Wednesday, November 5, 2014

बारगांव पिंप्रीची कृतीशील शाळा


बारगांव पिंप्रीची कृतीशील शाळा

शाळेतील मैदानावर खेळण्यासाठी आखणी करण्यासाठी फ़क्की मारणे हे नेहमीचेच. हे करतांना हात तर पांढरे होतात व रेषा पण एकसारख्या येत नाही. यावर उपाय म्हणून १० वी च्या विद्यार्थीनींनी प्रकल्प म्ह्णून चक्क फ़क्की मारण्यासाठी एका गाडीची निर्मिती केली. त्यामुळे फ़क्की ची नासधूस तर वाचलीच शिवाय एकारेषेत मैदानाची आखणी होऊ लागली. ही शाळा व विद्यार्थींनी आहेत नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालूक्यातील बारगांव पिंप्री येथील शाळेतील !  



विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळावे म्हणून पुण्याजवळील पाबळ येथील विज्ञान आश्रम गेली ३१ वर्ष काम करत आहे. विद्यार्थी विविध तंत्रज्ञानाचे शिक्षण ’प्रत्यक्ष काम करत करत’ मिळवतात. इ.८ वी पर्यंत शिक्षण झालेला कोणताही विद्यार्थी आश्रमातील ’ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. नेहमीच्या पुस्तकी अभ्यासात मागे पडलेले हजारो विद्यार्थी या शिक्षण पध्दतीने उत्तम संशोधक व उद्योजक झालेले आहेत. पोल्ट्री, फ़ॅब्रिकेशन, आधुनिक शेती, खाद्यपदार्थ उद्योग,फ़ेरोसिमेंट, डेअरी असे अनेक उद्योग आश्रमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी करत आहेत. याच विद्यार्थ्यांनी आश्रमात शिकतांना कमी खर्चाची जिओडेसिक डोम गरे, अंडी उबवणी यंत्र, छोटी तेल घाणी, हातसडीचा तांदुळ करण्याचे यंत्र, वेगवेगळ्या प्रकारची वाळवणी यंत्रे तयार केली आहेत. आश्रमात नेहमीच्या पारंपारिक मशिनरी बरोबर डिजिटल फ़ॅब्रिकेशन ची फ़ॅब लॅब पण आहे.
अशा प्रकारच्या शिक्षणाने  उत्पादक कामात सहभागी करुन शिक्षण दिले तर ते नीट समजते, शिक्षण ही सहज प्रकिया होते. विद्यार्थ्यांना केवळ कौशल्य मिळताच असे नव्हे तर त्यांच्या बुध्दिमत्ता विकासाला चालना मिळते. विज्ञान आश्रमाच्या या शिक्षण पध्दतीचा महाराष्ट्रातील १०० च्या वर शाळांनी नेहमीच्या औपचारिक शिक्षणात स्विकार केला आहे. गेली अनेक वर्ष इ.वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology (IBT))हा पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम राबवत आहे.  
नाशिक मधील ’न्यू इंग्लिश स्कूल’ बारगांव पिंप्री येथे २००८ पासून IBT अभ्यासक्रम राबवला जात आहे. IBT ची मुलभूत तत्वे म्हणजे ’हाताने काम करत शिकणे’, ’बहुविध कौशल्याची ओळख’ यात निसर्ग हा अभ्यासक्रम मानून विद्यार्थी अभियांत्रिकी, उर्जा-पर्यावरण, शेती-पशूपालन, खाद्य पदार्थ निर्मिती या विषयातील कौशल्ये प्रत्यक्ष ’काम करत शिकतात’. IBT चे तिसरे तत्व म्हणजे ’शाळेतून समाजाला लोकोपयोगी सेवा’ मिळाल्या पाहीजेत. त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
असे अनुभवातून शिकणॆ केवळ उपजिविका मिळावण्यासाठी नव्हे तर ’विद्यार्थ्यांच्या बौध्दीक वाढीसाठी’ असे अत्यावश्यक असते. त्यामुळे IBT अभ्यासक्रमात हे ’काम’ करतांना प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवणे, हिशोब ठेवणे, अहवाल लिहणे  आवश्यक असते. उदा. बारगांव पिंप्री च्या शाळेत सध्या १० गुंठ्यावर सोयाबिन लावला आहे. त्याच्या सर्व नोंदी विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्ह्णून ठेवतात. अभ्यासक्रमातील माती, पाणी व जीवशास्त्रातील कल्पना अशा प्रकारच्या उपक्रमातून सहज स्पष्ट होतात.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळाले पाहीजे ही पण शाळेची जबाबदारी आहे असेच या शाळेतील शिक्षकांना वाटते. त्यामुळेच या गणपती उत्सवात श्री.प्रमोद वानेरे सरांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आरास करण्यासाठीचे नाविण्यपूर्ण स्टॅन्ड तयार केले. यात लोखंड कापण्यापासून ते वेल्डींग करणे, सुशोभन करणॆ व सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहकांना ते स्टॅन्ड विकणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली व एकूण २५ स्टॅन्डची विक्री केली. 

IBT अभ्यासक्रमात ’जनावरांचे दातावरुन वय ओळखणे’ असे प्रात्यक्षिक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी सर्व वयांची जनावरे दाखवणे शक्य होत नव्हते. या शाळेतील श्री.उगले सरांनी यासाठी व्हिडीओ चे माध्यम वापरायचे ठरवले. वेगवेगळ्या वाड्यापाड्यावर, जनावरांच्या बाजारात गावातील व्हिडीओग्राफ़र ला घेऊन त्यांनी शुटींग केले. अशा प्रकारे शिक्षकांनी धडपड केली तर शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी या दोघांसाठी पण होते. श्री.उगले सरांनी व त्यांच्या प्रमाणेच IBT शाळेतील उत्साही शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साधने www.learningwhiledoing.in वर उपलब्ध आहे. यात उत्पादक कामातून शिकवण्यासाठीचे धडे, पॉवर पॉईंट, व्हिडीओ इ. उपलब्ध आहे. 
शाळेत विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे उत्पादक कामात सहभागी केल्याने त्यांच्या परिक्षेतील गुणांवर परिणाम होईल अशी शंका येणे साहजिक आहे. मात्र वेगवेगळ्या परिक्षणांवरुन व अभ्यासावरुन असे लक्षात आले आहे की विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती सुधारते. विद्यार्थांना त्यांच्या भविष्यातील करियरची दिशा स्पष्ट व्हायला यामुळे मदत होते.महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळातो.
IBT अभ्यासक्रमात मुलांना व मुलींना सर्वच कामे करावी लागतात. म्हणजे अभियांत्रिकीची वेल्डींग इ. कामे मुली व मुले करतात. तसेच चिक्की करणॆ, तळणे अशी पाककृती पण मुले व मुली करतात. त्यामुळे लिंगभेद,श्रम प्रतिष्ठा, संघभावना ही मुल्ये केवळ शब्द न राहता विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष सुजायला मदत होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे IBT विद्यार्थी प्रकल्प करतात. यात समाजातील/शाळेतील एखाद्या प्रश्नावर प्रकल्प करायचा असतो. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात अशी मनोभूमिका तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. वर फ़क्की बनवण्याचे यंत्र याच प्रयत्नातून तयार झाले. थोडक्यात अगदी गाव पातळी, शाळॆपासून संशोधकवृत्ती विकसित व्हायला यामुळे सुरुवात होते.   
बारगाव पिंप्री या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी टेबल, मांडण्या, हातगाडी, शाळेतील वायरिंग, अर्थिंग इ. अनेक कामे ही अभ्यासक्रमाचा भाग समजून घेत केली. वायरिंग करता आले, फ़ॅन दुरुस्त करता आला तर भौतिक शास्त्रातील संकल्पना समजणे सोपे जाते. शेती मधून जीवशास्त्र, खाद्यपदार्थ निर्माण करता करता त्यातील रसायन शास्त्र व त्यासर्वांचा व्यवसाय करता यावा म्हणून गणित असे समजायला लागले की शिक्षण फ़ारच रंजक बनते असा अनुभव आहे.


बारगाव पिंप्री शाळॆतील मुलांनी त्यांच्या शाळेच्या संस्थापकांच्या वाढ्दिवसाव्या दिवशी नासिक रोड येथील मेहता हायस्कूल मधील मुलांचा रक्तगट तपासला. हे काम करतांना रक्त गट तपासण्याची आवश्यकता, हिमोग्लोबीन व त्याचे महत्व हे समजावूण घ्यायला लागते. त्यामुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष काम यातील दुही नष्ट होते. अशा प्रकारच्या शिक्षणाचा ’राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ ने ’कार्यकेंद्रि शिक्षण’ म्हणून पुरस्कार केला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही तर त्याबरोबर कौशल्यपण मिळवली पाहीजेत असे मा.पंतप्रधांनांपासून सगळेच मान्यवर व शिक्षणतज्ञ मांडत आले आहेत. मागील महीन्यात महाराष्ट्र शासनाने ’व्यवसाय शिक्षणाचा’ मुख्य विषयात समावेश केला आहे व त्यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला. त्यामध्ये IBT चा समावेश केला आहे. शासनाचा निर्णय झाला तरी त्याची योग्य अंमलबजावणीसाठी व्हावी म्हणून पालकांनी व शाळांनी या निर्णयाचे महत्व ओळखले पाहीजे. गेली अनेक वर्ष बारगाव पिंप्री सारख्या शाळांतील श्री.वाघचौरे, श्री.बागूलसर यांच्यासारख्या मुख्याध्यापकांनी स्वयंप्रेरणेने जे प्रयोग केले त्यांचे अनुकरण सगळ्या शाळांसाठी खुप पथदर्शी ठरु शकेल.  

No comments:

Post a Comment