Sunday, October 5, 2014

माध्यमिक शाळेतील उत्पादक कामातून शिक्षणाचे महत्व व समज - गैरसमज


गरीबी ,बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे समाधान म्हणून सहजपणे व्यवसाय शिक्षण’ हे उत्तर दिले जाते . मात्र व्यवसाय शिक्षण घेतलेले तरूण (आय. टी.आय पासून ते अभियांत्रिकी पदवी पर्यंत) सुद्धा बेकार का राहतात ? याचा मुळापासुन आपण विचारच करत नाही . बेरीजगारी संदर्भात खालील प्रश्न  मुख्यपणे मांडले जातात .
) उद्योगांना काम करायला योग्य उमेदवार मिळत नाहीत .
) पैसे मिळत असले तरी काम करायला युवक तयार नाहीत.
) शिकले तरी काम मिळत नाहीत.
) काम करणाऱ्याला समाज प्रतिष्ठा नाही.
या संदर्भातील सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपल्याला या समस्येवर उत्तर शोधता येणार नाही . दुर्देवाने आपण सर्वजण मुळ दुखण्याला हात लावता वरवर मलमपट्टी करतो . त्यामुळे दुखणे तसेच रहात आहे. एखाद्या रुग्णाला डॉक्टरांना रोग माहित आहे, त्यावर उपचार माहित आहे . पण तो अंमलात आणायचा नाही अशी आपली अवस्था आहे .या लेखात या संदर्भातील सर्व मुद्दे चर्चेला आण्याचा प्रयत्न आहे.


श्रम प्रतिष्ठा :-
’हाताने काम करणे’ किंवा कष्ट करणे याला सामाजिक प्रतिष्ठा नाही. स्वखुशीने कोणी कष्टाची कामे करत नाही. पूर्वी सामाजिक दृष्ट्या दुर्बल /गुलाम यांच्यावर अशी कामे लादली जात असत . आता ब-याच ठिकाणी श्रमाचे किंवा कंटाळवाणे  काम हे यंत्रावर सोपवले जाते. परराज्यातील कामगार आपल्या येथे येउन कष्टाची कामे करतात,  मात्र ते काम करण्यास स्थानिक लोक तयार होत नाही याचे सरळ कारण म्हणजे स्थानिक लोकांना त्या कामाची गरज वाटत नाही किंवा उपजीविकेसाठी इतकी अपरिहार्य स्थिती निर्माण झाली नाही हे होय. ’आराम मिळवणे’  हा माणसाचा स्वभावच आहे आणि प्रत्येकजण तो मिळवण्याचा प्रयत्न करतो असे मला वाटते. मध्यंतरी एका ट्रॅक्टर कंपनीने वातानुकूलित ट्रॅक्टर बाजारात आणला होता व मला त्याचे कौतुक वाटले होते. वेगवेगळया कष्टांच्या कामांचे यांत्रिकीकरण होत आहे.  मध्यंतरी मी चीन  मध्ये शिकवण्याचे काम करणारा रोबोट बघितला. गोष्ट सांगणे , धडा शिकवणे रंग ओळख , नाच शिकवणे ,खेळ शिकवणे अशी तीच तीच पुनरावृत्ती असलेली कामे तो सहज करू शकत होता. म्हणजे तोच तोच आशय व तोच पाठ  धडा प्रश्नोत्तरे वर्षानुवर्षे  शिकवणारा शिक्षक असेल तर त्यांना त्याचे ते काम पण यंत्रावर सोपवता येते .
कष्टाचे , परत परत रण्याचे , कंटाळवाणे काम टाळणे हा माणसाचा स्वभाव आहे यामुळे अशा प्रकारच्या कामांचे  किंवा व्यवसायांचे उदात्तीकरण करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे परिस्थितीमुळे असे काम करणा-या कष्टक-यांच्या कामाविषयी आदर (श्रम प्रतिष्ठा ) व त्याची उपयुक्तता ही प्रत्येकाच्या मनात तयार व्हायला हवी अशी व्यवस्था करावी लागेल . परदेशात ब-याच कॉलेज मधील विद्यार्थी आपला खर्च भागवण्यासाठी हॉटेल मध्ये वेटर , ऑफिस असिस्टंट, स्वच्छता कर्मचारी  इ.  अनेक कामे करतात. दुसरे अधिक आरामदायक बौध्दि दृष्ट्या आव्हानात्मक काम मिळू पर्यंत अशी व्यवस्था ही पायरीचा दगड (stepping stone) ठरू शकते .

शिक्षण उद्यमशील बनवणारे असणे
केवळ पुस्तकी घोकंपट्टी च्या पद्धतीने शिक्षण देण्याचा उपयोग नाही यावर शिक्षणतज्ञां मधे एकमत आहे. आजची पुस्तक केंद्रि शिक्षण पध्द्त एखाद्या वेळी विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवत असेल पण ती त्यांना कृतीशील बनवू शकत नाही. त्यामुळॆच शालेय शिक्षण घेतल्यावर तांत्रिक शिक्षण घेतलेली विद्यार्थी नोकरी मिळाली नाही तर बेकार रहातात. शालेय शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा धडपड करणारा, उद्द्योगी बनावा म्हणूनच ज्ञानरचनावाद, प्रकल्प शिक्षण या सारख्या संकल्पना शिक्षण पद्धतीत रुजवण्याचा प्रयत्न होत आहे.मात्र अजूनही त्याची कार्यवाही उद्दीष्टाकडे जाण्यास कमी पडत आहे. सध्याची शिक्षण पद्धती ही दुस-या औद्योगिक क्रांती चे अपत्य आहे. श्री.जेरिमी रिफ़्कीन यांनी त्यांच्या ’Third Industrial Revolution’ या पुस्तकात त्याची मांडणी केली आहे. पहीली औद्योगिक क्रांती ही कोळसा व वाफ़ेच्या इंजिन या उर्जा स्त्रोता वर झाली. दुसरी औद्योगिक क्रांती ही तेलावर (पेट्रोल/डिझेल) या उर्जेवर अवलंबून होती. ऑईल आधारित व्यवस्थेत उर्जा संसाधने ही थोड्याच जणांच्या हातात होती व त्यासाठी लागणारे भांडवल प्रचंड होते .त्यामुळे केंद्रिय उत्पादन व mass production  वर भर होता. सांगितलेले काम ठराविक वेळेत पूर्ण करणे ,दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन करणे हे कारखान्यातील उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक होते, माल विकण्यासाठी स्पर्धा होती. ज्ञान ताब्यात ठेवण्यासाठी पेटेंट व बौध्दीक संपदा अधिकार आवश्यक होत्या हे सर्व करण्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ तयार करण्यासाठी सध्याची शिक्षण व्यवस्था उभी राहिली .मात्र ऑईल संसाधने ही संपत चालल्यामुळे दुसरी औद्योगिक क्रांती आता तिच्या शेवटच्या चरणात आहे. आता तिसऱ्या  औद्योगिक ची सुरुवात झाली आहे. अनेक युरोपीय देशांनी त्यानुसार आपली धोरणे ठरवण्यास सुरुवात केली आहे. ही क्रांती अक्षय उर्जा  स्त्रोतांवर आधारित असेल. सौर ,पवन , बायोगॅस . अनेक  उर्जा स्त्रोतांपासून विकेंद्रित पद्धतीने उर्जा उत्पादन होईल. प्रत्येक घर हे पॉवर हाउस बनेल. त्यामुळे विकेंद्रित उत्पादन होऊ लागेल. नवीन  डिजीटल fabrication तंत्रज्ञानामुळे (उदा. 3D printer), विकेंद्रित उत्पादन पद्धतीचा वापर सुरु होईल. व तश्या शक्यता दिसू लागल्या आहेत. ही नविन क्रांती स्पर्धेवर नव्हे तर collaborative (सह्चार्यावर) आधारित असेल. या नविन व्यवस्थेला लागणारी कौशल्य वेगळी असतील. दुस-या औद्योगिक क्रांतीनंतर त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ बनवणारी व्यवस्था ५०  वर्षात  तयार झाली. आता मात्र तिस-या औद्योगिक क्रांती साठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था दाचित त्यापेक्षा कमी वेळात तयार होईल. थोडक्यात पुस्तक केन्द्री शिक्षण पद्धत  घोकंपट्टी व मार्कावर आधारित शिक्षण व्यवस्था औद्योगिक क्रांतीच्या रेट्याने कोणाला आवडो  न आवडो बदलणार -आहेच.   
नविन व्यवस्थेत  यंत्राचा वापर, अ‍ॅटोमेशन (स्वयंचलित)मशीनचा - श्रम कमी करण्यासाठी वापर वाढणे हे स्वाभाविकच आहे. जर सर्वच कामे यंत्रावर सोपवली जाऊ लागली तर माणसाने काय करायचे ? सर्वच कष्टाची/कंटाळवाणी कामे यंत्रे करू लागली तर माणसाकडे पुरेसा मोकळा वेळ असेल. मग त्या मोकळ्या वेळाचा वापर तो नविन शोध , कलात्मक काम, सृजनशील काम ,दुस-यांची मदत सेवा यासाठी करु शकेल. म्हणजे विद्यार्थ्याच्या बुध्दीमत्तेचा सर्वांगिण विकास होऊन तो माणूस म्हणून सहभागी होऊ शकेल असे शिक्षण आपल्याला द्यावे लागेल. 

सृजनशील समाज कसा घडेल ?
जॉन पियाजे या शास्त्रज्ञाने मांडल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व जितके व्यापक, तितकी त्यांची बुध्दीमत्ता विकासाची क्षमता जास्त असते. पूर्वी आलेल्या विविध अनुभवांचे पुथ्थकरण करून त्यांच्या पासून वेगळीच शक्यता आखणे म्हणजे सृजनशीलता होय. लहान पणापासून विविध अनुभव असतील तर अश्या वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करायची विद्यार्थ्यांची क्षमता वाढते. म्हणून आपल्याला शिक्षणातून त्यांना विविध अनुभव द्यावे लागतील. त्यामधून त्यांना शहानपणा येईल. अनुभव हे प्रत्यक्ष जीवनातील असावे लागतील त्या अनुभवांकडे डोळसपणे ,चिकित्सक बघायला विद्यार्थ्यांना शिकवावे लागेल .
जगभरात अगदी MIT,Stanford पासून ते अनेक ठिकाणी अनुभवावर आधारलेले शिक्षण कसे असेल याचा विचार होत आहे. त्या सर्वांच्या शिफ़ारशींचे सा काढले तर सृजनशील बनवणारे शिक्षण देण्यासाठीचे मुख्य सूत्र पुढीलप्रमाणे :-
) विद्यार्थ्यांनी शाळेत प्रत्यक्ष जीवनातील /समाजातील खऱ्या प्रश्नांवर (real life problem) वर प्रकल्प करावे. हे प्रकल्प करतांना विविध विषयांचा एकत्र अभ्यास (cross curricular) व्हायला हवा . विषयांना एकमेकांपासून स्वतंत्र शिकवण्यापेक्षा , एखादा प्रश्न सोडवण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान , विविध माहीती स्त्रोत (इंटरनेट पासून सर्व.. ) वापरुन कसे आत्मसात करावे व ज्ञानाचे उपयोजन कसे करावे हे शिकवले जावे.   
) शाळेत किमान २०%वेळ हा कृतीमधून का करता यावे .
)शाळेत अशी जागा असावी ज्या ठिकाणी रुढ अर्थाने शिकवणे होऊ नयेम्हणजेच शाळेत कार्यशाळा असावी , साधने असावीत .

सुदैवाने हे कसे करता येईल याची अनेक व्यावहारिक उत्तरे जगभर दिसतात. आपल्या कडे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२००५) मधील ’कार्य आणि शिक्षण’ या गटाने ’कार्य केंद्रि’ शिक्षणाची संकल्पना मांडली ती या सर्व संकल्पनांच्या सगळ्यात जवळ जाणारी आहे. पाबळ मधील ’विज्ञान आश्रम’ गेली ३० वर्षे ’हाताने काम करत शिकणे’ ’शाळॆतून समाजाला सेवा मिळायला हव्यात’ ’शाळा हे संपुर्ण समाजाचे ज्ञान प्राप्तीचे केंद्र बनले पाहीजे’ या उद्देशाने काम करत आहे. प्रत्यक्ष अनुभवातून शिकवले तर ’पुस्तकी शिक्षणात’ कमजोर विद्यार्थी पण संशोधक – उद्योजक बनू शकतात याची शेकडो उदाहरणे समोर आहेत.

शिकण्याची नैसर्गिक पद्धत :-
सृजनशील बनण्यासाठी , अनुभव मिळवण्यासाठी,  प्रत्यक्ष जीवनातील खऱ्या खुऱ्या प्रश्नावर काम करणे म्हणजे कामात सहभाग घेणे. ज्या कामाचा समाजाला उपयोग होतो, त्याचा आर्थिक / सामाजिक लाभ होतो असे कुठल्याही कामाला ’उत्पादक काम’ असे म्हणतात. आपल्याला ’काम’ म्हणजे काबाडकष्टातील ’काम’ नव्हे तर ’उत्पादक काम’ अपेक्षित आहे. ’हाताने काम करत शिकणे’ ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. अग्नी च्या शोधापासून ,चाकापासून ते विमान , सायकल ,वीजेचा शोध असे अनेक मुलभूत शोध हे या शिक्षण पध्दतीतून शिकलेल्यांनी लावले आहेत. संगणक प्रणालीतील शोध लावणारे  बिल गेट/स्टिव्ह जॉब हे सुध्दा पुस्तकी पांडित्याने नव्हे तर शालेय वयात ’प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण’ घेतल्याने मोठे झालेत . त्यांनी मिळवलेले ज्ञान हे त्यांनी  लहानपणी मिळवलेल्या विविधांगी अनुभवामुळे शक्य झाले हे  आपण लक्षात घेतले . राईट बंधू सायकल दुकान चालवत ,एडिसन ने तर वर्तमानपत्र विकण्यापासून विविध कामे केली. आपल्याकडे पण डॉ कलामांसारखी अनेक प्रज्ञावान व्यक्तींचे मोठेपण त्यांना लहानपणी मिळालेल्या विविध अंगी अनुभवात होते . आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्ष करता येतात त्या आपण प्रत्यक्ष काम करुनच शिकलेल्या असतात. या पध्दतीनेच लहान मुल २ वर्षात भाषा शिकू शकते. हे सर्व असतांना ’काम करत करत शिकणे’ या पध्दतीचे सार्वत्रिकरण का होत नाही ?

काम नकारात्मक संबोधन
’काम’ या शब्दाला नकारात्मक दृष्टीनेच बघितले जाते . विद्यार्थ्यांचे ’उत्पादक कामा’तील सहभागाचे आपण शैक्षणिक महत्त्व ओळखले नाही तर  प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थांना कसे शिकवणार ?
प्रयोग शाळेत प्रयोग करणे ,काही कृतीपर उपक्रम करणे यांना मर्यादा आहे.  उत्पादक कामातून एखाद्या प्रश्नावर उत्तर शोधणे, सेवा देणे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे यात खूप सखोल अनुभव मिळतो . शाळेत उपक्रम म्हणून किंवा छंद म्हणून एखाद्या कुंडीत रोप वाढवणे यात खुप मर्यादित अनुभव आहे. मात्र जमीनीचे माती परिक्षणापासून ते बीज प्रक्रिया , सिंचन पध्दतीचा वापर करुन एखादे पूर्ण पीक घेणे   बाजारात जाऊन विकणे हे उत्पादक काम आहे. व अधिक अर्थपुर्ण व संपुर्ण आहे.  अशा  उत्पादक कामातील विद्यार्थ्याचा सहभाग हा त्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी आवश्यक असतो . मागे नमूद केल्याप्रमाणे काम करणे ’काबडकष्ट करणे’ हे कोणालाच आवडत नाही. आपल्याकडील  वर्ण संस्कृतेने तर शाळेत काम’ म्हटल्यावर काहींना तो विद्यार्थांना कामगार बनवण्याचे किंव्हा कनिष्ठ श्रेणीत ठेवण्याचे षडयंत्र  वाटते . विनोबांनी त्यांच्या शिक्षण विचार’ मध्ये देवाची शिक्षणाची नैसर्गिक योजना सांगितली होती. माणूस निर्माण केल्यावर शिक्षणासारखी महत्वाची गोष्ट माणसावर सोडणे शक्यच नव्हते. देवाची शिक्षणाची योजना म्हणजे त्याने माणसाला विचार करण्यासाठी डोके दिले. दुस-याविषयी  सद्दभावना ठेवण्यासाठी  ह्रदय दिले , आणि निर्मिती साठी हात दिले. माणसाला भाषा यावी म्हणून ’आई’ दिली. मन ,मेंदू मनगट भाषा येण्यासाठी आई अशी देवाची शिकवण्याची नैसर्गिक योजना आहे.
आजकाल खाण्या - राहण्यापासून ते घरापासून ते फर्निचर पर्यंत नैसर्गिक गोष्टीचा आग्रह होतो व ते आधुनिक- आदर्श मानले जातेतेंव्हा शिक्षणाच्या  नैसर्गिक पद्धतीचा पण तसाच प्रचार व आग्रह धरायला हवा .
उत्पादक कामातून शिकणे यातील काही वर चर्चीला न गेलेल्या आक्षेंपाची नोंद घेऊयात -  
)विद्यार्थांना विज्ञान तंत्रज्ञान ,गणित  शिकवणे जास्त महत्वाचे काम तर कोणीही करतो ते डोक्याचे काम नाही.  
विज्ञान तंत्रज्ञान व गणिताचा रोजच्या जीवनाशी संबंध लावायचा असेल तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव हवा. त्यामुळे विज्ञान संकल्पनेचे उपयोजन अधिक स्पष्ट होईल. उदा फ़्युज बदलायला  शिकलो की ओहमचा नियम अधिक स्पष्ट होतो. हाताने केलेल्या कामाला बुद्धीची जोड दिली की मगच खरे शिक्षण होते .
 
) शाळेत हाताने काम म्हणजे बालमजुरी ?
शाळेतील कुठल्याही  कामाची सीमा ही विद्यार्थांना अनुभव देण्यापुरतेच असते. विद्यार्थांनी कामात कौशल्ये प्रभुत्व पातळी गाठणे अभिप्रेत नाही. कामाबरोबर विद्यार्थांनी त्यामागील संकल्पना, गणित ,इतिहास  शिकणेपेक्षि आहे.  बाल मजुरीत श्रमाचे शोषण तेच तेच कंटाळवाणे निरस काम असते. शिक्षणातील ’उत्पादक काम’ हे बहुविध कौशल्य शिकवणारे असते. माध्यमिक शिक्षणातील उत्पादन काम’ हा आनंददायी अनुभव आहे .
)शाळेतील  अभ्यास क्रमाचा वेळ वाया जाईल ?
विज्ञान आश्रमाच्या सहकार्याने अनेक शाळांमधे पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम – ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा अभ्यासक्रम राबवला जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांची इतर विषयातील समज वाढते, मार्कस वाढतात हा अनुभव आहे.

माध्यमिक शाळांतील कौशल्य शिक्षणाचे सध्याचे धोरण
माध्यमिक स्तरापासून व्यवसाय शिक्षणाची स्वतंत्र शाखा सुरु करण्याचे National Vocational Qualification Framework (NVEQF) ने योजले आहे. मात्र ९वी १०वी पासूनच ’ट्रेड’ वर आधारित अभ्यासक्रम यात प्रस्तावले आहे. इ.९ वी तील विद्यार्थ्याचे वय १३ वर्षाचे असते. या वयात संपुर्ण आयुष्यभर काय व्यवसाय करायचा ? अशा व्यवसाय शाखेची निवड करणे हे विद्यार्थ्या च्या दृष्टीने केवळ अशक्य असते. परत या सध्याच्या योजनेत माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण हे ऎच्छीक असणार आहे. म्हणजेच रुढ अर्थाने हुशार मुले परत पारंपारिक शिक्षणाकडे वळतील व अशी ’व्यवसाय शिक्षणाची’ स्वतंत्र शाखा केवळ ’गरिब’ किंवा ’शैक्षणिक दृष्ट्या कमजोर’ मुलांसाठी असा समज पसरेल. या त्रुटींमुळे ही योजना पूर्वीच्या शालेय स्तरावरील व्यवसाय शिक्षणाच्या योजनांप्रमाणे फ़सण्याची जास्त शक्यता आहे.

आपल्याला तिस-या औद्योगिक क्रांतीला सामोरे जाण्यासाठी, विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता वाढीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात सांगितलेले ’कार्य केंद्रि’ शिक्षण अभिप्रेत आहे. केवळ उद्योगांना कामगार पुरवण्यासाठी चे शिक्षण इतके मर्यादित उद्दीष्ट आपल्याला ठेवता येणार नाही. केवळ ’कामगारांची फ़ौज’ असे देशाचे रुप आपल्याला कोणालाच आवडणार नाही. जर आपल्याला आपली ओळख ही ’उद्योजक, संशोधक, उद्दमशील’ लोकांचा देश अशी हवी असेल तर आपल्याला शैक्षणिक दृष्टीनेच ’उत्पादक कामाच्या’ माध्यमिक शाळेतील समावेशा कडे बघावे लागेल.
महाराष्ट्रात . गांधीनी नयी तालीम ची सुरुवात केली.  विनोबा, तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेत ’जीवन शिक्षण’ कसे असावे असे मांडले. नविन तंत्रज्ञान व ’उत्पादक कामाची’ सांगड घालून डॉ.कलबागांनी विज्ञान आश्रमात इ.८ वी ते १० वी साठी ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा अभ्यासक्रम तयार केला. SSC बोर्ड व व्यवसाय शिक्षण मंडळाने पण त्याला मान्यता देऊन विकसित होण्यास मदत केली. व्यवसाय शिक्षण खात्याच्या व SSC बोर्डाच्या परवानगीने १०० च्या वर शाळांमधे राबवला जात आहे. महाराष्ट्राबाहेर छत्तीसगड , गोवा, कर्नाटक इ. राज्यातील शाळांत पण तो राबवण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील MIT(USA) चा fablab@school हा प्रकल्प या कल्पनेचे अत्याधुनिक रुप आहे. जगभरात सध्या २०० च्या वर फ़ॅब लॅब आहेत व त्यातील या फ़ॅब लॅब ची सुरुवात पण विज्ञान आश्रमात झाली. जगातील पहीली फ़ॅब लॅब ही पाबळ मध्ये आहे. नयी तालीम पासून ते फ़ॅब लॅब पर्यंतच्या शैक्षणिक संकल्पना महाराष्ट्रात निर्माण झाल्या. त्यामुळे तिस-या औद्योगिक क्रांतीच्या चाहूलीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणात ’उत्पादक कामाचा’ योग्य पध्दतीने व दृष्टीकोनातून समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे व पर्याय देणे ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे असे मला वाटते.   

No comments:

Post a Comment