Monday, January 16, 2012

कृतीशिलता व बुध्दीमत्ता विकासासाठी कौशल्य शिक्षण हवे

कृतीशिलता व बुध्दीमत्ता विकासासाठी कौशल्य शिक्षण हवे
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री.कपिल सिब्बल यांनी पारंपारिक आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षणाची शालेय पातळीवर सांगड घालण्यासाठी सीबीएसी शाळांमध्ये कौशल्य शिक्षणाचा समावेशाचा निर्णय झाल्याची माहीती ’एज्युकॉन २०११’(सकाळ १८ सप्टें २०११) मध्ये दिली. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने व्यवसाय शिक्षणाबाबत जी श्रीमती .स्वाती मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने पण माध्यमिक शिक्षणात ’व्यवसाय पूर्व’ शिक्षण अनिवार्य करण्याची शिफ़ारस केली आहे.
शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असतांना , घोकंपट्टी वर आधारित पुस्तकी शिक्षणाच्या अपयश व मर्यादा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. वाढत्या बेकारी मुळे व युवकांमधील वाढत्या निष्क्रीयतेमुळे ’शिकायचे कशासाठी? शिकून काय होणार आहे ?’ हा प्रश्न ही वैफ़ल्यग्रस्त पालकांकडून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची घोषणा व महाराष्ट्रातील समितीचा अहवाल स्वागतार्ह आहे.
मात्र शालेय स्तरावर कौशल्य शिक्षणाचा अंर्तभाव करण्यासाठी जी कारणे व त्यातून अपेक्षित साध्ये (उद्दीष्टे) मांडली आहेत त्यातून चांगल्या हेतूने मांडल्या गेलेल्या या कल्पनेच्या भविष्यातील यशस्वीते बाबत शंका येते.
व्यवसाय शिक्षण व बेरोजगारी
सामान्यत: बेरोजगारी साठी उत्तर म्हणून व्यवसाय शिक्षण दिले पाहीजे हे सामान्य मत आहे. मात्र व्यवसाय शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेले आपल्याला सभोवती बरेच जण दिसतात. मी अमुक एका प्रकारचे कौशल्य घेतले आहे व त्या कामातील नोकरी मला मिळत नाही म्हणून बेकार फ़िरणा-यांची संख्या खुप आहे. पदविकाधारक , अभियांत्रिकी आदी चे प्रशिक्षण घेणा-यांतील बेकारी पण केवळ व्यवसाय शिक्षण पुरेसे नाही हे दाखवते.  NSS61 2004-5 च्या सर्वेक्षणानुसार बेरोजगार व्यक्तींमध्ये व्यवसाय शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे.
दुसरी कडे काम आहे पण युवकांमध्ये काम करण्याची वृत्ती नाही. नविन शिकून घेण्याची व कष्ट करण्याची तयारी नाही अशी पण तक्रार ऎकू येते. थोडक्यात केवळ व्यवसाय शिक्षणाने प्रश्न मिटेल असे मानणे चुकीचे आहे.
पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचा आढावा  
शालेय स्तरावर व्यवसाय शिक्षण ही कल्पना नवी नाही. आपल्या कडे पूर्वी पासून तांत्रिक शाळा होत्या. आठवड्यातील एक दिवस विद्यार्थी ’तांत्रिक शाळॆत’ जाऊन शिक्षण घेत असत. १९८६ च्या ’राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार; पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अनेक शाळांमध्ये सुरु झालेत. सध्या महाराष्ट्रात दरवर्षी ३६००० विद्यार्थी शालेय स्तरावर ’पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम’ घेत आहेत. मात्र एकूण विद्यार्थी संख्येचा विचार करता हे प्रमाण ४% इतकेच आहे. मध्यंतरीच्या काळात शासनाने विना अनुदान तत्वावरच पूर्व व्यावासायिक शाळांना मान्यता देण्याचे धोरण ठरवल्यामुळे फ़ार कमी शाळांनी हे अभ्यासक्रम सुरु केले. तसेच हे विषय ऎच्छीक असल्याने, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम नको म्हणून पालकांनी पण या अभ्यासक्रमांचा आग्रह धरला नाही.
दुसरी कडे सरकारने माध्यमिक शाळांमधील व्यवसाय शिक्षणाचे ’शैक्षणिक महत्व’ लक्षात न घेता केवळ ’व्यवसाय शिक्षण’ म्हणून या कडे बघितले. महाराष्ट्रात या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्यवसाय शिक्षण खात्याकडे दिली. त्यामुळे माध्यमिक शाळा या शिक्षण खात्याकडे, परिक्षा ही SSC  बोर्ड कडे मात्र अंमलबजावणी ’व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण’ खात्या कडे अशी गुंतागुंतीची रचना झाली. समन्वयातील अडचणींमुळे संबंधितांना हे कटकटीचे वाटू लागले व शासन पातळीवर ही या कार्यक्रमाच्या प्रसाराबाबत अनास्था निर्माण झाली. व्यावसायिक पूर्व अभ्यासक्रमाची साधन सामुग्री , अभ्यासक्रम हे सर्व ITI च्या ट्रेड प्रमाणे बनवले गेले. व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली. व्यवसाय पूर्व अभ्यासक्रम १० वी त पूर्ण करणारा विद्यार्थी हा १४ ते १५ वर्षाचा असतो. साहजिक १८ वर्षांपर्यंत त्याने काम करणे अपेक्षित नसते. त्यामुळे शासनातील ब-याच मंडळींनी पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचा फ़ायदा होत नाही अशी ओरड केली. या अभ्यासक्रमावर होणारा खर्च व किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला अशी निरर्थक तुलना केली गेली.
इ.१ ते १० वी पर्यंत मराठी वा इंग्लिश शिकलेल्या विद्यार्थ्यांकडून कवी व लेखक होण्याची अपेक्षा बाळगली जात नाही. मात्र शाळेत व्यावसायिक पूर्व शिक्षण घेतलेल्यां कडून किती मुलांना नोक-या मिळाल्या हे विचारुन कार्यक्रमाच्या मुल्यमापनावर चर्चा केल्या गेल्या. ही परिस्थिती जवळ जवळ सर्व राज्यात होती. त्यामुळे ब-याच राज्यातील पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम बंद पडले.
महाराष्ट्रात मात्र हा कार्यक्रम चालू ठेवला गेला. महाराष्ट्रात नयी तालीम पासून मुलोद्योगावर आधारित शिक्षणाचे विविध प्रयोग झाले होते. विज्ञान आश्रमाने १९८३ पासून ’व्यवसाय पूर्व’ अभ्यासक्रमात विविध प्रयोग केले. महाराष्ट्र सरकारने पण विज्ञान आश्रमाने तयार केलेला ’मुलभुत तंत्रज्ञानाची ओळख’ या अभ्यासक्रमास मान्यता दिली. तसेच इतर ही अभ्यासक्रम उपलब्ध केले. म.गांधी, विनोबा भावे , तुकडोजी महाराज, डॉ.कलबाग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन शालेय स्तरावर ’उत्पादक कामाच्या’ अंतर्भावाचा आग्रह धरला.

कार्यकेंद्री शिक्षणाची गरज
’हाताने काम करत करत शिकणे’ ही शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे. या पध्दतीनेच लहान मुल भाषा शिकते. आपल्या ज्या गोष्टी करता येतात उदा. संगणक वापरणे, गाडी चालवणे, पोहणे, स्वयंपाक करणे, एखादी वस्तू दुरुस्त करणे इ. त्या आपण ’काम करत शिकत असतो’. समाजातील अनेक यशस्वी व्यक्तींनी कुठल्याही औपचारिक शिक्षणाशिवाय यश मिळवलेले आहे. याचे कारण सुध्दा त्यांनी बालपणात मिळवलेल्या विविध अनुभवात व त्यातून झालेल्या शिक्षणात आहे.
आपण १० वी पर्यंत केवळ पुस्तकी शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमधील क्रियाशीलता ही लोप पावते. धडपडणे , उद्योगी असणे हे गुण लहानपणा पासूनच रुजवावे लागतात. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील (NCF2005)’कार्य आणि शिक्षण’ या अभ्यासगटाने ’कार्यकेंद्री शिक्षणाबाबत अभ्यासपूर्ण शिफ़ारशी केल्या आहे. ’कार्य शिक्षण’ हा वेगळा विषय न मानता तो शिकवण्याच्या पध्दतीचा भाग बनला पाहीजे. तसेच व्यवसाय शिक्षण हा वेगळा विषय न शिकवता ’, ’उत्पादक कामाला’ केंद्र स्थानी ठेवून विविध विषयातील शैक्षणिक तत्वे ही शिकवली जायला हवी अशी भुमिका मांडली आहे.
माध्यमिक स्तरावरुन विविध ट्रेडचे उदा. पुण्यात वाहननिर्मिती वर आधारित अभ्यासक्रम सुरु करणे ही केंद्रीय मंत्र्यांची घोषणा ही NCF च्या भूमिकेच्या विरुध्द आहे.
सुदैवाने आपल्या कडे कार्य केंद्री शिक्षण कसे देता येईल याची बरीच उदाहरणे आहेत. सेवाग्राम मधील आनंद निकेतन , कोल्हापूरचे सृजन आनंद यांनी माध्यमिक स्तरावर हे कसे करता येईल हे दाखवले आहे. माध्यमिक स्तरावर ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणा-या ७० च्या वर शाळा मध्ये ’कार्य केंद्री’ शिक्षणाच्या दृष्टीने धडपड चालू आहे. या शाळामध्ये ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी , उर्जा पर्यावरण , कृषी – पशूपालन, गृह आरोग्य , खाद्य पदार्थ निर्मीती आदी सर्व बहुविध कौशल्यांचे शिक्षण विदयार्थी घेतात. शिकत असतांना गावाला सेवा देणे, निर्माण झाल्यांची वस्तूंची विक्री करणे अशी कामे करत, लोकोपयोगी सेवा देत विद्यार्थी विविध अनुभव मिळवतात. अशी प्रकारची कामे केली की विद्यार्थ्यांच्या गुववत्ते मध्ये , त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फ़रक पडतो हे खुप अभ्यासांमध्ये सिध्द झाले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात ’कार्यकेंद्री शिक्षणाचा’ आग्रह धरायला हवा.
नविन नावे व नवे स्वरुप ( Innovation lab / Design Lab / Fab lab)
आपल्याकडे हुशार मुलांनी हातानी कामे करणे हे नेहमी कमी दर्जाचे मानले आहे. पुस्तकी ज्ञानाला आपण शिक्षण मानतो. मात्र जगभर या कल्पनेला छेद देणारे संशोधन होत आहे.
सध्या जगभर D-I-Y (Do-it-yourself) ही चळवळ फोफावत आहे. एखादी चकचकीत गोष्ट विकत आणण्या पेक्षा ही मी स्वत: बनवलेली वस्तू ! याचा अभिमान बाळगणा-यांची संख्या वाढत आहे. आम्हाला आलेल्या अडचणींवर आम्हीच उत्तर शोधू Ê आम्हाला आलेला नविन कल्पनांना आम्हीच मुर्त स्वरुप देऊ व We can make almost anything !’ असे घोष वाक्य घेऊन काम करणा-या Fab Lab पण जगभर पसरत आहेत. फ़ॅब लॅब म्हणजे गावात अशी एखादी जागा असेल की जिथे योग्य ती सर्व हत्यारे असतीलÊ साधने असतील. व त्या ठिकाणी कोणालाही जाऊन आपल्याला स्व:ला काम करुन हवी तशी वस्तू बनवता येतील. फ़ॅब लॅबच्या कल्पनेची सुरुवात पाबळ येथील विज्ञान आश्रमात झाली. पहीली फ़ॅब लॅब पाबळला सुरू झाली. आता जगभरात ४४  देशांतील १०० पेक्षा जास्त ठिकाणी फ़ॅब लॅब सुरू झाल्या आहेत.

अमेरीकेतील क्लेव्हलॅन्ड येथे STEM (Science, Technology, Mathematics in Education) या प्रकल्पांअंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज २ तास फ़ॅब लॅबमध्ये काम करावे लागते. विद्यार्थी नविन कल्पनांवर /प्रश्नांवर प्रकल्प करतात. या प्रकल्पांमधून विविध विषयांशी समावेय केला जातो. स्टॅन्डफ़ोर्ड विद्यापीठाने fablab@school नावाचा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. मॉस्कोमधील शाळांमध्ये हाताने काम करण्याचा विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तेवर होणारा परिणाम दाखवून दिला आहे.
या सर्वांनी असे मांडले आहे की शाळेमध्ये अशी जागा हवी की जिथे रुढ शिकवणे अशक्य व्हावे. थोडक्यात शाळेमध्ये हातानेकाम करण्यासाठी कार्यशाळा असायला हवी.

शिक्षणाचे उद्दीष्ट
शाळेत व्यवसाय शिक्षणाचा अंर्तभाव करण्यासाठी चे मुख्य कारण हे भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात विविध कामगारांची गरज हे दिले जाते. जर अशा शिक्षणाचा पर्याय ठेवला तर कदाचित केवळ गरिब पाल्यांसाठी हे शिक्षण असा समज केला जाईल. आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गातील विद्यार्थी माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षणाचा पर्याय स्विकारणार नाहीत. गरिबांसाठीच्या शाळात सुध्दा नाईलाजाने ’व्यवसाय शिक्षण’ स्विकारले जाईल. नयी तालीम राबवतांना या सर्व चुका आपण पुर्वी केलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बदलांचा सर्वच माध्यमांच्या व बोर्डाच्या शाळांमध्ये समावेश हा अनिवार्य झाला तरच हे बदल सकारात्मक परिणाम दाखवू शकतील.
उद्योगांच्या गरजांप्रमाणे मनुष्यबळाचा पुरवठा करणे हे शिक्षणाचे उद्दीष्ट नाही. तर शिक्षणाचे क्रियाशील , सृजनशील व लोकशाही मुल्यांवर निष्ठा ठेवणारा नागरिक घडवणे हे आहे.
असा नागरिक घडवण्यासाठी आपल्याला केवळ घोकंपट्टीवर आधारलेले ’पुस्तकी शिक्षण’ उपयोगाचे नाही आणि त्यासाठी ’कार्य केंद्री’ शिक्षणाचा आग्रह आपण धरायला हवा.
त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उपक्रमशीलता , व्यक्तीमत्व विकास , संघ भावना, मुल्ये , व्यवहार ज्ञान , संवाद कौशल्य तसेच दररोजच्या जीवनातील प्रश्न, शालेय विषयातील तत्वे वापरुन सोडवता येणे या सर्व उद्दीष्ट्यांच्या पूर्तीसाठी शालेय स्तरावर ’पूर्व व्यवसायिक’ अभ्यासक्रमाचा समावेशाचा विचार व्हायला हवा.


डॉ.योगेश कुलकर्णी
विज्ञान आश्रम , पाबळ जि.पुणे ४१२४०३



    

1 comment:

  1. The post is very comprehensive. Congratulations for the same Yogesh! Any take on a way of learning variously named as vocational education/trade education and many other names is rooted in a social perspective. There are more than one social perspective about the so-called problem of vocational education and it can not be understood fully unless it is recognized as part of the larger process of education. You have brought it out very well.

    By the token of holistic approach which I am trying to elucidate over here, today's hihgly structured but dissected education system is so because the larger social system is so.

    Therefore, the problem of goals of vocational education can not be treated in isolation. Any take on the problem of voational education or education in general is ultimately a 'political' statement as through the statement we express a desired state of education. What I desire is definitely going to be different from next person which holds the seeds for conflict and thus politics.

    If I understand it correctly, today's vocational education is being delivered through channels like ITIs and similar institutions that are largely modeled after the modern workplaces. This influence is obvious. The question you have implicitly raised is whether the reverse could happen. When would the learning place start influencing the workplace?

    At least while seeking answer to the above 'political' question,we need to keep asking how far the current social and political order be changed and towards what? At this point I remember the questions posed by Frere and Illich and for that matter our own MK Gandhi.

    ReplyDelete