्याने जुन्या नावानेच ती ओळखली जातात, तशाप्रकारे आय.बी.टी.ला लोकमान्यता मिळालेलीच आहे आणि त्यामुळे लोकमानसामध्ये तरी आय.बी.टी. अर्थात्‌ Introduction to Basic Technology 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' या नावानेच हा कार्यक्रम ओळखला जाईल, आणि लोक याच नावाचा वापर करतील, अशी मला आशा आहे. शासकीय दरबारी कागदोपत्री किंवा मान्यतेसाठी आपल्याला 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स' हे नाव वापरायला लागेल, हे अपरिहार्यपणे दिसते आहे. परंतु आय.बी.टी.चे मूळ तत्त्व, तो ज्या उद्देशाने बनविलेला आहे तो मूलभूत उद्देश किंवा 'मल्टीस्किल फाऊंडेशन कोर्स'च्या प्रस्तावनेमध्ये जी तत्त्वे आय.बी.टी.च्या रिव्हीजन समितीने व्यक्त केलेली आहेत, त्या सगळ्याला आपण बांधील राहिलो तर मात्र 'नावामध्ये काय आहे ? जे काही आहे ते तत्त्वात आहे !' असे म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला हा कार्यक्रम त्याचे तत्त्वपुढे नेता येईल.

No comments:

Post a Comment