गरीबी ,बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे समाधान म्हणून सहजपणे ’व्यवसाय शिक्षण’ हे उत्तर दिले जाते . मात्र व्यवसाय शिक्षण घेतलेले तरूण (आय. टी.आय पासून ते अभियांत्रिकी पदवी पर्यंत) सुद्धा बेकार का राहतात ? याचा मुळापासुन आपण विचारच करत नाही . बेरीजगारी संदर्भात खालील प्रश्न मुख्यपणे मांडले जातात .
१) उद्योगांना काम करायला योग्य उमेदवार मिळत नाहीत .
२) पैसे मिळत असले तरी काम करायला युवक तयार नाहीत.
३) शिकले तरी काम मिळत नाहीत.
४) काम करणाऱ्याला समाज प्रतिष्ठा नाही.
या संदर्भातील सर्व प्रश्नांचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपल्याला या समस्येवर उत्तर शोधता येणार नाही . दुर्देवाने आपण सर्वजण मुळ दुखण्याला हात न लावता वरवर मलमपट्टी करतो . त्यामुळे दुखणे तसेच रहात आहे. एखाद्या रुग्णाला व डॉक्टरांना रोग माहित आहे, त्यावर उपचार माहित आहे . पण तो अंमलात आणायचा नाही अशी आपली अवस्था आहे .या लेखात या संदर्भातील सर्व मुद्दे चर्चेला आण्याचा प्रयत्न आहे.