IBT ची मान्यता व डॉ.पतंगराव
कदम यांची मदत
२००६ साली IBT हा केवळ १६ शाळांमध्ये होता. शासकीय अनुदानावर
चालणारे V२/V३ अभ्यासाक्रमाची स्थिती फारशी चांगली नव्हती. शालेय स्तरावर व्यवसाय
शिक्षणाचा उपयोग होत नाही. पूर्व
व्यावसायिक अभ्यासक्रम हे बंद करायचे असा प्रस्ताव सुध्दा काही अधिका-यांनी तयार
केला होता. त्या दरम्यान मी पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व कार्य केंद्री
शिक्षणाच्या आवश्यकते बाबत व IBT कार्यक्रम १०० शाळांमध्ये राबवण्यासाठी परवानगी
मागण्यासाठी मंत्रालयात जाऊ लागलो. एकदा एका सचिवांनी अशी मान्यता देणे हे आमच्या
अधिकारात नाही तर त्याला मंत्र्याची परवानगी लागते असे सांगितले. मग मी शिक्षण
मंत्री व तंत्र व व्यवसाय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊ लागलो. म्मत्र्याभोवतीच्या
गर्दीत आम्ही सांगितलेले मंत्र्यांना किती समजले व आमचे निवेदन कोणी वाचत असेल का
नाही ? या भावनेने निराशा यायची.
IBT अभ्यासक्रम राबवणारी बेलेवाडी ची शाळा ही भारती विद्यापीठाची होती. त्या
शाळेचे मुख्य श्री.आनंदराव पाटील हे डॉ.पतंगराव कदम यांचे सहकारी होते. IBT कार्यक्रमाचे आनंदराव
पक्के पुरस्कर्ते व आधारस्तंभ आहेत. आनंदरावांनी शाळांच्या मान्यते साठी डॉ.पतंगराव
कदम यांची मदत घ्यायची व त्यासाठी सर्व
पाठपुरावा करण्याची जबाबदारी घेतली. पतंगरावांशी त्यानंतर अनेकदा भेट झाली.
त्यांना बेलेवाडीला नेऊन IBT दाखवला. त्यांच्या संस्थेतील इतर सहका-यांना पण IBT कार्यक्रम समजाऊन
सांगितला. मा. दिलीप वळसे पाटील हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व मा. वसंत पुरके हे
शिक्षण मंत्री असतांना डॉ.कदमांच्या उपस्थितीत शालेय स्तरावर व्यवसाय शिक्षणावर
बैठक झाली. २००७ साली आम्हाला IBT हा १०० शाळात नेण्यासाठी परवानगी मिळाली. IBT कार्यक्रम नव्याने सुरु
केलेल्या २८ शाळांना मान्यता पण मिळाली. या पाठपुराव्या साठी मी किमान ११ वेळा मुंबईला
गेलो. मुंबईला जाणे हे खर्चिक असे व वेळा खाऊ असे. त्या काळी विज्ञान आश्रमातील
आर्थिक अडचण पण असे. आनंदरावांनी यावर मार्ग काढला. ते स्वत: माझ्या बरोबर मुंबईला
येत. त्यांच्या ( भारती विद्यापीठाच्या) गाडीत आम्ही जात असू. आनंदराव त्यांची चिकोत्रा
ची कामे पण करत व IBT ची पण कामे होत. IBT कार्यक्रम शासनाने सार्वत्रिक करावा , IBT चा मुख्य विषयात समावेश
करावा म्हणून मी व आनंदराव एकदा नागपूर
अधिवेशनाच्या वेळी नागपूरला गेलो. तेथे नागपुरातील कॉग्रेस च्या स्थानिक
कार्यकर्त्याच्या माध्यमातून IBT मागणी आम्ही पतंगरावांच्या समोर मांडली.
या सर्व पाठपुराव्यातून सर्व शिक्षा अभियानात ‘नाविन्यपूर्ण
प्रकल्प’ म्हणून २० शाळांमधून ५ वी ते ७ वी साठी ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ विज्ञान
आश्रमाने तयार केला व शासकीय अनुदानातून राबवला. वर्षभराने शासकीय अनुदान न
मिळाल्याने तो थांबला. मात्र त्या कार्यक्रमातून जोडल्या गेलेल्या गावडेवाडी
सारख्या शाळा व निदेशक आमच्या बरोबर कायमचे जोडले गेले. हाच अभ्यासक्रम पुढे
छत्तिसगढ मध्ये पण राबवला जात आहे.
मला मंत्र्याच्या कडे निवेदन दिल्याने नक्की
किती फायदा झाला हे माहित नाही. मला स्वत:ला ते कंटाळवाणे वाटायचे. इतर
कार्यकर्त्या पेक्षा माझे म्हणणे डॉ.कदम लक्ष देऊन ऐकत. मात्र निर्णय पटकन व्हायचे
नाहीत. निवेदनावर सही घेतल्यावर परत अधिका-यांशी पाठपुरावा करावा लागायचा. आमच्या
प्रयत्नांचा परिणाम हा धीम्या गतीने होत होता.
पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची
अधिका-यांची भाषा हळू हळू बंद झाली. दरवर्षी पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना
मान्यता मिळण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात येणे सुरु झाले. मध्यंतरी कित्येक
वर्ष अशी मान्यता देणे शासनाने अघोषित रीत्या थांबवलं होते. IBT शाळांची संख्या वाढू
लागली.
आता IBT कार्यक्रम मुख्य विषय म्हणून स्वीकारला गेला
आहे. तो National Skills Qualification Framework चा भाग बनला आहे. शाळांची संख्या ३०० च्या वर गेली
आहे. अनेक संस्था स्वतंत्र पणे किमान IBT
राबवत आहे.
मात्र IBT च्या कसोटी च्या टप्प्यात ( १६
शाळा ते १०० शाळा ) ज्या अनेकांनी मदत केली. त्या पैकी डॉ.पतंगराव कदम होते.
त्यांचे ९ मार्च २०१८ ला निधन झाले. त्यांना IBT परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
सर खरच आपले प्रयत्न सार्थकी झाले प्रामाणिक प्रयत्न केला तर कधीतरी यश निच्चीत मिळते आपल्या धडपडीला। सलाम
ReplyDelete