Monday, November 21, 2011

विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता व बुध्दीमत्ता विकासासाठी शालेय अभ्यासक्रमात कौशल्य शिक्षण


सारांश :
शालेय स्तरावर कौशल्य शिक्षण अंतर्भूत करण्याचा उद्देश हा विद्यार्थांना केवळ रोजगार मिळावा हा नक्कीच नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीसाठी, त्यांच्यातील विविध बुध्दीमत्तांचा व व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी शालेय शिक्षणात ’उत्पादक कामाचा’ समावेश व्हायला हवा. नविन बुध्दीमत्तेवरील संशोधनाने शिक्षण प्रक्रीयेत ’मन, मेंदू आणि मनगट’ हे एकत्र आल्यावरच चांगले शिक्षण मिळू शकते हे सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठा, संघभावना, व्यवहार ज्ञान, सृजनशीलता यांचा विकास होण्यासाठी शाळेत उत्पादक काम व शालेय विषय यांची सांगड घालावी लागेल. माध्यमिक स्तरावरील कौशल्य शिक्षणाकडे ’व्यवसाय शिक्षण’ असे मर्यादीत न पहाता, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००५’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे बुध्दीमत्ता विकासासाठीची शैक्षणिक पध्दत  म्ह्णून पाहीले पाहीजे. याच उद्देशाने महाराष्ट्र व इतर राज्यातील ९० च्या वर माध्यमिक शाळांमधे यशस्वीपणे राबवल्या जाणा-या ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ (व्ही १) या व्यवसाय पूर्व अभ्यासक्रमाच्या अनुभवावर हा लेख आधारित आहे.
ओळख काही क्षणचित्रांची : काही उद्योगी शाळांची व धडपडणा-या मुलांची
१.धनाजी नाना विद्यालय , खिरोदा जि.जळगाव àया शाळेतील ९ वी च्या विद्यार्थ्यानी  शाळॆसाठी सायकल स्डॅण्डची शेड बनवली. संपुर्ण कामाची किंमत रु.१लक्ष एवढी होती. निदेशक आणि विद्यार्थ्यांनी रु.२०,००० एवढी कमाई केली. यासर्व कामाच्या नोंदी, मालाची खरेदी, त्याचे ड्रॉईंग काढणे, वेल्डींग करणे, बांधकाम करणे, किंमत काढणे, अहवाल लेखन या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्ह्णून केल्या.
२. हिरकणी विद्यालय, गावडेवाडी जि.पुणे à या शाळेतील विद्यार्थी गावामधील हवामानाच्या नोंदी रोज गावातील फ़ळ्यावर लिहतात. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बोंबले सरांच्या मोबाईल वर IIT मधून आलेल्या कृषी विषयक माहीतीचा SMS हा गावातील फ़ळ्यावर लिहला जातो. शाळॆतून इंटरनेट च्या माध्यमातून कृषी विषयक सल्ला गावक-यांना दिला जातो. शाळा हे संपुर्ण गावाचे ज्ञान देण्याचे केंद्र बनत आहे.  
३. उमाजी नाईक विद्यालय, भिवडी ता.पुरंदर à या शाळेतील विद्यार्थ्यांनी जवळच्या कृषी औद्योगिक विद्यालयाची इलेक्ट्रीकल ची वायरिंग करुन दिली आणि रु.४०० मिळवले. ते त्यांनी शाळेच्या खात्यात भरले. शाळॆतील शास्त्र शिक्षकांनी या कामाला अनुसरुन इलेक्ट्रीकल्स मधील भौतिक शास्त्राच्या संकल्पना समजावून दिल्या. विद्यार्थ्यांनी गावक-यांना बॅटरी वर चालणारे LED चे लाईट्स करुन विकले. लाईटच्या माळा करुन विकल्या.
गावातील पोल्ट्री ला लोड शेडींग चा खुप त्रास होतो. लहान पिल्लांना ऊब द्यावी लागते. त्यामुळे गावातील एक शेतकरी श्री. विजय मोकाशी यांनी पोल्ट्रीसाठी ऊब देणारी शेगडी बनवता येईल का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना प्रकल्प म्हणून दिला. शेगडी अशी हवी होती की ऊब पण मिळाली पाहीजे पण पिल्लांना इजा पण व्हायला नको. अपघात व्हायला नको. विद्यार्थ्यांनी बॅरल वापरुन दोन शेगड्या करुन दिल्या. प्रत्येक शेगडीचे रु.१००० मिळाले व शेतक-यांनी रु.१३०० बक्षिस म्ह्णून पण दिले. या वर्षी शाळेला अजून एका शेगडीची ऑर्डर मिळाली.
४. श्री.कोल्हेश्वर विद्यालय , तांदुळवाडी – मंगळापुर , जि.सातारा
शाळेतील ८ वी – ९ वी च्या विद्यार्थ्यांनी दस-याला शाळॆत झेंडूचे उत्पादन घेतले. झेंडू दस-याला विक्रीला येईल असे नियोजन केले. शेती मधील सर्व तंत्रे ( तुषार सिंचन , जमिन तयार करणे, योग्य बीजाची निवड, बीज प्रक्रीया, योग्य प्रमाणात खते देणे, त्याच्या नोंदी व हिशोब) त्यांनी ठेवली. सातारा MIDC  मधून हारांच्या ऑर्डर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून घेतल्या.शाळॆला एकूण खर्च रु. रु.९०४० आला तर उत्पन्न रु.२४६२५ मिळाले. सगळ्यांनी मिळून काम करतांना विद्यार्थ्यांना खुप मजा केली. त्यांना मिळालेले अनुभवातील ज्ञान हे त्यांना आत्मविश्वास देऊन गेले. दिवाळी अंकासाठी मुलांनी त्यांचे अनुभव हे निबंध स्वरुपात लिहून पाठवले.
५. कै.बळीरामदादा माध्यमिक विद्यालय , ब्राम्ह्णवेल, साक्री, जि.धुळे
ही आदीवासी भागातील शाळा आहे. शाळेत झाडे लावली की जनावरे खाऊन टाकायची. म्ह्णून विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच ट्री गार्ड बनवले. बाजारातून सामान आणण्यापासून चे सर्व काम त्यांनी केले. नंतर जवळच्या स्थानिक कंपनीतून पॅकींग ची स्क्रॅप मधील लाकडी खोकी मुलांनी मिळवली व त्याचे कंपाऊंड केले.
या जून मध्ये, जवळपासच्या ४ शाळांनी मिळून  सिताफ़ळ, आवळा, करंज, शेवगा यांची ९०२० रोपे तयार केली व स्थानिक स्वयंसेवी संस्थांना विकली. त्यातून शाळेला रु.४५००० मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये भर उन्हाळ्यात रोपे जगवली. पर्यावरण विषयाचे शिक्षण या पेक्षा वेगळॆ काय हवे ?
६. शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे जि.सिंधूदुर्ग
शाळेच्या विद्यार्थ्यांनी वर्गांच्या पाय-यांचे बांधकाम केले. शाळॆत चार सुत्री पध्दतीने भात लागवड केली. या वर्षात गावातील ९ पंखे, २ ट्यब, ३ हिटर यांची दुरुस्ती केली. तर १२ नवीन ट्युब लाईटची फ़िटींग केली. गावातील लोकांच्या गरजा ओळखणे व त्यावर सेवा देणे व त्यातून अनुभव व कौशल्ये मिळवणे हे शिक्षण अर्थपुर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.
७.  आनंदराव पाटील प्रशाला, बेलेवाडी कळम्मा, जि.कोल्हापूर
शाळेतील क्रिडा स्पर्धा, गावातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस विद्यार्थ्यां विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. ब्रेड पॅटीस, बालूशाही, चिरोटे, जिलेबी, वडा पाव, टॉमेटो सॉस, फ़ळांचा जाम, लोणचे, बेकरी चे पदार्थ उदा. नानकटाई, बिस्कीट, चिक्की इ. अनेक पदार्थ मुले मुली बनवतात. हे करतांना पदार्थ टिकवण्याच्या पध्द्ती त्यातील रसायन शास्त्र ,आहार व पोषण या सर्वांचे अनुभवातून शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आईला स्वयंपाक करतांना किती कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव झाल्याचे मुलांनी अनुभवात नमूद केले आहे.
      हिंगणगाव शाळॆतील मुलांनी गावातील विहीरींच्या पाण्याची तपासणी केली.आसदे गावातील विद्यार्थी शेतक-यांना माती परिक्षण करुन देतात. गावातील शेती अवजारांची दुरुस्ती, रोप वाटीका , सौर दिवे, गांडूळ खत निर्मिती, शाळेतील बेंच बनवणे, होस्टेल साठीचे फ़र्निचर अशा अनेक सेवा शाळेमधून विद्यार्थी गावाला देतात.
या सर्व उदाहरणातील शाळा या नेहमीच्या शासकीय अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. आशा ७० च्या वर शाळेमध्ये शासनमान्य पूर्व व्यवसायिक’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology (IBT) - व्ही १) अभ्यासक्रमा अंतर्गत ही कामे केली जातात. आठवड्यतील एक दिवस मुले शाळेतील कार्यशाळेत अभियांत्रिकी, उर्जा,जलसंधारण, शेती – पशूपालन, खाद्य निर्मिती अश्या विविध कामात सहभागी होतात.या शाळांतील मुले मोठी होऊन पुढे इंजिनियर, डॉक्टर, प्रशासकीय सेवा, उद्योजक, प्रगतशील शेतकरी, संगणक तज्ञ अशा विविध क्षेत्रात जातील. मात्र शाळेत मिळालेले, अनुभवातून मिळालेले ’उत्पादक कामातून’ मिळालेले शिक्षण या सर्वांच्या व्यकिमत्वाला वेगळे पैलू देते. या विद्यार्थ्यांना शालेय विषय समजणे सोपे जाते. शाळेमधील एकंदर उत्साह वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये  आत्मविश्वास, उपक्रमशील वृत्ती, प्रयोगशील पणा, स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवण्याचा विश्वास वाढवण्यासाठी अशा शिक्षणाचा उपयोग होतो असा अनुभव आहे.
’व्यवसाय शिक्षण’ व ’उत्पादक कामातून शिक्षण’ यातील मुलभूत फ़रक
वर दिलेल्या शाळांमधील शिक्षण हे रुढ अर्थाचे व्यवसाय शिक्षण नाही. या शाळां मध्ये दिली जाणारी कौशल्ये व केली जाणारे ’उत्पादक’ कामे ही तर ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रीयेचा भाग आहेत. शिक्षणशास्त्रातील महत्वाच्या या फ़रकात आपण गल्लत करु नये. हा फ़रक खालील वौकटीत दिला आहे.

व्यवसाय शिक्षण
उत्पादक कामातून शिक्षण à कार्य केंद्री शिक्षण
१.      एका विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण
१.सर्व मुलभूत जीवन उपयोगी कौशल्यांचे शिक्षण. मुलांचे अनुभव विश्व वाढवण्यासाठी बहुविध कौशल्यांचे शिक्षण.
२.      विद्यार्थ्यांना एखादे विशिष्ट कौशल्य शिकवण्याचा उद्देश
२.वेगवेगळ्या परिस्थितीत काम करण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे हा उद्देश.
३.      विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण कदाचित आयुष्यभर उपयोगी ठरत नाही.
३.’कसे शिकावे नवीन कौशल्य कशी शिकावीत या क्षमतांच्या विकासावर भर.  
४.      विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी व चांगले कारागिर तयार व्हावे ही अपेक्षा.
४.सृजनशील, उपक्रमशील, धडपड करणारा, मानवी मुल्ये बाळगणारा नागरिक बनवणे हे उद्दीष्ट.
५.      ब-याच वेळा व्यवसाय शिक्षण हे फ़क्त गरिब, कष्टकरी,उच्च शिक्षण परवडू न   शकणा-या, कमी गुण असलेल्या ’ढ’ (?) मुलांसाठी असा अलिखित पण रुढ समज आहे. अंमलबजावणी पण त्याच प्रकारे केली जाते.
५.शिक्षण शास्त्रातील संशोधनानुसार विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तांचा विकास व्हावा म्ह्णून सर्व सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थ्यांनी ’हाताने काम करत शिकावे’ ही भुमिका आहे.
६.      परिसरातील उद्योगाचा विकास व्हावा म्हणून त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे या वर भर.
६.देशाचा विकास व्हावा म्ह्णून प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुध्दीमत्तेचा पुर्ण विकास व्हावा यासाठी चे शिक्षण. त्यातून उद्योगांना कुशल कामगार तर मिळतीलच पण विविध क्षेत्रातील   (संशोधन,कला,प्रशासन,अर्थकारण, समाजकारण, उद्योग) नेतृत्व पण या शिक्षणातून घडते.


कार्यकेंद्री शिक्षणाची गरज
लहान मुल २ वर्षात भाषा शिकते. ते अनुभवातून ’काम करत करत शिकते’. आपल्याला ज्या गोष्टी करता येतात उदा. संगणक वापरणे, गाडी चालवणे, पोहणे, स्वयंपाक करणे, एखादी वस्तू दुरुस्त करणे इ. त्या आपण काम करतच शिकत असतो. कुतुबमिनार, ताजमहाल सारखी अभियांत्रिकी मधील आश्चर्यकारक वास्तू बनवणारे शिल्पी हे पण ’हाताने काम करत’ शिकले होते. अनेक यशस्वी उद्योजक व संशोधक यांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यांनी लहानपणी घेतलेल्या विविध अनुभवातून व त्यातून झालेल्या शिक्षणामुळेच ते यशस्वी होऊ शकले. याचा अर्थ ’यशस्वी’ होण्यासाठी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नाही असा नाही. तर ’यशस्वी’ होण्यासाठी जे ज्ञान व अनुभव लागते ते शाळेत उपलब्ध करुन देणे हे होय. आपण १० वी पर्यंत केवळ पुस्तकी शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमधील क्रियाशीलता ही लोप पावते. धडपडणे, प्रयोग करणे, उद्योग करणे हे गुण लहानपणा पासूनच रुजवावे लागतात.
जेष्ठ शिक्षणतज्ञ जॉन पीयाजे यांनी बुध्दीच्या विकासाची व शिक्षणाची संकल्पना मांडली. तिची चार मुख्य सुत्रे आहेत.
१)      विचार करण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांना मिळालेल्या अनुभवावर अवलंबून असते.
२)       बुध्दिमत्ता ही उपजत क्षमता सभोवतालच्या परिस्थितीशी असलेल्या संवादातून विकसित होते.
३)      लहान मुलाला जेवढे शब्दात व्यक्त करता येते त्यापेक्षा जास्त माहिती असते. म्हणजेच शाळेत आपण विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्वी घेतलेले अनुभव व्यक्त करण्यास शिकवत असतो. 
४)      उच्च पातळीवरील अनुभव हेच बुध्दिमत्ता वाढीचे स्त्रोत आहेत.  
म.गांधीजीनी नयी तालीममध्ये हाताने काम केले तरच बुध्दीला चालना मिळते (activity to hand stimulate the intellect )बुध्दिमत्ता विकसित करण्याचा जलद मार्ग म्हणजे सर्व इंद्रिये सहभागी होती अशा कामातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे होय (Quickest way to develop intellect is to give activity to hand)हे सांगितले होते.
1937 च्या वर्धा शिक्षण संमेलनात बोलतांना म.गांधींनी ज्ञान कसे मिळवावे याचे उदाहरण म्ह्णून टकळीतून सुत कताई करतांना ज्ञान कसे मिळेल हे समजावून सांगितले होते.  विद्यार्थी जेंव्हा सुत काढतील तेंव्हा ते केवळ सुत काढण्याचे कौशल्ये शिकतील असे नाही तर शिक्षक त्यांना कापूस उत्पादना पासून ते वस्त्र निर्मिती पर्यंत च्या गोष्टी सांगू शकतील. टकळी कशी काम करते त्याचे भौतिक शास्त्र, तीला गती कशी मिखते यापासून सूताला ताकद कशी मिळते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल. कापसाचा इतिहास, त्याच्या उत्पादन खर्चाचे गणित, कापडाचा दर्जा इ. अनेक विषय विद्यार्थी शिकू शकेल. हे करत असतांना शेतक-यांची स्थिती, शेती चे उत्पन्न हे सर्व विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे हे शिकतांना विद्यार्थी इतक्या सहजतेने शिकतील की त्याच्यावर त्याचा बोजा पडणार नाही. उत्पादक काम हे शिक्षणाचे माध्यम असेल. या पध्दतीलाच ’कार्य केंद्री’ शिक्षण म्हटले आहे. काम करत करत शिकणेही शिकण्याची नैसर्गिक पध्दत आहे आणि शिक्षणात तीचे मध्यवर्ती स्थान असायला हवे.  
बुध्दीमत्तेचा विकास व कार्य केंद्री शिक्षण  :
शिक्षणातून विद्यार्थ्याना माहीती (information) व कौशल्य (skills) मिळावीत. तसेच त्यांच्या मध्ये निरिक्षण क्षमता (observation), तर्क क्षमता (logical thinking), सॄजनशीलता (creativity), मानवी मुल्ये (values), संघ भावना (team spirit) विकसित व्हावे हे अपेक्षित आहे. ह्या प्रत्येक क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हाताने काम करत कार्य केंद्री पध्द्तीने शिकणे कसे आवश्यक आहे हे आता बघू :
१)      माहिती ज्ञान मिळवणे (Information) : केवळ पुस्तकातून मिळवलेली माहीती पुरेशी नसते. आपण एक उदाहरण घेऊ यात. समजा शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना खुर्चीची माहीती देत आहेत.
·         पहिल्या वर्गामध्ये शिक्षकांनी मुलांना खुर्ची न दाखवता, केवळ तिचे उपयोग व स्वरूप वर्णन करून सांगितले.
·         दुस-या वर्गामध्ये खुर्ची चे चित्र काढून दाखवले व मग तिचे कार्य सांगितले.
·         तिस-या वर्गामध्ये मुलांना प्रत्यक्ष खुर्ची मध्ये बसायला लावून माहिती दिली.
आता पुढे जेंव्हा या तिन्ही वर्गातील मुले खुर्चीशब्द वापरतील तेंव्हा पहिल्या वर्गातील मुलांना केवळ शिक्षकांचे ’खुर्ची’ बद्दल शब्द आठवतील. तर दुस-या वर्गातील मुलांना खुर्चीचे चित्र व माहिती आठवेल. तर तिस-या वर्गातील विद्यार्थ्यांनी खुर्चीमधे बसल्यावर , तिच्यात बसतांना व उठतांना अनुभव घेतला असल्याने जेंव्हा खुर्चीशब्द वापरतील तेंव्हा तो संपुर्ण अनुभव त्यांच्या स्मॄतीतून आठवेल. थोडक्यात परिपूर्ण ज्ञान मिवण्यासाठी अनुभवाला पर्याय नाही.
२)      निरिक्षण क्षमता (observation) : निरिक्षण क्षमता म्हणजे प्रत्येक व्यक्तीची तिच्या पूर्व अनुभवानुसार एखाद्या गोष्टी कडे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता होय. हे  उदाहरण पहा,  एकदा एक शास्त्रज्ञ प्रयोग शाळेत काम करत असतांना त्याचा लहान मुलगा त्याच्या कडे बघत असतो.  शास्त्रज्ञ सुक्ष्मदर्शिकेतून डोकावून नोंदी ठेवत असतो. काम झाल्यावर आपला चष्मा टेबल वर ठेवून तो निघून जातो. त्याला नंतर चष्मा कुठे ठेवला हे आठवत नाही. मात्र त्याच्या लहान मुलाने आपले वडील कशात तरी डोकावून काहीतरी लिहील्याचे व नंतर चष्मा काढुन ठेवल्याचे बघितलेले असते. तो पटकन चष्मा कुठे आहे हे सांगतो. या उदाहरणात दोघे ही निरिक्षण करत होते पण त्यांच्या पूर्व अनुभवानुसार त्यांनी त्यांचे लक्ष वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रीत केले होते. म्हणजेच जेवढे पूर्व अनुभव जास्त तेवढी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता जास्त होते. थोडक्यात निरिक्षण क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध अनुभव देणे आवश्यक ठरते.
३)      तर्क क्षमता (logical thinking) : तार्कीक क्षमता विकसित होण्यासाठी अनुभवाची गरज असते. उदा.गरम भांडयाला हात लावला की हात भाजतो हा अनुभव आला की मग परत केंव्हा ही तशी परिस्थिती आल्यास पूर्वानुभवानुसार तर्क केला जातो. प्रत्येक वेळी अनुभव घेण्याची गरज त्यामुळे लागत नाही.
४)      सॄजनशीलता (creativity) : मानवी मेंदूत पूर्वीच्या अनुभवांची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करून वेगळ्या परिस्थितीत नविन संकल्पचित्र तयार करण्याची उपजत क्षमता असते. प्रत्येक गोष्टींचा अनुभव नव्याने घेण्याची गरज नसते , काही गोष्टी दुस-यांच्या अनुभवावरून पण समजावून घेता येतात.  मात्र त्यासाठी काही मुलभूत अनुभवांची मशागत आधी होणे आवश्यक असते. जेवढे अनुभव विश्व व्यापक तेवढी असे पर्याय करण्याची क्षमता जास्त असते. म्हणजेच सृजनशीलता जास्त असते.
५)      मूल्य संस्कार (value) व संघ भावना (team spirit) : एकत्र काम केल्याने संघभावना वाढते. गिर्यारोहण करतांना अवघड ठिकाणी एकमेकाला मदत करण्यासाठी हात सहज पुढे होतो. सैनिक एकमेकांसाठी प्राणपणास लावतात. खेळाडू खेळाडू वृत्तीने सांघिक खेळ अटीतटीने खेळतात. त्यांच्यात प्रबळ संघ भावना असते कारण ते एकत्र काम करतात. एका गटाने ठराविक मुदतीत एखादे काम पुर्ण कराचे झाल्यास साहजिक परस्पर सहकार्य करणे भाग पडते. म्हणजेच मुल्य विकसित होण्यासाठी पण एकत्र काम करणे आवश्यक असते. श्रम प्रतिष्ठा म्हणजेच दुस-याच्या कौशल्याविषयी आदर हा काम करुन बघितल्यावरच तयार होतो.
कार्य केंद्री शिक्षणाकडे दुर्लक्ष का झाले ?   
विद्यार्थ्यांनी ’हाताने काम करत शिकणे, अनूभवातून शिकणे’ हे महत्वाचे आहे हे प्रत्येक शैक्षणिक धोरणात मान्य करुन सुध्दा शालेय शिक्षणात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याची मुख्य कारणे खालील प्रमाणे :
१)       हाताने काम करणे हे नेहमी हलक्या दर्जाचे मानले गेले.  ते समाजातील कष्टकरीवर्गानेच करायचे आहे असे मानले गेले. समाजातील पुढारलेल्या व शिक्षित वर्गाने त्यांना सोयीच्या अशा पुस्तकीघेाकंपट्टीच्याशिक्षणाचाच स्वीकार केला. साहजिक समाजातील इतर वर्गाने ही त्यांचेच अनुकरण केले. ’हाताने काम केल्याने पण ज्ञान मिळू शकते याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले गेले.
२)       शाळॆत मुलांकडून उत्पादक कामे करणे ही गोष्ट विज्ञान तंत्रज्ञानापासूनफारकत आहे असा भ्रम पसरवला गेला.  शिक्षणाचे माध्यम म्हणून ’कामाचे’ असलेले महत्व व त्याचे बौध्दिक विकासातील महत्व समजावून घेतले गेले नाही.
३)       काही तज्ञांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करणेबाल कामगारया दोहींमध्ये गल्लत केली.  वास्तविक कार्य केंद्रीशिक्षणात कुठलेही काम विद्यार्थी वारंवार करत नसतो व त्यात शोषण नसते तर केवळशिकण्याचे माध्यम व अनुभव विश्व व्यापक होण्यासाठी विद्यार्थी ’कामात’ सहभागी होत असतो. पण मूळ  भुमिका न समजल्याने ब-याच तज्ञांनी या संकल्पनेकडे दुर्लक्ष केले.
४)       शासनाने कार्यानुभव’ ,‘समाजोपयोगी कामेइ. कार्यक्रमातून कार्य केंद्रीशिक्षणाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यक्रमाची भूमिका सर्वापर्यंत न पोहचल्याने व शिक्षक,हत्यारे’ ’कार्यशाळा’ ’साहित्यइ. संसाधनांची सोय न केल्याने या कार्यक्रमांची अंमलबजावणी नीटपणे झाली नाही. आणि त्यामुळे त्यातून अपेक्षित असे यश पण मिळाले नाही.  
५)      परिक्षेतील गुणांना मिळालेल्या अवास्तव महत्वामुळे पण विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताकशी वाढवता येर्इल यावर मुळापासून उपाय करण्यापेक्षा वरवरचे गुणवत्ता वाढीचे उपाय केले गेले.
६)      माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम हे वैकल्पिक स्वरुपाचे होते. मर्यादित शाळांमध्येच ते सुरु केले गेले. पुरेशे संसाधने व महत्व न दिल्यामुळे त्यांचा प्रभाव जाणवला नाही.
केवळ पुस्तकी (मॅकॉले)शिक्षण पध्दतीच्या मर्यादा व तोटे आपल्या लक्षात आले आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकरण करतांना ’गुणवत्ता पूर्ण’ शिक्षणाचेच सार्वत्रिकरण करायचे असेल तर ’कार्य केंद्री’ शिक्षणाचा स्विकार करायलाच हवा. 
जगभरातील माध्यमिक शाळांमधील कौशल्य शिक्षण à नविन नावे व नवे स्वरुप ( Innovation lab / Design Lab / Fab lab)
अमेरीकेतील क्लेव्हलॅन्ड येथे STEM (Science, Technology, Mathematics in Education) या प्रकल्पांअंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज २ तास फ़ॅब लॅबमध्ये काम करावे लागते. विद्यार्थी नविन कल्पनांवर /प्रश्नांवर प्रकल्प करतात. या प्रकल्पांमधून विविध विषयांशी समावाय केला जातो. स्टॅन्डफ़ोर्ड विद्यापीठाने fablab@school नावाचा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.
फ़ॅब लॅब म्हणजे गावात अशी एखादी जागा असेल की जिथे योग्य ती सर्व हत्यारे असतीलÊ साधने असतील. व त्या ठिकाणी कोणालाही जाऊन आपल्याला स्व:ला काम करुन हवी तशी वस्तू बनवता येतील. फ़ॅब लॅबच्या कल्पनेची सुरुवात पाबळ येथील विज्ञान आश्रमात झाली. पहीली फ़ॅब लॅब पाबळला सुरू झाली. आता जगभरात ४४  देशांतील १०० पेक्षा जास्त ठिकाणी फ़ॅब लॅब सुरू झाल्या आहेत.
मॉस्कोमधील शाळांमध्ये हाताने काम करण्याचा विद्यार्थ्यांच्या  गुणवत्तेवर होणारा परिणाम दाखवून दिला आहे. या सर्वांनी असे मांडले आहे की शाळेमध्ये अशी जागा हवी की जिथे रुढ शिकवणेअशक्य व्हावे. थोडक्यात शाळेमध्ये हाताने काम करण्यासाठी कार्यशाळा असायला हवी. इतर अनेक ठिकाणी पण Design Lab/ Innovation lab/D-I-Y (Do-it-yourself) इ. नावांनी शाळांमधून कौशल्ये शिकवली जातात. आपल्याला आलेल्या अडचणींवर आम्हीच उत्तर शोधू Ê आम्हाला आलेला नविन कल्पनांना आम्हीच मुर्त स्वरुप देऊ व We can make almost anything !’ असे घोष वाक्य घेऊन काम करणा-या चळवळी जगभर पसरत आहेत.
      आपल्या कडील शाळांमध्ये पण कार्यशाळा, आवश्यक हत्यारे व मुलभूत यंत्रे याची सोय असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला उद्योगी समाज घडवता येईल.
माध्यमिक शिक्षण व राष्ट्रीय कौशल्य विकसन अभियान (National skill development mission) व त्यातील त्रुटी
आपल्याकडे शासन माध्यमिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणाचा समावेश करण्याचा विचार करत आहे. बेरोजगारी साठी उत्तर म्हणून व्यवसाय शिक्षण दिले पाहीजे हे सामान्य मत आहे. मात्र व्यवसाय शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेले आपल्याला सभोवती बरेच जण दिसतात. अमुक एका प्रकारचे कौशल्य घेतले आहे पण तरीही नोकरी  मिळत नाही म्हणून बेकार फ़िरणा-यांची संख्या खुप आहे. पदविकाधारक , अभियांत्रिकी आदी चे प्रशिक्षण घेणा-यांतील बेकारी पण केवळ व्यवसाय शिक्षण पुरेसे नाही हे दाखवते. दुसरी कडे काम आहे पण युवकांमध्ये काम करण्याची वृत्ती नाही. नविन शिकून घेण्याची व कष्ट करण्याची तयारी नाही अशी पण तक्रार ऎकू येते. थोडक्यात केवळ व्यवसाय शिक्षणाने बेरोजगारीचा प्रश्न मिटेल असे मानणे चुकीचे आहे.
युवकांमधील उपक्रमशीलता वाढवणे , त्यांच्यातील उद्दमशीलता वाढवणे हे खरे बेरोजगारी दुर करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळॆ सध्याच्या शासनाच्या प्रस्तावित ’माध्यमिक शाळांमधून व्यवसाय शिक्षण’ मधील काळजीचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.
१.      सध्याच्या घोषणेत व्यवसाय शिक्षणाची ८ वी पासून वेगळी शाखा अस्तित्वात येईल. म्हणजे पारंपारिक पुस्तिकी शिक्षण पध्दतीत आपण बदल करणार नाही. जर अशा शिक्षणाचा पर्याय ठेवला तर कदाचित केवळ गरिब पाल्यांसाठी हे शिक्षण असा समज केला जाईल. आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गातील विद्यार्थी माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षणाचा पर्याय स्विकारणार नाहीत. गरिब सुध्दा नाईलाजाने ’व्यवसाय शिक्षण’ स्विकारतील.
२.      नव्या योजनेत परत माध्यमिक स्तरावर सुध्दा ITI प्रमाणे ’ट्रेड’ वर आधारित शिक्षण देण्याचा विचार आहे. ८ वी च्या स्तरावर मुले १२ वर्ष वयाची असतात.  त्यांना केवळ एका विशिष्ट व्यवसायाचे शिक्षण देणे हे शैक्षणिक दृष्ट्या चुकीचे आहे. या वयात विद्यार्थ्यांना बहुविध कौशल्याचे शिक्षण देणे अपेक्षित आहे. ही कौशल्ये केवळ अभियांत्रिकी क्षेत्राशी मर्यादीत न ठेवता, शेती, खाद्य पदार्थ, कला, पारंपारिक ज्ञान आदींना स्पर्श करणारी असावीत.
उद्योगांच्या गरजांप्रमाणे मनुष्यबळाचा पुरवठा करणे हे शालेय शिक्षणाचे उद्दीष्ट नाही. तर क्रियाशील , सृजनशील व लोकशाही मुल्यांवर निष्ठा ठेवणारा नागरिक घडवणे हे शिक्षणाचे उद्दीष्ट आहे. असा नागरिक घडवण्यासाठी आपल्याला केवळ घोकंपट्टीवर आधारलेले ’पुस्तकी शिक्षण’ उपयोगाचे नाही. विद्यार्थ्यांमधील उपक्रमशीलता , व्यक्तीमत्व विकास , संघ भावना, मुल्ये , व्यवहार ज्ञान , संवाद कौशल्य तसेच दररोजच्या जीवनातील प्रश्न, शालेय विषयातील तत्वे वापरुन सोडवता येणे या सर्व उद्दीष्ट्यांच्या पूर्तीसाठी शालेय स्तरावर कौशल्य शिक्षणाचा – शिक्षण ’कार्य केंद्री’ करण्याचा विचार व्हायला हवा.
सुदैवाने महाराष्ट्रात ’कार्य केंद्री’ शिक्षण कसे देता येईल यावर बरेच संशोधन व प्रयोग झाले आहेत. सेवाग्राम मधील नयी तालीम - आनंद निकेतन , कोल्हापूरचे सृजन आनंद यांनी प्राथमिक  स्तरावर हे कसे करता येईल हे दाखवले आहे. जिज्ञासूंनी पुण्यातील अवकाश निर्मिती संस्थेने तयार केलेल्या या विषयावरील माहीतीपट जरुर पहावेत. माध्यमिक स्तरावर विज्ञान आश्रमाच्या सहकार्याने ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (व्ही १)’ हा शासनमान्य पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम ७० च्या वर माध्यमिक शाळा राबवत आहेत. त्यांच्या अनुभवाचा पण फ़ायदा करुन घेता येईल. आता गरज आहे ती पुर्वीच्या अनुभवातून शिकण्याची व आपले प्रयत्न योग्य दिशेने करण्याची !

                                                       


No comments:

Post a Comment