Thursday, February 7, 2013

माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण नव्हे तर ’कार्य केंद्रि’ शिक्षण


उत्पादक कामाचे शिक्षणाचे माध्यम म्हणून असलेले महत्व विविध शिक्षणतज्ञ शिक्षण आयोगांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा [२००५]मध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला आहे. अभ्यासक्रम बनवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये १) शाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असावा.२) शिकणे हे घोकंपट्टी नसेल ३) अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांपर्यंत मर्यादित नसेल असे सुचवले आहे. प्रत्यक्ष कामातील सहभागातून विद्यार्थी ज्ञानाचे रुपांतर अनुभवात करु शकतील. त्यातून त्यांच्यात विविध मुल्ये, व्यवहारज्ञान, सृजनशीलता विकसित होतील व त्यासाठी प्राथमिकस्तरापासूनच 'कामातून' शिक्षण देण्याचे सुचवले आहे.

ज्ञान मिळवण्यासाठी : कार्यकेंद्रि शिक्षण


'प्रत्यक्ष  हाताने  काम  करणे' आपल्याकडे नेहमीच  कमी  दर्जाचे  मानले जाते. कारकुनी, कार्यालयीन कामाला पण  श्रेष्ठ  मानतो. खरंतर संशोधक, अंतराळ वीर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर ,कलाकार . अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशामध्ये त्यांच्या कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. ही कौशल्य केवळ पुस्तके ज्ञानातून नव्हे  तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विकसित होतात. विद्यार्थ्यांमधील धडपड करण्याची वृत्ती, कृतीशीलता, उपक्रमशीलता .अनेक  गुण विकसित होण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष हाताने काम करण्याची संधी मिळायला  हवी.

२१ व्या शतकासाठी : कार्य केंद्रि शिक्षण


१७व्या शतकापासून ते १९५० या काळात शास्त्रीय ज्ञानात दर पंधरा वर्षांनी दुप्पट  या  वेगाने ज्ञाननिर्मिती झाली. मात्र  संगणक क्रांतीने दरवर्षी ६६% या वेगाने नवीन ज्ञान वाढत  आहे. सध्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गणिती क्षमता   स्मरण शक्तीची परीक्षा घेतली  जाते. मात्र  या दोन्ही गोष्टी संगणक  आपल्यापेक्षा खूप उत्तम करू शकतो.