Saturday, June 25, 2011

श्रीमती मिरा कलबाग : विज्ञान आश्रमाच्या अम्मा


शिक्षणातून ग्रामीण विकास या ध्येयाने गेली २८ वर्षे विज्ञान आश्रम ही संस्था पुण्याजवळील पाबळ येथे कार्य करत आहे. ’हाताने काम करत शिकणे’ हीच शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे यावर डॉ.कलबागांचा विश्वास होता. प्रचलित शिक्षण पध्दतीत शिकण्याची नैसर्गिक पध्दत कशी आणता येईल हे सिध्द करण्यासाठी ’विज्ञान आश्रम’ या शिक्षणाच्या प्रयोगशाळेची स्थापना डॉ.कलबाग यांनी केली. मुंबई तील हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील वरिष्ठ संशोधकाची नोकरी सोडून पाबळ सारख्या छोट्या दुष्काळ्ग्रस्त गावात येऊन रहाण्याचे धाडस डॉ.कलबाग करु शकले याचे महत्वाचे कारण म्ह्णजे त्यांच्या पत्नी श्रीमती मिरा कलबाग यांनी त्यांना दिलेली मोलाची साथ होय.
विज्ञान आश्रमातील ’विज्ञान’ हे डॉ.कलबाग बघतात व ’आश्रम’ पण टिकवण्याची जबाबदारी अम्मांची आहे असे आश्रमातील कार्यकर्ते गंमतीने म्ह्णायचे ते अगदी खरे आहे. आश्रमातील विद्यार्थी / कार्यकर्ते श्रीमती मिरा कलबाग यांना अम्मा म्ह्णून हाक मारतात. डॉ.कलबागांबरोबर १९८३ साली अम्मा पाबळ ला आल्या. पाबळ हे पुण्याजवळील छोटे से खेडेगाव होय. त्याकाळी तर फ़ोन व प्रवासाची साधने पण पुरेशी नव्ह्ती. कामा निमित्य डॉ.कलबागांचे बाहेरगावी जाणे होत असे मात्र अजूनही अम्मा वर्षानुवर्ष आश्रमाच्या बाहेर जात नाहीत. पाबळ व जवळच्या गावातील मुलींसाठी अम्मांनी शिवणक्लास सुरु केला. १९८४ ते २००० पर्यंत ६०० पेक्षा मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले. शिवणकामा बरोबर मुलींच्या व्यक्तिमत्व विकास व सबलीकरणावर अम्मांचा भर होता. ध्यानधारणा, चर्चा , सुविचार आदीच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी मुलींच्या आयुष्याला वळण दिले.
२००० साला नंतर वयामानानुसार त्यांनी शिवण क्लास घेणे थांबवले. मात्र अजूनही आश्रमातील कार्यकर्त्यांना / विद्यार्थ्यांना तसेच गावातील महीलांच्या समुपदेशनाचे काम अम्मा करत असतात. आपल्या वैयक्तिक अडचणी मांडण्याचे हक्काचे ठिकाण म्ह्णजे अम्मा होय. अम्मा विपश्यना व ध्यान यांचे मार्गदर्शन करुन आलेल्यांना मानसिक आधार देतात.
विज्ञान आश्रमातील किचन म्ह्णजे अम्मांच्या व्यवस्थापन कौशल्याचा उत्तम नमुना होय. आपल्या देशात कित्येकांना जेवायला मिळत नाही त्यामुळे आपण थोडेही अन्न वाया घालवू नये याकडे अम्मांचा कटाक्ष असतो. आश्रमातील प्रत्येक जण महीन्याच्या सुरुवातीलाच आपला आहार किती आहे हे सांगतो. तेवढेच जेवण / पोळी / भाजी किचन मधे बनते. आश्रमात किती जण उपस्थित आहेत व किती अन्न बनवायचे आहे याचा सोपा फ़लक पण आहे. किती पीठात किती चपात्या होतील ? भाजीचे तेल / मसाल्याचे प्रमाण या सगळ्याची standards (मानके) अम्मांनी तयार केली आहेत. त्याप्रमाणे अचूक स्वयंपाक करायला त्यांनी किचन मधील अशिक्षित मावश्यांना शिकवले आहे. किचन मधील स्वच्छ्ता , प्रत्येकाने स्वत:ची भांडी धुणे , ती धुतलेली भांडी नीट तपासून जागेवर ठेवणे, भांडी धुतांनाचे खरकटे अन्न व पाणी गांडूळ्खतासाठी वापरणे इ. छोट्या गोष्टीतून अम्मांनी किचनची व्यवस्था बसवली आहे. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात आश्रमात जेवण बनवता येते. समतोल व प्रमाणित आहाराने मुलांच्या तब्येतीत कसा बदल होतो हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी , प्रत्येक विद्यार्थ्याची प्रवेशाच्या वेळी हिमोग्लोबीन चाचणी व वजन घेतले जाते. त्यातील बदल दर तीन महीन्यानी तपासला जातो.
गेली कित्येक वर्ष अम्मा विपश्यना करतात. आश्रमात दररोज संध्याकाळी १५ मिनिटे सामुदायिक ध्यान केले जाते व त्यानंतर विविध विषयावर चर्चा होते. विद्यार्थ्यांना आपले विचार नीट पणे व्यक्त करता येण्यासाठी तसेच त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडवण्यासाठी चर्चेचा उपयोग होतो.
डॉ.कलबाग यांच्या निधनानंतर अम्मा खंबीरपणे पाबळ मध्येच राहील्या. मात्र आश्रमाच्या दैनंदीन व्यवस्थापनात न पडता त्यांनी आश्रमातील तरुण कार्यकर्त्यांना जबाबदारी घेऊ दिली व स्वत: पडद्या आड राहून गरज असेल तेंव्हा सल्लागाराची भुमिका त्या पार पाडत आहेत. ’साधी रहाणी व उच्च विचारसरणी’ हे प्रत्यक्ष कृतीतून अम्मांनी दाखवून दिले आहे.
वयाच्या ८० व्या वर्षीसुध्दा पहाटे पासून रात्री पर्यंत अम्मा उत्साहाने आश्रमातील कामात सहभागी असतात. शिस्तशीर (strict)  पण कठोर नाही. तसेच कटूता न येता शिस्त लावणे हे अम्मांकडूनच शिकावे.
हिंदू धर्मात सांगितल्या प्रमाणे डॉ.कलबाग व अम्मांनी गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रम स्विकारला व ग्रामीण युवकांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले.
’शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ या तत्वज्ञानावर ’हाताने काम करत शिकणे’ या शिक्षण पध्द्तीचे सार्वत्रिकरण करण्याच्या विज्ञान आश्रमाच्या कामात मार्गदर्शन मिळण्यासाठी अम्मांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना !

                                                      डॉ.योगेश कुलकर्णी
                                                             

No comments:

Post a Comment