Sunday, February 15, 2015

व्हिजन २०१५ : उद्योजकांचा व संशोधकांचा महाराष्ट्र बनवण्याचे !





व्हिजन २०१५ मध्ये आपल्याला कसा महाराष्ट्र घडवायचाय ? कुशल कामगार उपलब्ध असलेला महाराष्ट्र की कमी खर्चात कामगार पुरवू शकेल असा महाराष्ट्र ? मला वाटते ’उद्योजकांचा व संशोधकांचा महाराष्ट्र घडवणे’ हे आपले व्हिजन असले पाहीजे. सध्या शहरामधील कुशल कामगारांच्या कमतरतेकडे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. कौशल्य शिक्षणाचा राष्ट्रीय कार्यक्रम मा.पंतप्रधानांनी हाती घेतला आहे. अशा कार्यक्रमाची गरज आहेच व त्याचा काही युवकांना व उद्योगांना फ़ायदा नक्की होईल त्याचे आपण स्वागत करु यात. प्रत्येक चांगला उद्योजक वा संशोधक हा मुलत: कुशल असावा लागतो. त्यामुळे केवळ कौशल्य शिक्षण हे पुरेसे नाही , त्याच्या पुढचे उद्दीष्ट आपल्या पुढे असायला हवे.  
 
असे संशोधक व उद्योजक घडवण्याचा फ़ॉर्मुला रबवण्यासाठी मात्र समाजाची मानसिकता बदलावी लागणार आहे. केवळ पुस्तकी शिक्षण व चांगले मार्कस म्हणजे उत्तम शिक्षण हा समज बदलावा लागणार आहे. विमानाचा शोध लावणारे राईट ब्रदर, एडीसन, बील गेट असे अनेक संशोधक व यशस्वी उद्योजक कसे घडले ? त्यांनी ज्ञान हे केवळ पुस्तकी शिक्षणाने मिळवले नव्हते तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळवले होते. यशस्वी व्यक्तींपैकी कित्येकांनी तर शालेय शिक्षण पण पुर्ण केले नव्हते. याचा अर्थ यशस्वी होण्यासाठी शाळा सोडायला पाहीजे असा होत नाही. तर शाळेने यशस्वी व्यक्तिमत्वे कशा प्रकारे शिकली त्या तत्वांचा वापर शिकवण्याच्या पध्दतीत करायला हवा. पाबळ चा विज्ञान आश्रम गेली ३० वर्ष या विषयावर काम करत आहे.
आपल्या सभोवतालची सेवा देणारी अनेक जण उदा. गवंडी , शेतकरी, गाड्या दुरुस्त करणारे तंत्रज्ञ, विक्रेते इ. अनुभवाच्या शाळेत शिकलेली असतात. त्यांनी कुठल्याही औपचारिक शाळेत शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्याकडे अनेक कौशल्ये असतात; त्यांना गणित - व्यवहार अतिशय चांगला येत असतो.ते सर्व जण प्रत्यक्ष ’काम करत शिकलेले’ असतात. लहान मूल वयाच्या दुस-या वर्षी याच पध्दतीने मातृभाषा शिकते. ’हाताने काम करत शिकणे’ ही शिक्षणाची नैसर्गिक पध्दत आहे हा विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ.कलबागांचा विश्वास होता. अश्या शिक्षणाचे त्यांना ओझे होत नाही. शिकण्याची ही नैसर्गिक पध्दत इतकी परिणामकारक आहे की ती अगदी शाळेत न गेलेल्यांना पण सहज शिकवू शकते. प्रत्यक्ष नेहमीच्या शिक्षणात ही ’हाताने काम करत शिकणे’ ची पध्दती रुजवण्यासाठी चे प्रयोग करण्यासाठी १९८३ मध्ये विज्ञान आश्रमाची स्थापना झाली.
पाबळ हे पुण्यापासून ७० कि.मी वर आहे. ग्रामीण भागातील अडचणी व विकासाच्या प्रश्नांना संधी मानून ’शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ कसा करता येतो व विद्यार्थ्यांना कृतीशील शिक्षण कसे देता येते हे विज्ञान आश्रमाने सिध्द करुन दाखवले आहे.
अनौपचारिक शिक्षण पध्दतीत चालणारा ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम हा उद्योजक घडवण्याचे उत्तम उदाहरण आहे. सध्याच्या तर नेहमीच्या शाळांमध्ये आपण १० वी पर्यंत केवळ पुस्तकी शिक्षण देतो. त्यामुळे विद्यार्थ्यामधील कृतीशीलता विकसित होत नाही. त्यामुळे शालेयस्तरा पासून धडपड करण्याचे, उपक्रमशीलतचे बीज त्यांच्यात रुजवण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये (इ.८ वी ते १० वी) मध्ये राबवला जाणारा ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ अभ्यासक्रम हे विज्ञान आश्रमाचे शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे योगदान आहे. 

उद्योगी तरुणांसाठी ’ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ अभ्यासक्रम
हा एक वर्षाचा अभ्यासक्रम विज्ञानश्रमात राहून मुले करतात. ८ वी पास झालेला व प्रत्यक्ष हाताने काम करुन शिकण्याची तयारी असलेला कोणीही हा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकते. पुस्तकी शिक्षणात रस नसलेल्या पण धडपडे असे हजारो विदयार्थी आज यशस्वी उद्योजक झाले आहेत. उद्योजक निर्माण करण्यासाठी आश्रमाची तत्वे खुपच उपयोगी आहेत. 

निसर्ग हाच अभ्यासक्रम
निसर्ग हा अभ्यासक्रम मानून त्यातील शेती-पशुपालन, गृह – आरोग्य, अभियांत्रिकी आणि  ऊर्जा-पर्यावरण यांचा अभ्यास विद्यार्थी करतात. या अभ्यासक्रमाची मुख्य तत्त्वे खालील प्रमाणे आहेत.  
१. हाताने काम करत शिकणे.
२. बहुविध कौशल्ये आत्मसात करणे. आपली आवड नक्की कुठल्या व्यवसायात आहे हे समजण्यासाठी बहुविध कौशल्यांचा उपयोगी ठरते. महत्वाचे म्हणजे व्यवसाय करणा-याला विविध कौशल्ये शिकायला लागतात. उदा. शेती करणार्‍याला आपल्या शेतीतल्या उत्पादनावर प्रक्रिया कशी करायची ते समजले पाहिजे. शेतातल्या पंपाची मोटर बंद पडली तर चालू करता आली पाहिजे. कोंबडीपालन करायचे असेल, त्यासाठी  शेड उभारायची असेल तर त्याचे ड्रॉइंग / आरेखन समजले पाहिजे. बहुविध कौशल्याचा अजून एक फ़ायदा म्हणजे दुस-याच्या कामाच्या कौशल्याचे व श्रमाचे मोल पण समजते व ते चांगला नागरिक होण्यासाठी महत्वाचे ठरते.
३. शिक्षणाचा भाग म्हणून समाजाला सेवा देणे. वि.आश्रमाच्या कार्यक्रमाचे वेगळेपण हे लोकोपयोगी सेवा आहे. विद्यार्थी विविध सेवा समाजाला देतात. त्याचे मुल्य घेतले जाते. याचा फ़ायदा म्ह्णजे विद्यार्थांना व्यवहारातले कौशल्य व प्रशिक्षण मिळते. तसेच लोकांच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमही ताजा, बदलता राहतो.
४. या कार्यक्रमातील शिक्षकाकडे कौशल्ये व उद्योजकता असावी लागते. 
शेतात पीक घेणे ते बाजारात जाऊन विकणे, डेअरी चालवणे, पोल्ट्री वाढवणे, विविध प्रकारची बांधकामे करणे, शेतीची अवजारे बनवणे, विद्युत जोडणी तसेच विद्युत उपकरणाचीं दुरुस्ती, विविध प्रकारची यंत्रे बनवणे, वेल्डींग ची कामे, माती परिक्षण, तुषार व ठिबक सिंचन बसवणे अशी अनेक प्रकारची कामे करत विद्यार्थी शिकतात.

शाळा- ग्रामविकासाचं केंद्र
विकासाची गती वाढवायची असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान वापरले पाहिजे आणि ते तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्यासाठी शाळा हे सर्वात चांगले माध्यम आहे. पाबळच्या शिक्षण पध्दतीने पुस्तकी अभ्यासात गती नसलेली विद्यार्थी पण संशोधक/उद्योजक बनू शकतात. मग हीच पध्दत नेहमीच्या औपचारिक शिक्षणात आली तर शिक्षण कितीतरी परिणामकारक होईल. त्यातून नेहमीच्या औपचारिक शाळांमधून इ.८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वरिल तत्वांच्या आधारे ’मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ Introduction to Basic Technology (IBT)’ आखणी केली गेली. पाबळ व जवळील तीन शाळांमध्ये १९८७ मध्ये सुरु झालेली ही शिक्षणाची पध्दत  आता महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक ,गोवा इ राज्यातील १२२ शाळात स्विकारली गेली आहे. या विषयाला महाराष्ट्रात व्यवसाय शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे. व यावर्षी पासून महाराष्ट्र शासनाने ’आय.बी.टी’ चा मुख्य विषयात समावेशपण केला आहे. या अभ्यासक्रमात आठवी ते दहावी या काळात दर आठवड्याला एक दिवस (१० तासिका) विद्यार्थी प्रत्यक्ष काम करत बहुविध कौशल्ये शिकतात. गावातील स्थानिक उद्योजकांना निदेशक म्हणून आमंत्रित केले जाते. आयबीटी अभ्यासक्रम पण आश्रमात राबवल्या जाणा-या अभ्यासक्रमाच्या तत्वांवर राबवला जातो. 
आयबीटी अभ्यासक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विषयाच्या आकलनात लक्षणिय वाढ झाल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणात सकारात्मक वाढ झाल्याचा शाळांचा अनुभव आहे. माणगांव शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गटात केरोसिन, लाकूड, गॅस अशा विविध इंधनांचा वापर करुन खिचडी बनवली. त्यातून इंधनाची ज्वलनक्षमता तपासली. तसेच लाकडी चुलीची उत्पादकता वाढवण्यासाठी निर्धूल चूलीचा अभ्यास केला. तसेच खिचडीचे पोषणमुल्ये, करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला. याचा अहवाल लिहला तसेच त्याचा सर्व हिशोब पण लिहला. उत्पादक कामातून शिकतांना पाठयक्रमातील विविध संकल्पनांचा अभ्यास होतो. पोखरी शाळेत इलेक्ट्रीक वायरिंग चे काम विद्यार्थ्यांनी केले. ते करतांना त्यांनी विद्युत संबंधीच्या सर्व संकल्पना समजून घेतल्या. तसेच विजेचा इतिहास समजावून घेतला. विद्युत चिन्हांचा वापर करुन शाळेचा वायरिंग डायग्राम काढला. काम पुर्ण झाल्यावर आपला अनुभव आपल्या शब्दात लिहून काढला. असे अनुभवातून शिक्षण मिळाले तर ते परिपूर्ण होते असा अनुभव आहे. एखादी वस्तू तयार केल्याचा, निर्माण केल्याचा आनंद हा खूप मोठा असतो. त्यामुळे मिळणारे समाधान हे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे असते.  

तंत्रज्ञान विकास
वि.आश्रमाच्या कार्यक्रमाचे महत्वाचे अजून एक अंग म्हणजे  तंत्रज्ञान विकास होय. आपल्या समोरील समस्यांवर तंत्र विषयक उत्तरे शोधण्याचे प्रयोग आश्रमात व IBT शाळात नेहमी चालू असतात. लोकांकडून आलेल्या मागण्यांनुसार तंत्रज्ञान विकासामध्ये अनेक गोष्टींची भर पडली आहे. उदाहरणार्थ, कमी खर्चात घरे बांधण्यासाठी जिओडेसिक डोम, छोट्या शेतकर्‍याला परवडण्याजोगा, बैलापेक्षा स्वस्त पडणारा छोटा ट्रॅक्टर – मेकबुल (mech bull), अंडी उबवणी यंत्रे, विविध खाद्य पदार्थ , विविध शेतीची उपकरणे, LED दिवे, सोलर उत्पादने, शेती विषयक सल्ला देणारी aAQUA (www.aaqua.org) हे संकेतस्थळ इ. आपले प्रश्न आपणच सोडवायचे या विज्ञान आश्रमाच्या भूमिकेमुळे अमेरिकेतील MIT ची पहीली फ़ॅब लॅब आश्रमात सुरु झाली. आता डिजिटल फ़ॅब्रिकेशन वरिल फ़ॅब लॅब या संकल्पनेचा जगभर स्विकार होत आहे. सध्या जगभरात २०० च्या पेक्षा जास्त फ़ॅबलॅब कार्यरत आहेत. त्यातील पहीली लॅब असण्याचा मान हा विज्ञान आश्रमाला अभिमानास्पद आहे.
 अर्थात या तंत्र विषयक गोष्टी म्हणजे आश्रमाच्या कामाचा बाय प्रॉडक्टआहे. आश्रमाचं मुख्य संशोधन म्हणजे ’हाताने काम करत शिकणे’ ही शिक्षणाची नैसर्गिक पध्दत. यामध्ये तंत्रज्ञान तर आहेच, गांधींच्या नई-तालीमचा विचारही आहे, शिवाय शाळेच्या व्यावहारिक मर्यादेत हे कसे बसवता येईल, त्याचा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे.

व्हिजन २०१५ : विज्ञान आश्रमाच्या कामाच्या अनुभवावरुन जर महाराष्ट्र हा ’संशोधकांचा – उद्योजकांचा घडवायचा’ असेल तर आपल्या शालेय स्तरापासून सुरुवात करायला हवी. प्रत्येक शाळेत क्रिडांगणे, वाचनालया बरोबर किमान साधने असलेल्या कार्यशाळा असायला हव्यात. शाळॆतील किमान २०% वेळ हा प्रत्यक्ष हाताने काम करत ’निर्मिती’साठी द्यायला हवा. लहानपणा पासून सृजनशीलतेचे, कार्यसंस्कृतीचे व श्रमानंद मिळवण्याचे संस्कार मिळाले तर महाराष्ट्र हा नक्कीच उद्योजकांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल.

No comments:

Post a Comment