Wednesday, November 20, 2019

फॅब Academy : स्वायत्त व मुक्त शिक्षण






फॅब अकेडमी (fab academy)

डॉ. नील ग्रेशान्फिल्ड यांच्या संकल्पनेतून जगभर ‘फॅब लॅब’ चे नेटवर्क उभे राहिले आहे. आज जगात १३००+ फॅब लॅब कार्यरत आहेत. ‘You can make almost anything’ हेच फॅब लॅबचे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक फॅब लॅब हि आवश्यक अशा आधुनिक मशीनने सुसज्ज असते. लेझर कटिंग मशीन, CNC मिलिंग, ३D प्रिंटर, व्हिनाईल कटिंग यांच्या जोडीला पारंपारिक हत्यारे व साधने यांचा या लॅब मध्ये समावेश होतो. या सर्व लॅब एकाच प्रकारची साधने व software वापरतात. त्यामुळे एका लॅब मधील डिझाईन हे दुस-या लॅब ला इंटरनेट व्दारे पाठवून ती वस्तू बनवता येते. या सर्व लॅब मध्ये सर्वांना काही अटीचे पालन करून व शुल्क देऊन मशीनचा वापर करता येतो. Learn , Make , share या तत्वाचे सर्व लॅब पालन करतात. 



कौशल्य शिक्षणाची नवी पध्दत : 

कमी खर्चात, तुमच्याच घरी जगातील सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध करून देण्याची क्षमता माहिती तंत्रज्ञानात आहे. त्याची विविध उदाहरणे पण समोर येत आहेत. काही महिन्यापूर्वी माझ्या मित्राने मला संकेतस्थळावर जेनेरिक औषधे कशी शोधायची हे शिकवले. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या नावावरून त्याच गुणधर्माची जेनेरिक औषधे तुम्हाला शोधता येतात. अशी औषधे शासनाने सुरु केलेल्या जनौषधीच्या दुकानातून घेता येतात. जेनेरिक औषधे ही ५०-९०% इतकी स्वस्त असतात. हे तंत्र शिकल्यानंतर मी तर जेनेरिक ओषधे वापरू लागलो. माझ्या कडून इतर अनेकांनी पण हे तंत्र शिकून घेतले. हे एक उदाहरण झाले. या प्रमाणे मोबाईलवरील विविध अॅप्स वापरायला आपल्यापैकी सर्वांनी गरजेनुसार शिकुन घेतले आहे. वरीलपैकी कुठलीच गोष्ट शिकण्यासाठी आपल्यावर बंधन नव्हते. त्याचा अभ्यासक्रम  नव्हता. प्रत्येकाने आपल्याला हव्या त्या गतीने आणि आवश्यक आहे तेवढी प्राविण्यता मिळवत ते ज्ञान मिळवले व वापरले.
  १९०० सालापर्यंत मानवी ज्ञान हे दर शंभर वर्षाला दुप्पट होत होते. १९४५ पर्यंत ते दर २५ वर्षांनी दुप्पट होऊ लागले आणि आता जगभरातील ज्ञान हे दरवर्षी मागील वर्षापेक्षा दुप्पट होत आहे. एवढे सर्व ज्ञान आत्मसात करणे कुठल्याही मनुष्याला अवघड आहे. पूर्वी वाचनालयात जाऊन, पुस्तके मिळवून, नोट्स काढून माहिती मिळवावी लागायची. आता इंटरनेटवर एका क्लिकवर माहिती मिळवता येते. त्यामुळे नव्या युगात, एखादी गोष्ट माहित असणे हे महत्वाचे नसून इंटरनेट वरून योग्य माहिती कशी मिळवायची आणि तिचा वापर करणे महत्त्वाचे कौशल्य झाले आहे.
संगणकाच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्स, ऑनलाइन टुटोरिअल इत्यादीच्या सहाय्याने अनेक कोर्सेस चालवले जातात. MOOC (massive open online courses) च्या पद्धतीने हजारोच्या संख्येने विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेत असतात. जगातील मान्यवर विद्यापीठांनी त्यांचे क्लासेस, व्हिडीओ हे इंटरनेट वर ठेवून ते मुक्त स्रोत म्हणून सगळ्यांना वापरण्यास उपलब्ध केलेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाने जगातील उपलब्ध ज्ञान मिळवण्याची क्षमता सर्वसामान्याला उपलब्ध झाली आहे. MOOC मध्ये हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असले तरी MOOC किंवा ऑनलाइन पद्धतीने कोर्स बाबत मुख्य आक्षेप म्हणजे या पद्धतीने कोर्स पूर्ण करणा-यांचे प्रमाण ५% पेक्षा कमी आहे. दुसरा आक्षेप असा कि प्रात्यक्षिका शिवाय, भौतिक जगाशी संबंधित ज्ञान केवळ आभासी पद्धतीने कसे परिणामकारक ठरेल? उदा. शेती, अभियांत्रिकी, शिवणकाम असे कौशल्य अभ्यासक्रम आभासी पद्धतीने कसे शिकता येतील ? शिक्षक व विद्यार्थी भौगोलिक दृष्ट्या दूर असल्याने परिस्थितीनुसार शिक्षण देता येईल का ?

How to make almost anything

MIT, USA मधील प्राध्यापक डॉ. नील ग्रेशनफिल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला फॅब अॅकेडमी हा कोर्सं हे स्वायत्त व मुक्त शिक्षणाचा आदर्श म्हटला पाहिजे. आभासी जग व भौतिक जग यांचा कसा समन्वय परिणामकारकपणे कसा करता येईल याचे फॅब अॅकेडमी  हे उदाहरण म्हटले पाहिजे. डॉ. नील हे MIT या संस्थेत ‘How to make almost anything’ नावाचा कोर्स चालवतात. सहा महिन्याचा हा कोर्स MIT तील विद्यार्थी क्रेडिट कोर्स म्हणून घेतात. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी सर्व कौशल्य तुम्हाला या कोर्स मध्ये शिकता येतात.
संगणीकृत आरेखनाच्या (drawing) मदतीने लेझर कटींग, ३D प्रिंटींग, CNC router अशी अत्याधुनिक मशीन वापरून मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरवाण्यास विद्यार्थी शिकतात. इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स, प्रोग्रामिंग करून वस्तू स्वयंचलित,प्रोग्रामवर चालणाऱ्या बनवायला शिकतात. विविध मशीन्स, रोबोट तसेच मोल्डिंग, कास्टिंगचा वापर अशा उत्पादनातील विविध प्रक्रिया विद्यार्थी शिकतात. आधुनिक अभियंता होण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्यांनी विद्यार्थी या कोर्समध्ये पारंगत होतो. मात्र या कोर्स ला फार मर्यादित विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच MIT त जाऊन शिकण्याची कोर्से फी पण प्रचंड असते.
मात्र गेल्या ८ वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. भविष्यातील मुक्त शिक्षणाचे चित्र तुम्हाला यात दिसेल.
   


विज्ञान आश्रम फॅब लॅब :
वर सांगितल्याप्रमाणे एक ‘फॅब लॅब’ ही  पाबळ या पुण्यापासून ७० कि.मी. वरच्या छोट्या गावात पण आहे.ही फॅब लॅब २००२ मध्ये सुरु झाली व जगातील पहिली फॅब लॅब (Fab Lab 0) असण्याचा मान पण विज्ञान आश्रमाला आहे. डॉ. नील ग्रेशनफिल्ड यांनी ८ वर्षापूर्वी फॅब लॅबच्या नेटवर्कचा वापर करून MIT तील ‘How to make almost anything’ हा कोर्स फॅब अॅकेडमी नावाने शिकवण्यास सुरुवात केली. जगभरातील विविध देशातील ८० फॅब लॅब मध्ये एकाचवेळी हा कोर्स चालतो. या कोर्सची कौशल्ये बघुयात :
        १)    प्रवेशासाठी पूर्व पात्रतेची अट नाही. विद्यार्थ्याने आवश्यक प्राविण्यता मिळवली की          तो उत्तीर्ण होतो. त्यामुळे १० वी– १२ वी झालेल्यांपासून M.Tech व अधिक पात्रतेचे          विद्यार्थी एकाच वेळेस या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.
        २)    अभ्यासक्रमाचा ‘शिकवण्याचा’ किंवा ‘वर्गाचा’ कालावधी सहा महिन्याचा असतो. या          कालावधीत दर बुधवारी (भारतीय वेळेनुसार) सायंकाळी ६:३० ते ९:३० पर्यंत डॉ.            नील हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वर्ग घेतात. त्यात इंटरनेटवरील विविध माहिती 
           स्त्रोत्रांची ते ओळख करून देतात.
        ३)    गुरुवार ते मंगळवार या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांनी डॉ. नील ने दिलेल्या                सूचनांनुसार फॅब लॅब मध्ये काम करून विविध संगणीकृत मशीन्स चा वापर वस्तू          बनवायच्या असतात.
        ४)    प्रत्येक विद्यार्थ्याने आपण केलेल्या कामांचे दस्तावजीकरण (documentation)              करायचे असते. त्यामध्ये व्हिडीओ, फोटो, डिझाईन फाईल्स, प्रोग्रामचा कोड यांचा            समावेश असतो. या माहितीचा वापर करून इतर कुठल्याही लॅबमध्ये ती वस्तू              निर्माण करता येईल इतकी स्पष्टता व अचूकता आवश्यक असते.    
        ५)    प्रत्येक फॅब लॅब मध्ये स्थानिक निर्देशक असतो. तो विद्यार्थ्यांच्या अडचणी                सोडवतो व त्यांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यास मार्गदर्शन करतो.
        ६)      विद्यार्थी त्यांना पडलेले प्रश्न सोशल मिडियाच्या माध्यामातून इतर विद्यार्थी,              निर्देशक किंवा डॉ. नील यांना विचारू शकतात.
        ७)    दर मंगळवारी प्रत्येक भौगोलिक क्षेत्रानुसार उदा. आशिया, आफ्रीका, द. अमेरिका            इ.’ऑनलाइन आढावा (रिव्हू) मिटिंग’ होते. त्यात प्रत्येक क्षेत्रातील वरिष्ठ निर्देशक          विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेतात. इंटरनेटवरील विविध माहिती स्तोत्रांचा वापर          विद्यार्थ्यांने करायचा असतो. कुठले यु ट्यूब व्हिडीओ बघावे, कोणते ट्युटोरिअल            (प्रशिक्षण पुस्तिका) अभ्यासावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. त्यामुळे            विद्यार्थी त्याच्या पूर्व ज्ञानानुसार व काठीण्य पातळी नुसार ज्ञान मिळवतो.
        ८)    पुढच्या आठवड्यातील बुधवारच्या वर्गाच्या सुरुवातीला १:३० तास डॉ. नील हे                               randomly कुठल्याही विद्यार्थ्याचे वेबपेज तपासतात व त्या आधारे विद्यार्थ्यांना            मार्गदर्शन करतात व पुढील सुधारणा सुचवतात. जगभरातील विद्यार्थ्यासमोर              आपले वेबपेज योग्य असावे याची काळजी सर्वच विद्यार्थी घेतात व त्यासाठी              मेहनत घेतात.


पूर्वीचे MIT मध्ये प्रवेश घेतांना येणा-या अडचणी उदा. मर्यादित विद्यार्थी संख्या, प्रवेश घेण्यात येत असलेले अडथळे, खर्च या सर्वावर फॅब अॅकेडमी मुळे मात करता आली आहे.
जागतिक स्तरावरील तज्ञ गुरु चे थेट मार्गदर्शन, प्रशिक्षित असा स्थानिक मार्गदर्शक यांचे प्रत्यक्ष वस्तू बनवतांनाचे मार्गदर्शन, फॅब नेटवर्क मधील वरिष्ठ निर्देशक व  सहाध्याही मित्र यांच्या मदतीने विद्यार्थी विविध वस्तू व प्रकल्प बनवतात व कौशल्य व ज्ञान प्राप्त करतात.
गेल्या काही वर्षात स्थानिक प्रश्नावर उत्तर शोधत अनेक विद्यार्थ्यांनी पाबळ मध्ये कोर्स पूर्ण केला आहे. या सर्व प्रकल्पांचे मूल्यमापन हे जागतिक तज्ञांकडून होत असल्याने कोर्स चा दर्जा राखला जातो.
अन्न गरम ठेवण्यासाठीचा heat retention box, सौर उर्जेवर बासुंदी करण्याचे यंत्र, बाजारातील भाजी वाल्यांसाठी उपयुक्त असा सौर कुलर, सांडपाणी व्यवस्थापन, शेती ला उपयुक्त स्वयंचलित यंत्रणा इ. अनेक प्रकल्प फॅब लॅब मधून पूर्ण झाले आहे.
फॅब अॅकेडमी च्या विद्यार्थ्यांचे (profile) काम इंटरनेट वर उपलब्ध असल्याने भविष्यात नोकरी मिळण्यासाठी किंवा उद्योग सुरु करण्यास त्याचा उपयोग होतो हा अनुभव आहे. 
     पाबळ सारख्या छोट्या गावात अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे हे पाहून बाहेरील विद्यार्थी पण येथे येऊ लागले आहेत. चंडीगढ, नागपूर, मुंबई, भूतान, तेलंगणा, बांगलादेश येथील विद्यार्थ्यानी हा कोर्स पाबळ मध्ये राहून शिकले. त्यानंतर त्यांच्या गावात /संस्थेत फॅब लॅब उभारून तेथे त्यांनी असा कोर्स सुरु केला आहे.


Academy of Many Things !
फॅब अॅकेडमीपासुन प्रेरणा घेऊन आता अनेक नवीन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत.          फॅशन डिझाईन मधील टेक्सटाईल्स अॅकेडमी, बायो टेक्नॉलॉजी मधील ‘बायो              अॅकेडमी’ डिझाईन अॅकेडमी’ मधून याच पध्दतीने उच्च दर्जाच्या तज्ञां कडून            ऑनलाईन व स्थानिक फॅब लॅब मधून प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुरु झाले आहे.
विज्ञान आश्रमाने हीच संकल्पना शालेय स्तरावर नेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.            पाबळमधून दर शनिवारी सकाळी ९:३० वाजता ‘मुलभूत तंत्रज्ञान’ या विषयावर              व्हिडिओ कॉन्फरन्स व्ह्रे तज्ञ मार्गदर्शक वर्ग घेतात. दर शनिवारी गेली वर्षभर १५ ते        २० शाळा व अंदाजे ५००-६०० विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यी आप-            आपल्या शाळेतील साधने वापरून प्रकल्प करतात व प्रत्यक्ष काम करत करत              शिकतात.
      इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असली व अनेक व्हिडिओ उपब्ध असले तरी            कोणते संदर्भ नेमकेपणाने बघावेत ? शिकतांना विद्यार्थ्याला सहाध्यायी आवश्यक          असतात.तसेच वेळेत अभ्यास पूर्ण करण्यासाठी काही बंधने आवश्यक असतात.            प्रात्यक्षिक करायला साधने उपलब्ध असणे, आलेल्या अडचणी चर्चा करायला              मार्गदर्शक असणे इ. सर्व आवश्यकता फॅब अॅकेडमी च्या  मॉडेल मध्ये पूर्ण होतात.
      त्यामुळे स्थानिक पातळीवरील संदर्भानुसार, मात्र जागतिक दर्जाची आर्थिक, शैक्षणिक        व सामाजिक बंधने ही प्रवेशासाठी असलेली अशी स्वायत्त व मुक्त शिक्षण व्यवस्था          आकारात आहे याचा मला विश्वास वाटतो. जिज्ञासूंनी खालील संकेतस्थळ जरूर            पहावे. 

                  
                    




No comments:

Post a Comment