Thursday, February 7, 2013

२१ व्या शतकासाठी : कार्य केंद्रि शिक्षण


१७व्या शतकापासून ते १९५० या काळात शास्त्रीय ज्ञानात दर पंधरा वर्षांनी दुप्पट  या  वेगाने ज्ञाननिर्मिती झाली. मात्र  संगणक क्रांतीने दरवर्षी ६६% या वेगाने नवीन ज्ञान वाढत  आहे. सध्या शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची गणिती क्षमता   स्मरण शक्तीची परीक्षा घेतली  जाते. मात्र  या दोन्ही गोष्टी संगणक  आपल्यापेक्षा खूप उत्तम करू शकतो.
त्यामुळे केवळ  माहिती  असणे पुरेसे  होणार नाही  तर माहितीचे उपयोजन कसे करायचे? उपलब्ध माहितीचा सृजनात्मक  रितीने  प्रश्न सोडविण्यासाठी  कसा  उपयोग करायचा  ही  नवीन कौशल्ये आपल्याला  विद्यार्थ्यांना  शिकवावी लागणार आहेत. प्रत्यक्ष  जीवनातील आव्हाने  हे कधीही  विज्ञानाचा प्रश्न ,गणिताचा प्रश्न , भूगोल  किंवा सामाजिक शास्त्राचा  प्रश्न असे स्वतंत्रपणे आपल्या समोर येत नाहीत. प्रश्न सोडवतांना विविध विषयातील संकल्पनांचा एकत्र विचार  करावा  लागतो. उदाहरणार्थ घराला रंग देतांना त्याचे सायन शास्त्र ,गणित ,घराच्या भिंती व त्यांची रचना,  त्या भागातील  पावसाचे प्रमाण , रंगाची आवड ,  सौंदर्य दृष्टी, आर्थिक तरतूद या सर्वांचा विचार करून  रंगाची निवड  करावी लागते.  इंटरनेटवर  यातील प्रत्येक  घटकावर  भरपूर माहीती उपलब्ध आहे . मात्र त्यातील योग्य माहीती मिळवून तिचा अचूक निर्णय घेण्यासाठी उपयोग करण्याचे कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेतून ’उत्पादक कामात’ भाग घेण्याची संधी मिळाली तर अशा 
कामाला केंद्रस्थानी ठेऊन विविध विषयातील संकल्पना समजून घेणे शक्य होईल. या पध्दतीमुळे प्रत्यक्ष व्यवहारात ’काम’ करण्यासाठी माहीती कशी मिळवायची व तिचा उपयोग विद्यार्थी शिकू शकतील. या शिकण्याच्या पध्दतीला ’कार्य केंद्रि’ शिक्षण पध्दत म्हणतात.
जगभरातील शिक्षणावरील प्रयोग
२१व्या शतकातील शिक्षण कसे असावे या साठी वेगवेगळ्या नावाने जगभर प्रयोग चालू आहेत. त्या सगळ्यां रोख शाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण मिळाले पाहिजे व त्यासाठी हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी असा आहे. उदा. fablab@school या प्रकल्पा अंतर्गत अमेरिका, मलेशिया, रशिया, ब्राझिल अशा देशातील अनेक शाळांत विद्यार्थी शास्त्र विषयाचे शिक्षण प्रत्यक्ष जीवनातील ख-या प्रश्नावर प्रकल्प करत शिकतात. फ़ॅब लॅब म्हणजे अशी कार्यशाळा जेथे आवश्यक अत्याधुनिक साधने व यंत्र असतात. या साधनांचा वापर करुन विद्यार्थी उपयोगी वस्तू फ़ॅब लॅब मध्ये  तयार  करतात. त्याच प्रमाणे अमेरिकेत DESIGN THINKING कार्यक्रमा अंतर्गत ८वी पर्यंतचे विद्यार्थी NUEVA INNOVATION  LAB मध्ये विविध विषयातील ज्ञानाचा समन्वय असलेले प्रकल्प तयार करतात. एकत्र गटाने काम करून संशोधन समस्येवर उत्तर शोधणे त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करणे हे यातून साध्य केले जाते. विद्यार्थ्यांनी हाताने काम करणे ते करताना ज्ञान मिळवणे हा विचार आता मान्य होत आहे. हाताने काम करत शिकणे ही तर शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे. चाकाचा शोध लावणाऱ्या माणसापासून ते कुतुबमिनार -ताजमहाल बनविणाऱ्या पर्यंत , एडिसन राईट बंधू पासून ते बिल गेट पर्यंत अनेक संशोधक उद्योजक हे या पद्धतीनेच शिकले आहे. प्रत्येकजण आपली मातृभाषा याच पद्धतीने शिकतो. या नैसर्गिक कार्यकेंद्री शिक्षण पद्धतीची ओळख करून देणे साकरतांना येणा-या अडचणींची ओळख हा या लेखाचा उद्देश आहे.
मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology)
महाराष्ट्रातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये IBT हा पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविला जातो. यात शाळेमध्ये अभियांत्रिकी कार्यशाळा, विद्युत कामाची साहित्य, खाद्यपदार्थ  निर्मिती शेतीसाठी आवश्यक अशी साधने उपलब्ध असतात. IBT मध्ये आठवड्यातील एक दिवस विद्यार्थी प्रत्यक्ष हाताने काम करत शिकतात ते करतांना लोकांना विविध सेवा देतात.उदा.सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंप्री शाळेतील विद्यार्थ्यांनी वस्तू/सामान वाहून नेण्यासाठी एक हातगाडी तयार केली.गाडीचे डिझाईन, फ़ॅब्रिकेशन , वेल्डिंग ,सामान खरेदी, मटेरियल चे कटिंग,  चाके बसविणे सर्व कामे विद्यार्थ्यांनी केलीत. सर्वात शेवटी खर्च काढून वस्तूची किंमत काढली. हे केवळ व्यवसाय शिक्षण नव्हते तर सामान वाहून नेण्याच्या प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्वक शोधलेले उत्तर होते. ते उत्तर केवळ शाब्दिक नव्हते तर कृतीशील होते .



मैदानावर खेळण्यासाठी फक्की मारताना हात खराब होतात रेषा सरळ पडत नाहीत या समस्येवर मात करण्यासाठी याच शाळेतील विद्यार्थीनींनी फक्की मारण्याचे मशीन तयार केले .यासाठी  त्यांना शारिरिक श्रमा बरोबर बौद्धिक श्रम पण करावे लागले.अशा प्रकारचे प्रत्यक्ष उत्पादक काम करत ज्ञान मिळविल्यानेच विद्यार्थ्यामध्ये कृतीशीलता सृजनशीलता तार्किक क्षमता वाढू शकते. एकत्र काम केल्याने संघभावना वाढू शकते. अशा उत्पादक कामावर आधारलेल्या शिक्षणाचा आग्रह धरायला जायला हवा.
                                           
                                        -    डॉ.योगेश कुलकर्णी
  विज्ञान आश्रम, पाबळ जि.पुणे
       vapabal@gmail.com






No comments:

Post a Comment