Tuesday, August 14, 2012

विज्ञान आश्रमाचे हितचिंतक : डॉ.चि.मो.पंडीत



डॉ.चि.मो.पंडीत यांचे निधन झाले. ब-याच दिवसापासून ते आजारी असल्याचे माहीत होते. गेल्या २८ जुलैला त्यांना फ़ोन केला तेंव्हा बोलतांना त्रास होत आहे हे लक्षात आले होते.
पंडीत सर हे डॉ.कलबागांचे मित्र होते. पाबळ मध्ये वैचारिक गप्पा मारण्यासाठी , सहविचारासाठी म्ह्णून डॉ.कलबाग , पंडीत सरांना बोलावत. ते विज्ञान आश्रमाच्या व्यवस्थापन समितीवर १९९७ ते २००३ या काळात होते. मात्र २००३ मध्ये डॉ.कलबागांचे निधन झाल्यावर जेंव्हा व्यवस्थापन समिती पुर्नगठित झाली तेंव्हा आता तुम्ही तरुण मंडळीच व्यवस्थापन समिती वर घ्या असे सांगून ते बाजूला झाले. मात्र वि.आश्रमच्या कामाबाबत , अडचणींबाबत ते सतत जाणून घेत. मराठी विज्ञान परिषदे तर्फ़े डॉ.कलबागांच्या स्मृती प्रित्यर्थ एक चर्चासत्र आयोजित केले गेले. त्याच्या संयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती.

’आपण केलेली घाण आपणच साफ़ करावी’


३ ऑगस्ट च्या पुणे जिल्हा लोकमत मध्ये, शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ करुन घेतल्या बद्दल मुख्याध्यापकांना निलंबित केल्याची बातमी वाचली. इतर वर्तमान पत्रात पण त्या प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. त्यासंदर्भात ची दुसरी बाजू समोर मांडत आहे.
श्रम प्रतिष्ठा , स्वच्छतेचे महत्व सांगणारे सुविचार शाळेच्या फ़ळ्यावर नेहमीच दिसतात. निर्मलग्राम , स्वच्छता रॅली मध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच सहभागी करुन घेतले जाते. त्यांच्या कडून घोषणा देऊन घेतल्या जातात. मात्र त्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी मात्र आपण विद्यार्थ्यांना देत नाही.