Tuesday, March 29, 2016

IBT – MSFC (Multi Skills Foundation Course) नावात काय आहे ?


IBT – MSFC नावात काय आहे ?

विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अर्थात्‌ एस.एस.सी. बोर्डाला 'ग्रामीण तंत्रज्ञान' या विषयासंदर्भात प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला फक्त तीन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 'ग्रामीण तंत्रज्ञान' हा विषय राबविण्यासाठीची परवानगी कलबाग सरांनी मागितली होती. त्यानुसार १९८७ साली एस.एस.सी. बोर्डाने पुणे जिल्ह्यातील पाबळ, धामारी आणि लोणी या गावातील तीन शाळांमध्ये 'ग्रामीण तंत्रज्ञान' कार्यक्रम राबविण्यासाठी मंजूरी दिली. त्याप्रमाणे हा कार्यक्रम सन १९८७ ते सन १९९० असा एकूण तीन वर्षे राबविला गेला. सन १९९० मध्ये 'ग्रामीण तंत्रज्ञान' या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यावेळी SSC अभ्यासमंडळातील तज्ज्ञ सदस्यांनी या विषयाचे मूल्यमापन केले आणि एक महत्त्वाची सूचना वजा बदल सुचविला, की विज्ञान आश्रमाने सुचविलेला विषय फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक असावा. ग्रामीण तंत्रज्ञान या विषयामध्ये शिकवल्या जाणा-या संकल्पना व कौशल्ये यांची गरज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आहे. हा विषय सर्व शाळांमध्ये राबविला गेला पाहिजे. या विषयाची व्याप्ती व विस्तारक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाहता या विषयाचे 'ग्रामीण तंत्रज्ञान'  हे नाव बदलून अधिक व्यापक संबोधन असणारे नाव ठेवावे. या विषयाला अधिक व्यापक नाव सुचविणे हिताचे ठरेल, अशी चर्चा झाली. आणि त्यावेळच्या चर्चेनुसार या विषयाचे नाव 'मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख' अर्थात्‌ Introduction to Basic Technology (I.B.T.) असे अतिशय व्यापक नाव द्यावे, असा निर्णय सन १९९० मध्ये सर्वानुमते घेण्यात आला.